अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥
जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥
नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥
एका जनार्दनीं नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥
अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर ॥१॥
वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभे साचार विटेवरी ॥२॥
मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे ॥४॥
जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥
न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥
नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शनें उद्धरे जडजीवां ॥३॥
पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापिवरी ॥४॥
एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तासाठीं ॥५॥
तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥
सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐसा एक घडी ॥२॥
निजध्यास जडतां नामीं । सुखें सुख दुणावें प्रेमीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम । शेष्ठा धामांचे हें धाम ॥४॥
अंकितपणें राहिला उभा । विठ्ठल चैत्यन्याच गाभा ।
उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥
पीतांबर माळ कंठीं । केशर कस्तुरीची उटी ।
मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभती ॥२॥
सनकादिकांचें जेंध्यान । उभें विटे समचरण ।
भक्तांचें ठेवणें । जाप्य गौरीशिवाचे ॥३॥
तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वद्तां न लगे मोल ।
एका जनार्दनीं बोल । फुकाचें तें वेचितां ॥४॥
त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥
वेदवचनें निर्धार । नाम तारक हें सार ॥२॥
तारका तारका श्रेष्ठ । पुराणीं हा बोभाट ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारका हें देखा ॥४॥
नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥
प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥
नामें साधे मुक्ति नामें साधे भुक्ति । नामेंचि विरक्ति होत आहे ॥३॥
नाम तेंचि जालें वर्णरुपातीत । अनाम सतत उभे असे ॥४॥
एका जनार्दनीं पूर्ण नामबोध । विठ्ठलनामीं छंद सदा असो ॥५॥
उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥
रुप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकर ॥२॥
तुळसेमाळा शोभे कंठीं । अंगी चंदनाची उटी ॥३॥
भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल विठठल उच्चरिती ॥४॥
एका जनार्दनी ध्यान । शोभे सगुण निर्गुण ॥५॥
कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥
नाम हें चांगलें रुप हें चांगलें । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥
आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशनें मुक्तिं पातकीयांसी ॥३॥
एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तों गोविंद विटेवरी ॥४॥
उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥
विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥
त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळधाम विठ्ठल माझा ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल कानडा । देखिला उघडा विटेवरी ॥४॥
अगम्य तुझा खेळ । ब्रह्मादिकां तो अकळ ।
नेणवेचि सबळ । वेदशास्त्रां ॥१॥
तो वसे पंढरपुरीं । कट धरिलें दोनी करीं ।
पीतांबर साजिरी । बुंथी शोभे तयासी ॥२॥
तुळशीमाळा शोभती गळां । कांसे कसिला सोनसळां ।
पदक आणि वनमाळा । वैजयंती शोभती ॥३॥
वामभागीं ती रुक्मीणी । राही सत्यभामा दोन्हीं ।
पुढें पुंडलीक मनी । तीर्थ तें चंद्रभागा ॥४॥
वेणुनाद गोपाळपुर । पद्माळें तें परिकर ।
बिंदुतीर्थ सर्वेश्वर । सभोंवती शोभातातीं ॥५॥
गरुड हनुमंता दोन्हीं । शोभाताती राउळांगणीं ।
विठ्ठमूर्ति धणी । पाहतांचि सुखावें ॥६॥
भक्त उभे सहपरिवार । करिती नामाचा गजर ।
एका जनार्दनीं परिकर । सेवा तेथें करितसें ॥७॥
श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनीं विटेवरी ॥१॥
विटेवरी उभा आनंदें राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथें ॥२॥
आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं । नाम आनंदेसी गाऊं गीती ॥३॥
एका जनार्दनीं कैवल्याचा धनी । तो नंदाचें अंगणीं खेळे लीला ॥४॥
कैचें आम्हां यातीकुळ । कैंचें आम्ही धर्मशीळ ॥१॥
तुझें नामीं अनुसरांलों । तिहीं लोकीं सरतें झालों ॥२॥
कैची क्रिया कैंचे कर्म । कैचा वर्नाश्रम धर्म ॥३॥
एका जनार्दनीं यातीकुळ । अवघा व्यापक विठ्ठल ॥४॥
जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥
नाहीं त्यांचे आम्हां कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥
