माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई ।

समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥

येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जातां शिणलीये किती दळुम एकली ।

विसावा निजाचा तूं माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥

ब्रह्माहमस्मि टाकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंटा निश्चय दोहीं एकची बोली ।

पाहिले चारी निरसोनी निज नित्य न्याहाळीं । सहासी वैरण वेरुणी अठराही दळी ॥२॥

पंच भुतें पंच धान्यें दळियेलें जातां । शशी सुर्य दोन्हीं दाळिले प्राण्याच्या समता ।

ध्येय ध्याता ध्यान दळियेलें धारणा धरितां । पंचविषय तेही दळियेलें वैराग्य राहतां ॥३॥

वैकुठं कैलास दळिलें गती एक देशी । क्षीरसागर तोही दळियेला शेषशयनेसी ।

ध्रुव तोही जातां वैरिला अढळ पदेशी । जें जें देखें तेही दळियलें दृश्या दृश्यासी ॥४॥

वासना मिथ्या भाजुनि वैरिलिया जातां । मेळवणी गुण घातले समान समता ।

गुणा गुणातेंहि दळियेलें पहातें पाहाता ।ब्रह्मा विष्णु रुद्र दळिलें ओवीया गातां ॥५॥

कर्माकर्मा कैसें दळिलें जन्ममरणेसी । मीतुपण दोन्ही दळियलें जीवाशिवेसी ।

पुडे वैरिणिया कांहीं न दिसे पाहतां चौपाशी । मायो तेहीं जाता दळिली दळते दळणेसी ॥६॥

वृत्तीए तेहि निवर्तली पडियली ठका । समाधि उत्थाना दळियलें देहबुद्धीसी देखा ।

दळितें जातें तेंहि दळियलें कवतुक देखा । स्वभावें लीला हे खेळे जनार्दनी एका ॥७॥

________________________________________________________

कांडण