वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग ३२०१ ते ३३००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग ३२०१ ते ३३००

अभंग ३२०१

सानपणें धूरु अढळी बैसला

सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥
सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥
सानपणें बिभीषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामें त्यासी ॥३॥
एका जनार्दनें सानपणावांचुनी । ब्रह्माज्ञान जनीं नातुडेची ॥४॥

अभंग ३२०२

उपमन्यु सान देवासी कळवळ

उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥
सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥
सानपणें उद्धव झालासे विमुक्त । सानप्णें तो निश्चित तारियेला ॥३॥
सानपणें सुख गोपाळ गौळणी । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥

अभंग ३२०३

सानपणें तरले अनंत भक्त अपार

सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥
सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥
सानपणें गज तारिली गणिका । उद्धरिला देखा अजामिळ ॥३॥
एका जनार्दनीं सानपणावांचुनी । न चुके आयणी प्रपंचाची ॥४॥

अभंग ३२०४

सानपणें साधे सर्व येत हातां

सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥
महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥
चंदनाचे संगें तरुवर चंदन । सानवण कारण संगतीचें ॥३॥
संतांचे संगतीं अभाविक तरती । एका जनार्दनीं निश्चितीं सानपणें ॥४॥

अभंग ३२०५

जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी

जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥
जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥
जाणिव जाणपण नेणिवा नेणपण दोहींचे । अधिष्ठान एकनाम ॥३॥
एका जनार्दनीं नामक परतें आन । दुसरें साधन सीण जगीं ॥४॥

अभंग ३२०६

विवाद वाद हें तो अधम लक्षण

विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥
मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशनें देखें जगीं ॥२॥
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनियां ॥३॥
एका जनार्दनीं बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥

अभंग ३२०७

धांवू नको सैरा कर्माचियासाठीं

धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणें होय दृष्टी उफराटी ॥१॥
शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥
एका जनार्दनीं ब्रह्मापर्ण कर्म । तेणें अवघे धर्म जोडतील ॥३॥

अभंग ३२०८

करितां वेदशास्त्रं श्रवण

करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥
करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥
कर्म केवळ देह असे । एका जनार्दनें तें नसे ॥३॥

अभंग ३२०९

चित्त समाधान

चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे ॥१॥
न करी आणीक उपाधी । निवारली आधि व्याधी ॥२॥
वृत्ति झाली समरस । सेवीं नित्य ब्रह्मारस ॥३॥
एका जनार्दनीं चित्त । ब्रह्मारसें झालें शांत ॥४॥

अभंग ३२१०

आशेपाशीं नाहीं सुख

आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ॥१॥
आशा उपजली देवासी । तेणें नीचत्व आले त्यासी ॥२॥
आशेसाठीं जगदानी । मागें बळीसी स्वयें पाणी ॥३॥
एका जनार्दनीं आशा । तिनें गुंतविलेंक महेशा ॥४॥

अभंग ३२११

निराशियाचे भेटी पाहे

निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥
निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥
निराशाचें जेथें नांव । तेथें देव घेतसे धांव ॥३॥
निराशेचा जिव्हाळा । एक जनार्दनीं पाहे डोळा ॥४॥

अभंग ३२१२

निःशेष कांहीं नेणिजे

निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा ॥१॥
ज्ञान तें कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहतें पाहा ॥धृ॥
ज्ञानाचें जें ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचें जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥
ज्ञान तें अज्ञाना आलें । अज्ञान तें ज्ञाना गेलें । एका जनार्दनीं मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥

अभंग ३२१३

एक म्हणती आत्मा सगूण

एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण ॥१॥
एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥
एक म्हणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथें ॥३॥
ऐसें नानाभेद वाद सकळ । विचारितां अज्ञान मूळ ॥४॥
अज्ञान तें मिथ्या जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥

अभंग ३२१४

सुटला म्हणतां बांधला होता

सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥
बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥
स्वप्नीचेनि सुखे सुखासनीं बैसे । जागा जालिया कांहींच नसे ॥३॥
एका जनार्दनीं एकापणा तुटी । बद्ध मोक्षाची तेथें वार्ताहि नुठी ॥४॥

अभंग ३२१५

अविश्वासा घरीं

अविश्वासा घरीं । विकल्प नांदे निरंतरीं ॥१॥
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथें सदा भुस ॥२॥
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥
अविश्वास धरितां पोटीं । एका जनार्दनीं नाहीं भेटी ॥४॥

अभंग ३२१६

मूळ नाशासी कारण

मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥
जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥
जया सुख इच्छा आहे । तेणें एकान्तासी रहावें ॥३॥
दृष्टी नाणी मनुष्यासी । तोचि परमार्थासी राशी ॥४॥
एका जनार्दनीं धन्य । त्याचा परमर्था पावन ॥५॥

अभंग ३२१७

अविश्वासापुढें

अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें ॥१॥
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥
सदा पोटीं जो अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषासी ॥३॥
सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥४॥
एका जनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥५॥

अभंग ३२१८

परमार्थ सोयरा अहोरात्र करीं

परमार्थ सोयरा अहोरात्र करीं । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥
नरदेहा यातना चुकतील फेरे । वायां हावभरी होऊं नको ॥२॥
रात्रंदिवस करी नामाचाचि पाठ । मोक्षमार्ग फुकट प्राप्त होय ॥३॥
एका जनार्दनीं नामापरतें सार । न करीं विचार आन दुजा ॥४॥

अभंग ३२१९

शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें

शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥
भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥
अविश्वासियासी होय बोध वायां । ब्रह्माज्ञान तया सांगुन काय ॥३॥
एका जनार्दनीं अभाविक खळ । बोध तो सकळ जाय वायां ॥४॥

