क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥
आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥
गरुडतिष्ठे जोडिल्या करीं । लक्ष्मी तेथें कामारी । ऋद्धिसिद्धि सहपरिवारी । तिष्ठताती स्वानंदें ॥३॥
कीर्तनगजरें वाहे टाळीं । महादोषांची होय होळी । एका जनार्दनीं गदारोली । नामोच्चार आनंदें ॥४॥