कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥

तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥

पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥

भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