सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥
माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥
रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥३॥
बांधलों होतो मायाममतेच्या पाशीं । तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥
एका जनार्दनीं उघडा बोध दिला । तोचि ठसावला हृदयामाजीं ॥५॥