अभंग ३२२०

पक्षी आंगणीं उतरती

पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती ॥१॥
तैसें असावें संसारीं । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥
वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥३॥
शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥४॥

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

अभंग ३२२१

विषयीं होऊनि उदास

विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥
ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥
ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥
शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥

अभंग ३२२२

विषयवासना भाजी त्याचें मूळ

विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥
आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥
भेदाचें भांडें वैराग्याचें हातें । धुवोनि सरतें करी बापा ॥३॥
शांतीचेनि सवें धरीं वेगें सोय । एका जनार्दनीं पाय पावशील ॥४॥

अभंग ३२२३

विकल्प वासना समूळ दे टाकुनी

विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥
आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥
भेद अभेददाचें मूळ आधीं खंडी । भजन तें तोंडीं मग गोड ॥३॥
एका जनार्दनीं शुद्ध हे वासना । तैं नारायणा प्रिय भक्ति ॥४॥

अभंग ३२२४

विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर

विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं ॥१॥
शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेची ॥२॥
उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं विषयाच्या संगें । कर्मकांड लागे भोगणे तेथें ॥४॥

अभंग ३२२५

भुलले पामर नेणती ते शुद्धी

भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा ॥१॥
म्हणवोनि येत करूणा । परी संतचरनां न लागती ॥२॥
खरें खोटें ऐसें न कळेचि जीवा । कां न भीति भेवा यमाचिया ॥३॥
एका जनार्दनीं किती हें सागावेरं । उगवेना दावें गळां बंध ॥४॥

अभंग ३२२६

देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी

देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥
तूं तें तूंचि पाहीं तूं तें पाही । पाहूनियां राही जेथीच्या तेथें ॥२॥
तूं तें तूंचि पाही जेथें देहो नाहीं । मीपणे कां वायां गुंतलासी ॥३॥
एका जनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥४॥

अभंग ३२२७

निज दृष्टीवरी जाण

निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून ॥१॥
याचा नको घेऊं वारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥
कामक्रोधाचें हें बंड । याचें छेदी विवेकें तोंड ॥३॥
शांति क्षमा धरूनि आधीं । ब्रह्माज्ञान मग साधीं ॥४॥
हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एका जनार्दन ॥५॥

अभंग ३२२८

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥
ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥
एका जनार्दनीं अनुतापाविण । भजन प्रमाण नोहे देवा ॥३॥

अभंग ३२२९

अनुताप नाहीं ज्यासी

अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुमजे मानसीं ॥१॥
मुख्य पाविजे अनुताप । तेणें निरसे त्रिविधताप ॥२॥
अनुतापावांचुन । ब्रह्माज्ञान होय दीन ॥३॥
एका जनार्दनीं शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥४॥

अभंग ३२३०

वैराग्य अनुताप जाहलियावांचुन

वैराग्य अनुताप जाहलियावांचुन । रामनाम वदनीं न ये बापा ॥१॥
मुख्यत्वें कारण साधीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥
विरक्ति देहीं जाहलियावांचुनीं । शांति समाधानी नये बापा ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । जन्माची आयणी न चुके बापा ॥४॥

अभंग ३२३१

अनुतापावांचुनी नाम न ये मुखा

अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥
मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥
अनुताप जाहलिया सहज समाधी । तुटेल उपाधी सहजचि ॥३॥
एका जनार्दनीं अनुतापें पाहे । मग देव आहे जवळी तया ॥४॥

अभंग ३२३२

मुख्य पाहिजे अनुताप

मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप ॥१॥
कोरड्या त्या ज्ञानगोष्टी । अनुताप नाहीं पोटीं ॥२॥
अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥३॥
एका जनार्दनीं तप । अनुताप हेंचि देख ॥४॥

अभंग ३२३३

सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान

सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥
ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥
नश्वर देह म्हणती ज्ञानेंच निंदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणे फुंजें ॥३॥
सच्चिदानंद माया या नांवें । याहुनी परती स्थिति तें तें ज्ञान जाणावें ॥४॥
एका जनार्दनीं अनुतापाची गोडी । ज्ञानाज्ञानाची तोडोनि सांडिली बेडी ॥५॥

अभंग ३२३४

प्रकाश भासे सर्पाकार

प्रकाश भासे सर्पाकार । सर्प नसोनि जेवीं दोर ॥१॥
कृष्ण वर्ण रक्त श्वेत । स्फटिकीं जेवीं भासत ॥२॥
ऐशी त्रिगुणांची मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

अभंग ३२३५

साधक सर्वदा पुसती

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥
एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविधा वृत्ती वाढे ॥२॥
एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नोहे एकविधता ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण । चित्तचैतन्य संपुर्ण ॥४॥

अभंग ३२३६

पहा कैसा देवाचा नवलावो

पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥
पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥
पाहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देहीं दाटला देव माझ्या ॥३॥
एका जनार्दनीं कैसें नवल जाहलें । दिशाद्रुम दाटले देहें सहजीं ॥४॥

अभंग ३२३७

तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा

तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥
तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥
एका जनार्दनीं तोचि पुरुषोत्तम । मनासी आराम तया ठायीं ॥३॥

अभंग ३२३८

चतुर्भुज श्याममुर्ति

चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां ॥१॥
देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयातें ॥२॥
दोघा होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥३॥
छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा । एका जनार्दनीं त्याचा । देव होय अंकित ॥४॥

