येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥

वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥

स्थुळ सूक्ष्म दळियलें देहकारणसहित महाकारण दळियलें औट मत्रेसहित । येई ॥२॥

दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं ॥येई ॥३॥

एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंलीं सप्त सागरांसहित । येई ॥४॥

बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित ॥येई ॥५॥

नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्मा विष्णुसहित ॥येई ॥६॥

ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानसहित । मीतुंपण दळियेलें जन्ममरणसहित । येई ॥७॥

ऐसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित एका जनार्दनीं कांहीं नाहीं उरलें द्वैत ॥येई ॥८॥