वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग २५०१ ते २६००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग २५०१ ते २६००

अभंग २५०१

सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त नयनीं

सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त नयनीं । अश्रु अंगीं स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्च्छित वो ॥१॥
माझें मजलागीं गुरुकृपा मन तें जालें उन्मन वो । देही देह कैसा विदेह जालें क्रिया चैतन्यघन वो ॥२॥
माझें मीपण पहातां चित्तीं चित्त अचिंत वो । वृत्तिनिवृत्ति तेथें चिद्रुप जालो परमानंदें तृप्त वो ॥३॥
एका जनार्दनीं एकत्वें जन वन समसमान एक । एकपणें परिपुर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥

अभंग २५०२

असोनी देहीं आम्हीं विदेही भाई

असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥
माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
काय सांगु नवलाची कहाणी । पाहतें पाहणें बुडाले दोन्हीं ॥३॥
न पहावें न देखवें नायकावें कानीं । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥

अभंग २५०३

जाहली गेली तुटली खुंटली हाव

जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥
जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥
न कळे लाघव खेळ खेळ करूणादानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥३॥

अभंग २५०४

देव पाहतां मजमाजीं भेटला

देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥
माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुनें ॥२॥
एका जनार्दनीं पाहिलासे देव । फिटला संदेह आतां माझा ॥३॥

अभंग २५०५

पहावया गेलों देव

पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥
आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥
पाहतां पाहतां खुंटलें । देवपण मजमाजीं आटलें ॥३॥
परतलें दृष्टीचें देखणें । अवघा देव ध्यानेंमनें ॥४॥
एका जनार्दनीं देव । नुरे रिता कोठें ठाव ॥५॥

अभंग २५०६

कायावाचामनें

कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥
ऐसा समर्थ तो कोन । माझ्या जनार्दनावांचुन ॥२॥
माझें मज दाखविलें । उघडें वाचे बोलविलें ॥३॥
जनीं जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥

अभंग २५०७

सर्व देवांचा हा देव

सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥
त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥
वारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥
न मागें भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥
त्यांचें वेड माझें मनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

अभंग २५०८

आजी देखिलीं पाउलें

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥
मागील शीणभारु । पाहतां न दिसे निर्धारु ॥२॥
जन्मांचें तें फळ । आजी जाहलें सुफळ ॥३॥
एक जनार्दनीं डोळा । विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥

अभंग २५०९

सायासाचें बळ

सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकुळ ॥१॥
धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिलें हृदयीं ॥२॥
एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥

अभंग २५१०

मज करुं दिली नाहीं सेवा

मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे ॥१॥
जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥
भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । सर्वां ठायीं व्यापक जाण ॥४॥

अभंग २५११

मानसींच ध्यान मानसींच स्नान

मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करुं आम्हीं ॥१॥
न करुं साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वायां ॥२॥
मानसेंच तप मानसेंच जप । मानसीं पुण्यपाप नाहीं आम्हां ॥३॥
मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥
एका जनार्दनीं मानसी समाधी । सहज तेणें उपाधि निरसली ॥५॥

अभंग २५१२

मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ

मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे ॥१॥
मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥
मानसींच संध्या मानसीं मार्जन । मानसी ब्रह्मायज्ञ केला आम्हीं ॥३॥
मानसी आसन मानसीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥

अभंग २५१३

बहुत पुराणें बहुत मतांतरें

बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥
शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥
नोहे हें कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥
नोहे हें कामानिक आहे पैं निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीजें ॥४॥
एका जनार्दनीं माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५॥

अभंग २५१४

जो काळासी शासनकर्ता

जो काळासी शासनकर्ता । तोचि आमुचा मातापिता ॥१॥
ऐसा उदार जगदानी जनार्दन त्रिभुवनीं ॥२॥
आघात घात निवारी । कृपादृष्टी छाया करी ॥३॥
जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥

अभंग २५१५

आम्हां काळांचें भय तें काय

आम्हां काळांचें भय तें काय । जनार्दन बापमाय ॥१॥
पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥
दिशाद्रुम भरला पाहीं । जनार्दन सर्वाठायी ॥३॥
एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआंत ॥४॥

अभंग २५१६

स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता

स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥
नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥
नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥
एका जनार्दनीं नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥

अभंग २५१७

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥
आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥
एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥

अभंग २५१८

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥
तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥
अंगा देव तुं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥
एका जनार्दनीं सबाह्मभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय तें बोधे ॥४॥