अभंग ३२३९

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥
त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥
हरि हरि हरि म्हणतां वाचे । हरिरंगीं नाचे तोचि धन्य ॥३॥
शास्त्राची व्युप्तत्ती प्रसन्न वागेश्वरी । ती सारजा मुख्य करी नृत्य तेथें ॥४॥
शास्त्र अभिमानें चढला ताठा । मुक्ति ते फुकटा अंतराले ॥५॥
एका जनार्दनीं स्वहितीं तूं नाचे । बोलणें अभावाचें बोलुं नको ॥६॥

अभंग ३२४०

हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा

हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला ॥१॥
कोरडिया काष्ठीं प्रगटले हरी । म्हणवोनि नृत्य करी तयापुढें ॥२॥
विणा वाहातु गातु नारदु नाचे । न कळे तयाचें महिमान ॥३॥
जनाभिमानें धरिली प्रतिष्ठा । वंचला करंटा मुक्तिसीच ॥४॥
साच अथवा लटिकें नाचतु रंगीं । अभिमान भंगी पैं होय ॥५॥
निरभिमानिया जवळीच देवो । एकाएकीं भावो जनार्दनीं ॥६॥

अभंग ३२४१

जाणा याचा तुम्ही भाव

जाणा याचा तुम्ही भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥
एकविध भक्ति करा । तेणें घरां धांवतों ॥२॥
सर्वभावें अर्पा मन । हेंचि साधन तुम्हांसी ॥३॥
संसाराचा नका घोक । सर्व देव पुरवितो ॥४॥
लाजतसे आपुल्या नांवा । म्हणोनि सेवा करी त्याची ॥५॥
ब्रीद साच हें जगीं । नुपेक्षी यालागीं दीनातें ॥६॥
एका जनार्दनीं ठाव । धरा भाव दृढ मनीं ॥७॥

अभंग ३२४२

कायिक वाचिक मानसिक भाव

कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥
काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥
आशा मनीषा तृष्णा पडतील वोस । धरितां उल्हास रामनामीं ॥३॥
एका जनार्दनीं विश्वास हो मनीं । प्रत्यक्ष पुराणां बोलिलें तें ॥४॥

अभंग ३२४३

आधीं शुद्ध करा भाव

आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव ॥१॥
नका पडुं वायां भरी । चित्त नागवें निर्धारीं ॥२॥
भाव जाहलिया शुद्ध तत्त्वतां । मग देव होय प्राप्ता ॥३॥
एका जनार्दनीं देव । जेथेम जाय तेथें आहे ॥४॥

अभंग ३२४४

देव देव म्हणोनि फिरताती वेडे

देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥
पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥
एका जनार्दनीं आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ॥३॥

अभंग ३२४५

देहींच देहीं बिंबला देवी

देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥
आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥
एका जनार्दनीं भरला देव । तयाविण रिता नाहीं ठाव ॥३॥

अभंग ३२४६

देवासी तो भाव पुरे

देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥
भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजीं ॥२॥
भावे प्राप्ति होय देव । अभक्तसी संदेह । जवळी असोनी देव । नाहीं म्हणती ॥३॥
भावें देव घरीं नादे । एका जनार्दनीं आनंदें । म्हणोनि संतवृदें । तया न विसरती ॥४॥

अभंग ३२४७

मेघ वर्ष निर्मळ जळ

मेघ वर्ष निर्मळ जळ । जैसें बीज तैसें फळ ॥१॥
तया परी भक्ति कीजे । बीजासारिखें फळ घेईजे ॥२॥
उत्तम अलंकार गोमटे । तेथें नाक असे नकटें ॥३॥
भजना जातां लाज वाटे । वेश्याघरीं भांग घोटे ॥४॥
एका जनार्दनीं नर । प्रत्यक्ष जाणावा तो खर ॥५॥

अभंग ३२४८

एक निष्ठा धरी बापा

एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतों हा सोपा ॥१॥
देहीं भाव धरी भोळा । पाहें विठ्ठल सांवळा ॥२॥
मन करितां चंचळ । देव न येचि जवळ ॥३॥
ऐसा कल्पनेचा संग । तिळभरी नको अंग ॥४॥
सच्चिदानंद निरंजन । शरण एका जनार्दन ॥५॥

अभंग ३२४९

तळीं पृथ्वीवरी गगन

तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान ॥१॥
रूप नाम वर्नाश्रम । कर्म अकर्मक बद्धतां ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । ऐशी वेद बोले साक्ष ॥३॥
एका जानर्दनीं शुद्ध । नाहीं भेद भुतमात्रीं ॥४॥

अभंग ३२५०

गजाचें भार वोझें

गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे ॥१॥
तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणीं ॥२॥
मेघ वरुषे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसें फळ ॥३॥
एका जनार्दनीं गुण । चंदन वेळू नोहे समान ॥४॥

अभंग ३२५१

देव नाहीं ऐसे स्थळ

देव नाहीं ऐसे स्थळ । रितें कोठें आहे सकळ ॥१॥
पाहतां सर्वाठायीं देव आहे । अणुरेणु भरुनी उरला पाहे ॥२॥
एका जनार्दनीं देव । पाहतां समूळ एक भाव ॥३॥

अभंग ३२५२

एक धरलिया भाव

एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥
नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥
ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं ॥३॥
अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥

अभंग ३२५३

भोगें चिताविसील नाना दुःखें

भोगें चिताविसील नाना दुःखें । तो तूं भोगचि भोगसील सुखें ॥१॥
मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥
भोग जैं आले वाडवाड । तुझें आंख अंग आम्हां आड ॥३॥
एका जानर्दनींक एक वर्म । माझेनि नावें तूंचि भोगी कर्म ॥४॥

अभंग ३२५४

त्रिभुवनीं ज्याची सत्ता

त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥
म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥
एका जनार्दनीं भाव । त्याचे पायीं ठेवा जीव ॥३॥

