रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥
विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥
संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥
धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