अभंग २५१९

निरसिया वरू आपरूपें

निरसिया वरू आपरूपें । नुपजता लग्न लाविलें बापें ॥१॥
निरासिया वरू निरासिया वरू । निरासी गमला केला संसारू ॥२॥
निरासिया वरु साजिरा कैसा । अंगीचिया तेजें आरसा जैसा ॥३॥
निरासिया जोंवरी आस । संकल्पाशीं जो तोडितो पाश ॥४॥
आस निरास जाली पाही । एका जनार्दनीं सलग्न पायीं ॥५॥

अभंग २५२०

अविवेकें देखा नवल केलें

अविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लग्न लाविलें ॥१॥
गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केलें ॥२॥
पांचें सुरवाडी सासुरवाडी ये । अकल्पीचे शेजे निजलिये ॥३॥
अंगसंगेविण संतती जाहली । आब्रह्म कैसी तात्काळ व्याली ॥४॥
गुणाचेनि बळें वरसोनी पोटें । घरोघरीं भेटी नेत असे ॥५॥
सत्कर्म विवेकु पोटासी आला । तेणें जागविला आपुला व्याला ॥६॥
उठोनियां वरु संतती खाये । नोवरीसहित गेली माये ॥७॥
पितामहाचा पिता सुभानुतेजें । एका जनार्दनीं न दिजे दुजें ॥८॥

अभंग २५२१

एक माझी माता दोघेंजणे पिता

एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥
बंधु बहिणींस लग्न तें लाविलें । विपरीत झालें सांगवेना ॥३॥
एका जनार्दनीं सांगतसे गूढ । नाहीं तरी गुढ होउनी राहे ॥४॥

अभंग २५२२

विपरीत अर्थ ऐकतां कानीं

विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥
नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरें व्याला सांगुं काय ॥२॥
एक ब्रह्माचारीं कळिलावा मोठा । साठ पोरें व्याला पहा चोहटा ॥३॥
एक मेलें गर्भीं असतां गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥
एका जनार्दनीं उघडली दृष्टी । अर्थ पाहतां सुख होय पोटीं ॥५॥

अभंग २५२३

विटोळेंविण पोटा आला

विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥
लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाता ॥२॥
ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडीं ॥३॥
एका जनार्दनीं लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥

अभंग २५२४

बोलू नयें तें आले बोला

बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥
नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥
प्रौढ जाली आमुची आईं । बापाची नांवें त्या ठेविलीं पाहीं ॥३॥
लेकीनें बापासी केलें सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ॥४॥

अभंग २५२५

अवघ्या संसाराचा कळस जाला

अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥
पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥
अमोल्यांचें कुळ न सांगवें तोंडें । सोय धरी तरी सखीं भांवडें ॥३॥
पाठीम पोटीं बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥

अभंग २५२६

बोलणें बोलतां हेंचि दुर्घट

बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥
बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥
तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घात कुळगोत्र ॥३॥
कांहीं एक वेद बोलूं गेला बोली । चवंढाई चिरुनी तीन कोंडें गेलीं ॥४॥
श्लाघोनी भक्ती बोलूं गेलीं तोडें । बोल बोल तंव नवखंडे ॥५॥
लडिवाळ भक्त बोलोनी हांसे । बोल बोलें तंव लावियेलें पिसें ॥६॥
बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोले तंव दवडिलें राना ॥७॥
एका जनार्दनीं मौनचीं घोटी । एकपणें तेंही घातलें पोटीं ॥८॥

अभंग २५२७

बाप तोचि माय होउनी आला पोटीं

बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी ॥१॥
बाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥
मी बापापोटीं कीं बापु माझ्या पोटीं । वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥
एका जनार्दनीं जातक मौनी । जन्मनाम ठेविलें निःशब्द देउनी ॥४॥

अभंग २५२८

एकाचि दिठी एकाचे डोळे

एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥
सबाह्म अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥
यापरि रिगाले अभिन्न अंगीं । दोघे सामावाले अंगीच्या अंगीं ॥३॥
ऐसें लेकीनें बापासी बांधलें कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥

अभंग २५२९

माये आधीं लेक जन्मली

माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥
कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥
बापा आधीं लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥
वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनीं जाहली नवलपरी ॥४॥