अभंग ३२५५

मातेचा आठव बाळावरी स्नेहो

मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा ॥१॥
बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥
बोबडें साबडें असोत तें बाळ । तैसा धरा कळवळ देवावरी ॥३॥
एका जनार्दनीं देव धरा मनीं । आसनीं शयनीं विसरूं नका ॥४॥

अभंग ३२५६

वत्सालागीं गोप धाउनी वारसे

वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥
पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥
मातेलागीं चुके बाळ एकुलतें । तैसें देवापरतें न धरा मनीं ॥३॥
एका जनार्दनीं देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेणें ॥४॥

अभंग ३२५७

नमस्कारी जंव अष्टांगें

नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें ॥१॥
आतां जमन कैसें हो कीजे । देवपणा न येचि दुजें ॥२॥
स्तुतिस्तवन बोलों भावो । तंव वायांची जाली देवो ॥३॥
स्तवन करूं आतां कैसें । स्तवावया दुजें नसे ॥४॥
आतां भजन कैशापरी । संसारा नुरेचि उरी ॥५॥
एका जनार्दना शरण । तंव तो जाला जनार्दन ॥६॥

अभंग ३२५८

निकट असतांची देव

निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥
ऐसे व्यापले मूढपणें । विसरले जनार्दनें ॥२॥
जे पासाव सर्व युक्ति । तयातें मुमुक्षु वदती ॥३॥
ऐसा ज्ञानियाचा भाव । तया देवपण दिसे वाव ॥४॥
ज्ञानविज्ञान नको देवा । मज चरणाजवळीं ठेवा ॥५॥
एका जनार्दनीं वाणी । दुजी नको अंतःकरणीं ॥६॥

अभंग ३२५९

ऐसा रोगाचा पवाडु

ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु ॥१॥
कामक्रोधाचा उफाडा । शांति क्षमेचा दिला काढा ॥२॥
देतां नाममात्रा रसायन । प्रपंच रोग जाहला क्षीण ॥३॥
निधडा वैद्य जनार्दन । एका जनार्दन शरण ॥४॥

अभंग ३२६०

कनक कांता न ये चित्त्ता

कनक कांता न ये चित्त्ता । तोची परमार्थी पुरता ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वायां व्युप्तत्तीचा भार ॥२॥
वाचा सत्यत्वें सोंवळी । येर कविता वोवळी ॥३॥
जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥

अभंग ३२६१

प्रपंच परमार्थ एकरुप होत

प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामीं ॥१॥
परमर्थे साधें सहज संसार । येथेंक वेरझार नाहीं जना ॥२॥
सहज संसारें घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ॥४॥

अभंग ३२६२

सुखे संसारा हा करी

सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥
दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥
रामनामाचें स्मरण । नाश पावे जन्ममरण ॥३॥
जयापाशीं नाम असे । नारायण तेथें वसे ॥४॥
एका जनार्दनीं नाम । संसार हा परब्रह्मा ॥५॥

अभंग ३२६३

निवांत बैसें तूं अचळ

निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥
सोडीं मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं ॥२॥
नको समाधी उन्मनी । धांवूं नको सैरा रानीं । एका जनार्दनाचे चरणीं । दृढभावें विनटे ॥३॥

अभंग ३२६४

नित्य ध्यातां हरिचे चरण

नित्य ध्यातां हरिचे चरण । करी भक्त दुःखहरण ॥१॥
चरणरज पवित्रता । सदा घ्यावेंचि माथा ॥२॥
लागला पाषाणा चरण । ती स्त्रीची जाली पावन ॥३॥
ऐसें चरणींचे मान । शरण एका जनार्दन ॥४॥

अभंग ३२६५

स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा

स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा ॥१॥
वेदींचें वचन वेदीं तें प्रमाण । एक नारायण सार जप ॥२॥
शास्त्रांचा प्रभाव शास्त्रिकांसी ठावा । उघड जपावा राममंत्र ॥३॥
न करी आळस नको पडों भरीं । एका जनार्दनीं हरी स्मरे देहीं ॥४॥

अभंग ३२६६

चिंतातुर मन नसावें कदाकाळीं

चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥
श्रीअनंता माधवा गोविंदा । हाचि जप सदा चिंत्तामाजीं ॥२॥
वारंवार चिंतावीं देवाचीं पाउलें । जेणें जन्मजाळें उकलेल ॥३॥
एका जनार्दनीं आलासे प्रत्यय । सर्वभावें गाय नाम त्याचें ॥४॥

अभंग ३२६७

गोविंद गोपाळ वदतां वाचे

गोविंद गोपाळ वदतां वाचे । पायीं यमदूताचें भय नाहीं ॥१॥
नित्य जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन तया नाहीं ॥२॥
उठतां बैसतां खेळतां हासतां । गोविंद गीतीं गातां मोक्ष जोडे ॥३॥
गोविंदाचें नाम सदा ती समाधी । एका जनार्दनीं उपाधी तुटली त्याची ॥४॥

अभंग ३२६८

सांडा सांडा वायां छंद

सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥
नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥
पडाल यमाचे पीडणीं । लक्ष चौर्‍यांयशीं पतनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥

अभंग ३२६९

वेरझार खुंटे नाम वदतां वाचे

वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥
तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥
एका जनार्दनीं वाचे जपे नाम । आणिक दुर्गम साधन नको ॥३॥