कळिकाळाचें भय तें किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥
एका जनार्दनीं सिद्धी । नामें तुटती उपाधी ॥४॥
व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण ॥१॥
आपलें तें नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥
आपले ओळखी आपणचि सांपडे । सर्वत्राही जोडे विठ्ठलनाम ॥३॥
नामविण जन पशुच्या समान । एका जनार्दनीं जाण नाम जप ॥४॥
सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जें कां ॥१॥
सहा चार अठरा वर्णिताती कीतीं \ नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥
शुकादिकीं नाम साधिलेंसे दृढ । प्रपंच काबाड निरसिलें ॥३॥
एका जनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय ॥४॥
सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा ॥१॥
काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥
म्हणोनि आदरें वाचे नाम घ्यावें । रात्रंदिवस ध्यावें विठ्ठलासी ॥३॥
एका जनार्दनीं जपतां नाम होटीं । पुर्वजां वैकुंठी पायवाट ॥४॥
नाम मुखी सदां धन्य तो संसारीं । वायां हाव भरी होऊं नये ॥१॥
तारक तें नाम तारक तें नाम । तारक तें नाम विठोबाचे ॥२॥
जडजीवां तारी दोषियां उद्धरी । एका जनार्दनीं निर्धारी तारक नाम ॥३॥
उदार धीरनीधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥१॥
पतीतपावन सिद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥२॥
सुखसागरनिधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥३॥
एका जनार्दनीं बुद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥४॥
शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी ॥१॥
रुक्मिणी सत्यभामा शोबतसे राही । गरुड हनुमंत दोघे दों ठायीं ॥२॥
एका जनार्दनीं सर्वांचे सार । विठ्ठल विठ्ठल वाचें जपा निर्धार ॥३॥
जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥
ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥
एक वेळ दरुशनं । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥
एका जनार्दनीं ऐक्याभावें । काया वाचा मनें गावें ॥४॥
सकळ सुरां मुगुतमणीं । जो का त्रैलोक्याचा धनी ।
भक्ता अभयदानी । उदारपणें ठाकला ॥१॥
आठवावा वेळोवेळां । भय नाहीं कळिकाळा ।
लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं ॥२॥
मागां बहुतां अनुभव । तारियेले पापीं सर्व ।
एका जनार्दनीं स्वयमेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥
न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावें ॥१॥
अनायासेंदेव हातां । साधन सर्वथा दुजे नाहीं ॥२॥
साधन तें खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावें ॥३॥
एका जनार्दनीं सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥
बोल बोलता वाचें । नाम आठवींविठ्ठलाचें ॥१॥
व्यर्थ बोलणें चावटी । नामावांचुनी नको होटी ॥२॥
नाम हें परमामृत । नामें पावन तिन्हें लोक ॥३॥
नाम सोपें भूमंडळीं । महापापां होय होळी ॥४॥
एका जनार्दनीं शरण । नाम पतीतपावन ॥५॥
चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥
नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥
नाम विठोबांचे घ्यावें निशिदिनीं । चौर्यांशंची खाणी तेव्हा चुकें ॥३॥
एका जनार्दनीं पूर्णता एकपणीं । नाम घ्या निशिदिनीं सर्वकाळ ॥४॥
विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥
विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥
विठ्ठलावाचुनी सोयरा जिवलग । विठ्ठलाचि मार्ग जपा आधीं ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनि । दुजा नेणे स्पप्नी संग कांही ॥४॥
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥
तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥
संसाराचें नुरे कोड । पुरे चाड अंतरीची ॥३॥
एका जनार्दनीं शरण । देव स्वयें तिष्ठे आपण ॥४॥
करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥
आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचें विठोबाई वदे कां रे ॥२॥
एका जनार्दनीं संतांचे सांगात । त्यांचे वचनें मात कळों येत ॥३॥
बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥
कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥
विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ॥३॥
एक जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ॥४॥
धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥
वाचें उच्चरितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥
सहज अमृत पडतां मुखीं । होय शेखीं अमर तो ॥३॥
नामामृत घेतां वाचे । कोटी जन्मांचे सार्थक ॥४॥
एका शरण जनार्दनीं । घेत नामामृत संजीवनीं ॥५॥