अभंग २५३०

स्वामीसेवका अबोला

स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुनें भातें । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करुं नेदी हातीं । उसंत नाहें अहोरातीं ॥३॥
श्रद्धें विण अचाट सांगें । ढळॊं नेदी पुढें मांगें ॥४॥
न गणीं दिवस मास वरुषी । भागों जातां वहीच पुसी ॥५॥
चाव चावी करुं नेदी । सगळें गिळवी त्रिशुद्धी ॥६॥
जो कां ग्लानी साधन मागें । तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥
जो सेवा करी नेटका । त्यासी करुनी सांडी सुडका ॥८॥
झोंप लागों नेदी कांहीं । निजे निज निजवी पाही ॥९॥
एका जनार्दनीं निज सेवा । जीवें ऊरूं नेदी जीवा ॥१०॥

अभंग २५३१

गो गोरसातीत स्वानंद साखरेसी

गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें पेहें पाजीन संख्या सोयर्‍यासी ॥१॥
घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥
दृश्य न दिसे तें कांळीं अवघें लावी होटीं । सद्युक्तीचें शिंपीवरी गिळी तैसें पोटीं ॥३॥
अंतर तृप्त जालें सबाह्म कोंदलें । निज गोडिये गोडपणें तन्मय जालें ॥४॥
सदगुरु माउली पेहे पाजी अंगीं भरला योग । तेणें देह बुद्धी समुळ केला त्याग ॥५॥
पंचभुतांचे अंगुलें सुवर्ण हारपलें । माझें माझें म्हणत होतें त्या गुणा विसरलें ॥६॥
आतींची हारली भूक जालें सुख । निजनंदी पालखी पहुडलें स्वात्ममुख ॥७॥
पेहे पाजायाचे मिसें देतसे पुष्टी तुष्टी । एका सामावाला जनार्दना पोटीं ॥८॥

अभंग २५३२

नयन तान्हेलें पाजावें काई

नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं ॥१॥
ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरुप काढी मनाची का व्यथा ॥२॥
डोळ्यांची बाहुली पाहतां झडपली । तिसी रक्षा भली केविं करूं ॥३॥
निढळींची अक्षरें चुकलीं कानामात्रें । शुद्ध त्याहावें कैसें लिहिणारें ॥४॥
जीवीचिया डोळा पडळ आलें । अंजन सुदन केविं जाय ॥५॥
एका जनार्दनीं जाणे हातवटी । पुण्य घेउनी कोणी करा भेटी ॥६॥

अभंग २५३३

धरा अधर जाली वोटंगणें काई

धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं ॥१॥
ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों कां निरुता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥
अग्नि हिवेला तापावें कोठें । पवना प्राणु नाहीं कवण लावी वाटे ॥३॥
गगन हारपलें पाहावेआं कवणे ठायीं । मन मुळीं लागलें शांतीक तें पाहीं ॥४॥
स्वादें जेवणार गिळिला पैं जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥
एका जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६॥

अभंग २५३४

हें सहजवि थोरावले

हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥
तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥
तेथें वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी । एका जनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ॥३॥

अभंग २५३५

आतां आम्हीं सहजचि थोर

आतां आम्हीं सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वयें ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥
आम्हीं सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥
ते उन्मनीं परात्पर । निर्गुण हो निराकार । तुर्या तिचा आकार । एका जनार्दनीं सगुणाकार देह झाला ॥३॥

अभंग २५३६

उन्मनीचा हेलावा

उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥
हातीं देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहें लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें तें ॥२॥
एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध । अनुभवोनि हा बोध । संतचरण धरावे ॥३॥

अभंग २५३७

नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा

नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥
अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदुची तत्त्वतां सर्वगत ॥३॥
कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥
भिन्नभिन्न नाहीं अवघेंचि स्वरुप । पाहतां निजरुप रुप होय ॥५॥
तेथें कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनीं साचारू सर्वा घटीं ॥६॥

अभंग २५३८

रात्रंदिवस जप होती साठ घटिका

रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दीड घटिका पळें दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळाआ घटिका दहा पळें लेखा । निमिषें तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपुर गणती निमिष चार ॥४॥
आणिक घटी पळें तितुकींची पाही । अनुहत ठायीं निमिष पांच ॥५॥
पावणेतीन घटिका दहा पळें जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणेतीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमिष चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
साहाशें ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥

अभंग २५३९

आंगुलींवरी आंगुली

आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥
दिवसांचें पाहणें । पाहतां दिसे लाजिरवाणें । खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥
बारा सोळा घागरीं । पाणी नाहीं थेंबवरी । नाहायासी बैसली नारी । मुक्त केशें ॥३॥
घरधनी उभा ठेला । तेणें रांजण उचलिला । जाउनी समुद्रीं बुडाला । नवल ऐका ॥४॥
नाहतां नारी उठली । परपुरुष भेटली । आनंदानें बैसली । निजस्थानी ॥५॥
काळें निळें नेसली । जाउनी दारवंटीं बैसली एका जनार्दनीं देखिला । नवल ऐका ॥६॥

