श्रीशंभुचें आराध्य दैवत । क्षणीं वैकुंठीं क्षीरसागर । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला आम्हां कीर्तनरंगांत ॥१॥
धन्य धन्य कीर्तन भूमंडळी । महादोषां होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळीं । वाहतां टाळी कीर्तनीं ॥२॥
पार्वतीसी गुज सांगे आपण । शंकर राजा बोलें वचन । माझें आराध्य दैवत जाण । कीर्तनरंगणीं उभे आहें ॥३॥
मी त्रिशूळ पाशुपत घेउनी करीं । कीर्तनाभोंवतीं घिरटी करी । विघ्ना हाणोनि लाथा निवारी । रक्षी स्वयें हरिदासां ॥४॥
त्याचे चरणींचें रज वंदी आपण । हें पार्वतीसी सांगे गृह्मा ज्ञान । एका जनार्दनीं शरण । कीर्तनरंगी नाचतसें ॥५॥