अभंग ३२७०

हित अनाहिताचीं असतीं वचनें

हित अनाहिताचीं असतीं वचनें । तेथें अनुमोदन देतां भलें ॥१॥
परमार्थाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेथें नारायण संतोषत ॥२॥
विषयिक वचना देतां अनुमोदन । तेणें नारायण क्रोध पावे ॥३॥
भक्तिप्रेम वचना द्यावें अनुमोदन । तेणें नारायण संतोषत ॥४॥
दुर्बुद्ध वचना देतां अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ॥५॥
संतांचें वचना द्यावें अनुमोदन । तेणें नारायण संतोषत ॥६॥
असंतांचें वचनीं द्यावें अनुमोदन । तेणें नारायण क्रोध पावे ॥७॥
एका जनार्दनाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेणें जनार्दन संतोषतो ॥८॥

अभंग ३२७१

दाता तोचि म्हणावा

दाता तोचि म्हणावा । नामावांचोनि नेणें जीवा ॥१॥
थोर तोचि म्हणावा । नेणें भूताचा तो हेवा ॥२॥
लहान तोचि म्हणावा । काया वाचा भजे देवा ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे । देवावांचुनी कांहीं नेणें ॥४॥

अभंग ३२७२

उत्तम पुरुषाचें उत्तम लक्षण

उत्तम पुरुषाचें उत्तम लक्षण । जेथें भेद शून्य मावळला ॥१॥
भेदशुन्य जाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ॥२॥
जिकडे पाहे तिकडे उत्तम दरुशन । दया शांति पूर्ण क्षमा अंगीं ॥३॥
एका जनार्दनीं उत्तम हें पाप्ती । जेथें मावळती द्वैताद्वैत ॥४॥

अभंग ३२७३

जेथें सत्त्वाचें प्राधान्य

जेथें सत्त्वाचें प्राधान्य । जेथें सात्विकाचें आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥
जेथें राजाचें प्राधान्य । त्याचें लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाहीं ॥२॥
जेथें प्राधान्य तामस । तो द्वेषी आणि कर्कस । ज्ञान सांगे अपरोक्ष । परी अंतईं कठीण ॥३॥
जेथें प्राधान्य तूर्या । तेथें सत्त्व शांति दया । विवेक वैराग्य करूनियां । सर्वासीं भजे ॥४॥
जो वस्तु झाला केवळ । त्याचें अंतर निर्मळ । भूतमात्रीं दयाळ । सर्वापरी भजत ॥५॥
जेथें रज तम वसती । तेथें द्वेष लोभ नांदती । त्याचे संगें ज्ञानज्योती । विझोनि जाये ॥६॥
एका जनार्दनीं शरण । जेथें शुद्ध सत्वाचें प्राधन्य । तो वस्तुसी जाय । मिळोनि सहजीं सहज ॥७॥

अभंग ३२७४

म्हणा तुम्हीं विष्णुदास

म्हणा तुम्हीं विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी ॥१॥
उघडा मंत्र विठ्ठल हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ ॥२॥
न लगे कांहीं साधन । वाचे म्हणा रामकृष्ण । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनेंसी ॥३॥

अभंग ३२७५

आपुला न टाकीं पां आचार

आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥
त्यातें म्हणणें संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥
अथीतासी द्यावें अन्न । गोब्राह्मणांचें पूजन । मुखीं नामस्मरण । तोचि एक संसारीं ॥३॥
सांडोनियां गृह दारा । धांव घेतली डोंगरा । अंतरीं भरला सारा । विषयीक भाव ॥४॥
बकाचे परि ध्यान । नको नको अनुष्ठान । एका जनार्दनीं मन । स्थिर करीं सर्वदा ॥५॥

अभंग ३२७६

नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं

नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं । तिहीं तें पावावी चित्तशुद्धि ॥१॥
चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारायणा एका भावें ॥२॥
विवेक वैराग्य प्राप्ति तत्प्रसादें । चित्ता लागे वेध सद्‍गुरूचा ॥३॥
सदगुरुकृपेनें पूण बोध होय । नित्य त्याचें हृदयीं धरी ॥४॥
एका जनार्दनीं ठेवूनियां मन । मनाचें उन्मन पावलासे ॥५॥

अभंग ३२७७

न कळे जयाचें विंदान

न कळे जयाचें विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥
ऐसा आकळ त्रिभुवनीं । न कळे वेद शास्त्रां मनीं । पुराणांची आयणी । कुंठीत जाहली ॥२॥
तो सोपा नाममंत्रें । वाचे वर्णितां पवित्रें । एका जनार्दनीं वक्त्रें । म्हणा रामकृष्ण हरी ॥३॥

अभंग ३२७८

कायावाचामनें छंद

कायावाचामनें छंद । धरा गोविंद ह्रुदयीं ॥१॥
नका जाऊं लिगाडामागें । ऐसें सांगे वेदशास्त्र ॥२॥
पुराण पठण यज्ञयाग । नोहे भाग कलीमाजीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम सार । उतरील पार भवसागरीं ॥४॥

अभंग ३२७९

निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी

निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥
चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥
ध्यान ते दृष्टी भरूनि पहावें । आलिंगन द्यावें वेळोवेळां ॥३॥
हृदयकमळीं पहावा तैसा ध्यावा । एका जनार्दनीं विसावा सहजची ॥४॥

अभंग ३२८०

शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा

शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥
सर्व भावें जावें नाम वाचे गावें । जिवलगा भेटावें विठोबासी ॥२॥
साधुसंत गाती आनंदें नाचती । क्षेम तयाप्रति द्यावें सुखें ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल । जन्ममरण निवारेल हेळामात्रें ॥४॥

अभंग ३२८१

व्यापूनियां भरला देव

व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥
तयाचें करा रे चिंतन । मग तुम्हां न पडे न्यून ॥२॥
वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥
मागें पुढें उभा असे । एका जनार्दनीं दिसे ॥४॥