अभंग २५४०

जगामध्यें काय हालत

जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥
कैसें बोटानें दाखवुं तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥
कांहीं नसोनि तें दिसत । नाहीं म्हणतां सत्य भासत । आकारीं आकार लपत । वाउगें जाणत्यासी भासत ॥३॥
अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला । जगीं व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरुपुत्र भला ॥४॥

अभंग २५४१

चक्षुदर्पणीं जग हें पहा

चक्षुदर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरुनी रहा ।
तूर्या कालिंदि तीर्थीं नाहा । पापपुण्यासी तिळांजुळीं वहा ॥१॥
डोळ्यांनों सत्य ही गुरूची खूण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु०॥
तिन्हीं अवस्था सांडुनी मांगें । अर्ध चंद्राचा चांदण्यांत वागे ।
चांदणें ग्रासुनी त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें ॥२॥
एवढें ब्रह्मांडफळ ज्या देठी । तें आटलें देखण्याचें पोटीं ।
त्यासी पहातां पाठीं ना पोटीं । मीतूंपणांची पडली तुटी ॥३॥
चहूं शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणें ।
शुन्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणें ॥४॥
चार सहा दहा बारा सोळा । ह्मा तो आटल्या देखण्याच्या कळा ।
कळातीत स्वयंभ निराळा । एका जनार्दनीं सर्वांग डोळा ॥५॥

अभंग २५४२

एक पांच तीन नावांचे शेवटीं

एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी ॥१॥
सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥
तेहतिसां आटणी चाळिसां दाटणीं । एकुणपन्नसांची कहाणी काय तेथें ॥३॥
एकाजनार्दनीं एकपणें एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥

अभंग २५४३

कान्होबा नवल सांगतों गोष्टी

कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥
कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥
वृक्षाग्री नाहीं मूळ वर शेंडा नाहीं सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥
एका जनार्दनींक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥

अभंग २५४४

पंचभूतें नव्हतीं जईं

पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥
सांगें तूं आमुचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं नको पुढें ॥धृ०॥
नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंचभूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥
तयावरी एक सर्पीण । तिनें खादलें त्रिभुवन । शरण एका जनार्दन । हें योगियांचें लक्षण रे ॥३॥

अभंग २५४५

सगुण निर्गुण नोहे वृक्ष

सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥
सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥
एक मुळीं वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहतां पत्र पुष्पें न देखिला ॥३॥
ऐसें वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार । मग चुकेल वेरझार ॥४॥

अभंग २५४६

अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष

अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥
कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडे रे ॥२॥
सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनीं रे ॥३॥
पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनीं वृक्ष देखा । अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥

अभंग २५४७

अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं

अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥
कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥
वृक्ष जाहला मन पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधलें चराचर गहन रे ॥३॥
वृक्षे भेदिलें आकाश । एका जनार्दनीं निरवकाश । वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥

अभंग २५४८

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥
भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥
हो वृक्षांची वोळख धरा बरी । निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥
एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणे ब्रह्मा सनातन ॥४॥

अभंग २५४९

वृक्ष व्याला आकाश पाताळ

वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥
कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥
वृक्षाअंगीं पंचभुतें । प्रसवला तत्त्वें निरुतें । अहं सोहं पाहतां तें होतें ॥३॥
एका जनार्दनीं पाहिला वृक्ष । गुरुकृपें वोळखिला साक्ष । भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥

अभंग २५५०

निर्गुण निराकार वृक्ष आकारला

निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥
कान्होबा हें बोलणें माझें कोडें । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥
साठ ऐशीं शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भोंवती रे ॥३॥
चौर्‍यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपीं एका जनार्दनीं देखा रे ॥४॥

अभंग २५५१

ॐ कार हा वृक्ष विस्तारला

ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला ।
पुढें षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥
उघडें माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे ।
पडलें विषयांचें सांकडें । तया न कळे हें कोडें रे ॥२॥
चौर्‍यांयशी लक्ष पत्रे असती । सहस्त्र अठ्ठ्यायंशी पुष्पें शोभती ।
तेहतीस कोटी फळें लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥
आदि मध्य अंत पाहतां न लगे मुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।
एका जनार्दनीं वृक्ष तो सबळ । उभा विटेवरी समुळ वो ॥४॥

