भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥

येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥

गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥

कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥

पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥

एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