अभंग ३२८२

भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवीं

भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवीं । जनीं जनार्दन वागवी देह सर्व ॥१॥
भुक्ति आणि मुक्ति कासया तें वोझें । जनार्दनें सहजें निर्दाळिलें ॥२॥
कल्पिक कल्पना आवरुनी ठायीं । जनार्दन पाहीं सबराभरीत ॥३॥
त्याचियेनी सत्ते जाहलीसे मिळणी । एका जनार्दनीं एकमय ॥४॥

अभंग ३२८३

विश्वपाळिता हे हरी

विश्वपाळिता हे हरी । दासा केवीं तो अव्हेरी ॥१॥
नव मास गर्भवास । नाहीं भागला आम्हांस ॥२॥
बाळपणीं वांचविलें । स्तनीं दुग्ध तें निर्मिलें ॥३॥
कीटक पाषाणांत वसे । त्याचें मुखीं चारा असे ॥४॥
धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥५॥

अभंग ३२८४

जनार्दन पाया धरूनियां राहें

जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें ॥१॥
स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें श्रुति पिसें लागलेंसे ॥२॥
जाणीव नेणीव सांडोनियां मागें । शरण रिघे वेगें एका जनार्दनीं ॥३॥

अभंग ३२८५

मेघदर्शनें मयूर नाचतीं

मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥
धेनुदर्शन वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥
सुर्यदर्शनें जीवाते सुख होय । पितृदर्शनें सुपुत्रा आनंद होय ॥३॥
मातृदर्शनें कन्या सुख मानें । मित्रदर्शनें सुमित्रा आनंदी ठाणें ॥४॥
या रिति सतत चिंतितां हरी । एका जनार्दनीं धन्य संसारीं ॥५॥

अभंग ३२८६

स्वामीदर्शनें पतिता आनंद

स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥
यापरी आनंद सदा मनीं हरि । वांचूनी छंद दुजा नाहीं मनीं ॥२॥
एका जनार्दनीं प्रेमयुक्त छंद । गीता गातां आवडी गोविंद ॥३॥

अभंग ३२८७

होउनी उदास

होउनी उदास । मागा प्रेम सावकाश ॥१॥
उभा विटेवरी उदित । देतां न पाहे चित्त वित्त ॥२॥
जें जें पाहिजे जयालागीं । तें तें देतो त्या प्रसंगीं ॥३॥
न म्हणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥
एका जनार्दनीं म्हणा दास । करा आस निर्भय ॥५॥

अभंग ३२८८

अगाध चरणाचें महिमान

अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन ॥१॥
चरणें तारिलें पाषाण । चरणें तारिलें भक्तजन ॥२॥
तारियेलें प्रल्हादासी । उद्धारिले अजामेळासी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । चरण तिहीं लोकीं पावन ॥४॥

अभंग ३२८९

चरणांची थोरी

चरणांची थोरी । जाण गौतम सूंदरीं ॥१॥
हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरी ॥२॥
करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी ॥३॥
समचरणींची शोभा । एका जनार्दन उभा ॥४॥

अभंग ३२९०

चरण वंदिती का निंदिती

चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥
एक तरले चरण पूजितां । कोणी तरलें चरण ध्यातां ॥२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिले शिशुपाळा ॥३॥
ऐसें चरणाचें महिमान । एका जनार्दनीं शरणक ॥४॥

अभंग ३२९१

नीर मंथुनी मंथन पैं केले

नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥
ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥
मंथन करितां बुडाला रवी । सर्वांगी सर्व निज नाचवी ॥३॥
एका जानर्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥

अभंग ३२९२

नवजों योगाचिया वाटा

नवजों योगाचिया वाटा । न चढों आगम निगम ताठा । न लागों उपामाळा खटपटा । आत्मनिष्ठ होउनी असों ॥१॥
विठ्ठल उघड विराजित । साबाह्माभ्यंतर नांदत ॥२॥
कर्मे करुनीं नव्हों कर्मठा । निष्कर्माच्या न लागों झटा । संतरज आमुचा वांटा । मुक्ति फुकटा तेणें लाभे ॥३॥
न करूं दुस्तरें तीं तपें । न पडो अध्यात्म खरपें । एका जनार्दनीं कृपें । आत्मसुख अमुप विचरिजेक ॥४॥

