आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥

मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥

विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥

नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥

ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥

संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