अनुभवें पंथें निरखिता देहभाव । देह नाहीं विदेहीं म्हणो वाव ।
लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥
सदगुरुकृपें कल्याण ऐसें जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी मन ठेलें ॥ध्रु॥
कैंचा भाव अभाव उरला आतां । देव म्हणें तोटा नाहीं भक्ता ।
समरस करितां तो हीन होतां । शून्य भरला सदगुरु जनार्दन दाता ॥२॥
ऐशी खुण दावितां गुरुराव । नुरेचि तात्काळ देहीं सोहंभाव ।
सुखदुःखाचा भेद गेला वाव । एका जनार्दनीं फिटला भेव ॥३॥