उध्दवास बोध
अभंग ३२९३

शहाणा तो जाण रे

शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहें रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥
उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकतां । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥
सज्ञान तोची रे उद्धवा । ज्याची जाणीव विरे । अज्ञान तोची रे उद्धवा । ज्ञानग्र्वें हुंबरे ॥३॥
साधु तोची रे उद्धवा । जो सद्वस्तुतें दावी । असाधु तोची रे उद्धवा । देही प्रपंची गोवी ॥४॥
धर्मिष्ठ तोची रे उद्धवा । जो जन्ममरण निवारी । अधर्मीं तोची रे उद्धवा । लोभ दंभ शरीरीं ॥५॥
सुख तें जाण रे उद्धवा । जेथें मी तुं पण नुरे । दुःख ते जाण रे उद्धवा । काम सुखासी झुरे ॥६॥
शम तो जाण रे उद्धवा । ज्याची आत्मत्वें बुद्धीं । दम तो जाण रे उद्धवा । तो त्यागी उपाधी ॥७॥
धृतीची धारणा रे उद्धवा । जिव्हा उपस्थ जिंके । सोलीव करंटा तोचि रे उद्धवा । जिव्हा उपस्थी आटके ॥८॥
तप तें जाणरे उद्धवा । नित्य नामस्मरण । अभागी तोची रे उद्धवा । नामीं विन्मुखपण ॥९॥
बळिया बलिष्ठ तोची रे उद्धवा । निज मानसीं जिंकणें । नपुंसक तोची रे उद्धवा । मनामागें धांवणें ॥१०॥
लाभ तो जाण रे उद्धवा । नित्य भगवद्भक्ती । अलाभ तो जाण रे उद्भवा । सम ब्रह्मा देखणें ॥११॥
सत्य तें जाण रे उद्धवा । सम ब्रह्मा देखणें । असत्य तेंची रे उद्धवा । जो देह मी म्हणे ॥१२॥
वाचा सत्य अनुवादणें । तें लोक सत्य । सम ब्रह्मा न देखणें । तें अलक्ष्य निर्धूत ॥१३॥
उत्तम धर्म तोची रे उद्धवा । निज धर्म ज्या गांठीं । अधर्म तोची रे उद्धवा । धनलोभीया दृष्टी ॥१४॥
पावन यज्ञ तोची रे उद्धवा । द्विजमुखीं अर्पें । अधम यज्ञ तो उद्धवा । लोभावरी समर्पे ॥१५॥
वरिष्ठ लक्ष्मी ती जाण रे उद्धवा । सर्वभावीं निरास । अलक्ष्मी ते रे उद्धवा । ज्यासी आशापाश ॥१६॥
भाग्य तें जाण रे उद्धवा । वैराग्य बाणें । अभाग्य तेंची रे उद्धवा । जो देहीं मी म्हणे ॥१७॥
ईश्वर तोची रे उद्धवा । ज्यासी सर्व सत्ता । अनीश्वर तोचि रे उद्धवा । ज्यासी स्त्री आधीन जीविता ॥१८॥
पवित्र तोची रे उद्धवा । कर्मीं ब्रह्मा प्रीती । अपवित्र तोचि रे उद्धवा । कर्मीं बद्धप्राप्ती ॥१९॥
पंदित तोची रे उद्धवा । जो देह अहंता छेदी । मूर्ख तोचि रे उद्धवा । देह अभिमानी बुद्धी ॥२०॥
संन्यासी तोची रे उद्धवा । सर्व संकल्प त्यागी । परगृहीं तोची रे उद्धवा । मोह ममता अंगीं ॥२१॥
स्वर्ग तो जण रे उद्धवा । नित्य संग संतीं । नरक तो तो जाण रे उद्धवा । नित्य अधर्मीं वृत्ती ॥२२॥
सखा तो जाण रे उद्धवा । स्वयें सदगुरुराव । वैरी तो जाण रे उद्धवा । देहीं अहंभाव ॥२३॥
दरिद्री तो जाण रे उद्धवा । ज्यासी लोलुप चित्तीं । कृपण तोची रे उद्धवा । द्रव्यदारा आसक्ती ॥२४॥
एका जनार्दनीं कवित्य । चित्तीं चैतन्य गोड । एकीं एकहीं धरितां । पुर्व सर्वहीं कोड ॥२५॥

अभंग ३२९४

भावें जनार्दन बोले उद्धवासी

भावें जनार्दन बोले उद्धवासी । बारे तूं परीयेसी गुह्मा गोष्टी ॥१॥
गुह्मा गोष्ट तुज सांगतों निभ्रांत । हृदयें फुटत आनंदेंसी ॥२॥
आनंदाचा रस न संडी प्रसंग । होसी जीवलग म्हणोनियां ॥३॥
म्हणोनी उद्धवा तुजसी बोलतां । भेदाचीये वार्ता नाहीं मज ॥४॥
मज तुज कांहीं नाहीं भिन्न भेद । कैवल्याचा सिद्ध तूंची एक ॥५॥
तूंची एक भक्तमाजीं शिरोमणी । आवडसी मनीं सर्वकाळ ॥६॥
सर्वकाळ तुज ध्याई अहर्निशीं । आनंद मानसीं समाधान ॥७॥
समाधीं विश्रांतीं मंडण ज्ञानाचा । नाहीं प्रपंचाचा लेश कांहीं ॥८॥
कांहीं एक क्रृष्णमुखीं गोष्टीलागीं । उद्धव सर्वांगी श्रवणार्थ ॥९॥
श्रवणीं सादर हरिमुख न्याहाळीं । सुखाचें कल्लोळीं प्रेमयुक्त ॥१०॥
प्रेमयुक्त पाहे सांवळें रूपडें । तेज चहूंकडे फांकतसे ॥११॥
फांकतसे तेज कुंडलाचे दाटी । वैजयंती कंठीं वनमाळा ॥१२॥
वनमाळा मुद्रिका चिद्रानें मुगुटा । कासेसी गोमटा पीतांबर ॥१३॥
पीतांबरधारी श्रीमुख सुंदर । चरणीं तोडर गर्जतसे ॥१४॥
गर्जती नेपुरें आरुणें रंगीला । टिळक रेखिला केशराचा ॥१५॥
केशराचा टिळक कुंकमाचीं पदें । उद्धव स्वानंदें लोळतसे ॥१६॥
लोळतां देखिला भक्त वेळाइते । आलिंगन देत उद्धवासी ॥१७॥
उद्धवा मज चाड नाही तपसाधनीं । नामसंकीर्तनीं प्रीत सदा ॥१८॥
सदा माझें नाम गाती जे भावेंसी । त्यासी मी मानसीं न विसंबें ॥१९॥
न विसंबें भक्ता नाम जया मुखीं । सरतां तिहीं लोकीं होय जाणा ॥२०॥
जाण नामासरी न पवे ब्रह्माज्ञान । तीर्थादि भ्रमण व्यर्थ पाहीं ॥२१॥
पाहे पां प्रल्हाद आसनीं शयनीं । नामाही वांचोनीं दुजें नेणें ॥२२॥
दुजें नेणें एक द्रौपदीं बहीणुली । हर्षें ते वेल्हाळी नाम स्मरे ॥२३॥
नाम स्मरतां गजेंद्रा तुटले बंधन । पतितपावन नाम श्रेष्ठ ॥२४॥
नाम सुखानंदें भवानीशंकर । जपे निरंतर नाम माझें ॥२५॥
माझ्या नामरंगीं गोपाळ गजरीं । घालती घुमरी आल्हादेंसी ॥२६॥
आल्हादें नाचती प्राण माझे ठायीं । सर्वांसी मी पाहीं त्यासारिखा ॥२७॥
सारिखाची होय थोरा आणि साना । जैसी हे वासना जनार्दनीं ॥२८॥
जनार्दना गातां धाक यमदूतां । येणें जाणें वार्ता तेथें कैंची ॥२९॥
कैंचा कळिकाळा पळे दशदिशा । माझ्या नामसरिता न राहेची तो ॥३०॥
चित्त मनें शुद्ध गाती माझें नाम । त्याचे दासीकाम करीन सत्य ॥३१॥
सत्य वोळंगणें भक्तांचें रंगणीं । वंदी पायवणी निजभावें ॥३२॥
भावाचा मी भोक्ता नावडेची कांहीं । नामालागीं पाही अंकीत मी ॥३३॥
अंकीत मी होय श्रवणीं संतुष्ट । तयासी वकुंठ आइतेंची ॥३४॥
आइताची ठेवी जीव तयावरी । निबलोण करी वेळोवेळां ॥३५॥
वेळोवेळां त्याचे द्वारींच तिष्ठत । नाहींच पाहत मानामान ॥३६॥
मानामान सर्व सांडिले उद्धवा । भक्तिप्रेमभावा लागोनियां ॥३७॥
लागवेग मज सप्रेम कीर्तनीं । लक्ष्मीं डावलोनि नामप्रेम ॥३८॥
प्रेम नाहीं मज योगी हृदयकमळीं । सवितां मंडळी स्थिर नव्हे ॥३९॥
नव्हे मी संतुष्ट महा यज्ञदानीं । पंचाग्नि साधनीं चाड नाहीं ॥४०॥
चाड असे तेथें हरिनाम गाती । त्याच्या पुण्या मिती ब्रह्मा नेणें ॥४१॥
ब्रह्मायाचा सुत नारद विख्यात । स्वबोधें डुल्लत नामबळें ॥४२॥
नामबळें देखा तरला चांडाळ । नेला आजामेळ मुक्तिपंथा ॥४३॥
मुक्तिपंथें नेलो नाम घेतां वाणी । तात्काळ कुंटणी तारियेली ॥४४॥
तारिल्या गोकुळीं गोपिकां सुंदरी । तयाचें शरीरीं मीच वसें ॥४५॥
वसे घरोघरीं प्राण माझे ठायीं । न विसंबती पाही क्षण मज ॥४६॥
मज आठविती उठतां बैसतां । दळितां कांडितां नाम माझें ॥४७॥
मज आठविती चालतां बोलतां । गाइते दुहिता नाम माझें ॥४८॥
माझिये स्मरणीं सुखाचे शेजारीं । प्रीति पडिभरी चित्त त्यांचें ॥४९॥
चिताचा चोरटा ज्यासी जैसा भाव । त्यासी मी वासुदेव तैसा होय ॥५०॥
ज्यासी माझे भजनीं संभ्रम । त्यासी मी आत्माराम प्रियकर ॥५१॥
प्रियकर आत्मा म्हणोनियां जाण । केलें निरूपण भक्तराया ॥५२॥
भक्तासी उपाव नामींच विस्तार । नाहीं आन थोर नामेंविण ॥५३॥
नाम सारासार ओंविया चौपन्न । करिती पठण निजभावें ॥५४॥
भावें उच्चारीं होय पाप धुणी । एका जनार्दनीं संकीर्तन ॥५५॥

मनास उपदेश
अभंग ३२९५

मन एके ठायीं

मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥
सर्व साधनांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥
एकाग्र तें मन । करूनि करावें भजन ॥३॥
मन जिंकावें पां आधीं । तेणें तुटेल उपाधी ॥४॥
एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधुन ॥५॥

अभंग ३२९६

मनें करूनि विश्वास

मनें करूनि विश्वास । संतचरणीं व्हा रे दास ॥१॥
आणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥
मन धरी मृष्टीमाजीं । वाव तूम न शिणे सहजीं ॥३॥
मन दृढ देवापायीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥

अभंग ३२९७

मनें कल्पोनियां केली विटंबना

मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥
तैसें नका करूं वाउगें चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥
मनाचें आकलन करावें पां आधीं । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥
एका जनार्दनीं आवरुनी मन । मग करीं भजन सुखरूप ॥४॥

अभंग ३२९८

नका धावूं तुम्हीं सैरा

नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा ॥१॥
मन करा पैं आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥
मन आहे महापापी । लावावें तें हरिरुपी ॥३॥
मन स्थिर करूनी निश्चयें । एका जनार्दनीं पाहे ॥४॥

अभंग ३२९९

करितां अनुष्ठान

करितां अनुष्ठान । मन धांवे सहज जाण ॥१॥
मंत्र जंत्र यंत्र भेद । मनें केला वादावाद ॥२॥
आधीं मनातें जिंकावें । सहज रूप मग पहावें ॥३॥
मन करे आधीन आधीं । एका जनार्दनीं तुटे व्याधी ॥४॥

अभंग ३३००

मन करूनियां सावध

मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥
तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥
मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥
मन धांवे भलतीकडे । साधन वायां जाय कोडें ॥४॥
मन आवरुनी साधन । तेणें पावसी निजखुण ॥५॥
खूण संतांवांचुनी । एक जानार्दनीं ध्यानी ॥६॥