अभंग २५५२

वृक्ष पाहतां परतला आगम

वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥
माझें सोपें कोंडें । कान्होबा करीं तुं निवाडे ।
अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥
साहांसी येथें न चाले मती । चार गुंतलें न कळे गती ।
अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिति रे ॥३॥
चौर्‍यांयशीं लक्ष भुलले वायां । अठ्ठ्यायंशीं सहस्त्र भोगिता छाया ।
तेहतीस कोटी न कळे आयतया । एक जनार्दनीं लागे पायां रे ॥४॥

अभंग २५५३

सोपा वृक्ष फळासी आला

सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥
वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥
पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं । निवांत होऊनियां ठेली ॥३॥
मूळ वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥

अभंग २५५४

एक दोन तीन विचार करती

एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥
त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरलें जग ॥२॥
त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमुर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥
एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥

अभंग २५५५

चार देह चार अवस्था समाधी

चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥
चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥
जनार्दनाचा एक चतुर्थ शोधोनी पांचवें ते स्थानीं लीन झाला ॥३॥

अभंग २५५६

पंचक पंचकाचा पसारा पांचाचा

पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥
इंद्रियपंचक ज्ञान तें पंचक । कर्म तें पंचक जाणें बापा ॥३॥
धर्म तो पंचक स्नान तें पंचक । ध्यान तें पंचक जाणें बापा ॥४॥
एका जनार्दनीं पंचकावेगळा । पाहें उघडा डोळा विटेवरी ॥५॥

अभंग २५५७

सहा ते भागले वेवादती सदा

सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥
सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥
सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥
एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळां ॥४॥

अभंग २५५८

सातवा तो सर्वाठायीं वसे

सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥
तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥
सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहुनियां ध्यावा मनामाजीं ॥३॥
एक जनार्दनीं सातवा वसे मनीं । ध्नय तो जनीं पुरुष जाणा ॥४॥

अभंग २५५९

आठवा आठवा वेळोवेळा आठवा

आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥
कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥
आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो ॥३॥
एका जनार्दनीं आठव्याची आठवण । हृदयीं सांठवण करा वेंगीं ॥४॥

अभंग २५६०

नववा बैसे स्थिररूप

नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरुप ॥१॥
संत तया दारीं । तिष्ठताती निरंतरीं ॥२॥
पुंडलिकासाठीं उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥
शोभे चंद्रभागा तीर । गरुड हनुमंत समोर ॥४॥
ऐसा विठ्ठल मनीं ध्याऊं । एका जनार्दनीं त्याला पाहुं ॥५॥

अभंग २५६१

मूळची एक सांगतों खूण

मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥
तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावलें समाधान । नाहीं उरलें भिन्नाभिन्न ॥३॥
शरण एका जनार्दनीं । खुण बाणलीं निजमनीं । व्यापक दिसे तिहीं त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥४॥

अभंग २५६२

एक एक म्हणती सकळ लोक

एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एका एक हारपलें ॥१॥
एकाविण एक गणीत नाहीं देख । तें नित्य वोळख निजें आत्मीया रे ॥२॥
त्वंपद असिपद नाहीं । ठायींच्या ठायीं निवोनि पाही ॥३॥
सच्चिदानंद तिन्हीं नाम माया । सूक्ष्म कारण तेथें भुलुं नको वायां ॥४॥
अहं तें मीपण सोहं तें तूंपण । अहं सोहं सांडोनि पाहें निजकानन ॥५॥
एका जनार्दन सांडी एकपण । सहज चैतन्य तेथें नाहीं जन्ममरण ॥६॥

अभंग २५६३

लक्ष गांवें तरणी

लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथें ॥१॥
तैसा आत्म देहीं । म्हणती त्यासी ज्ञान नाहीं । तो व्यापुनी सर्वा ठायीं । साक्षत्व असे ॥२॥
सदगुरुमुखींचा विचार । जयासी झाला साक्षत्कार । उदेरा ज्ञानभास्कर । अज्ञानतिमिरीं ॥३॥
हिरवा पिवळा । संगें रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥
तैसा ज्ञानकिली । जयाचें हातां आली । तयानें उगविलीं । अज्ञान कुलुपें ॥५॥
एकाजनार्दनाचा रंक । त्याचे बोधें कळला विवेक । पूर्ण बोधाचा अर्क । उदया आला ॥६॥

अभंग २५६४

परेहूनी कैसें पश्यन्ती वोळलें

परेहूनी कैसें पश्यन्ती वोळलें । मध्यमीं घनावलें सोहंबीज ॥१॥
वैखारियेसी कैसें प्रगट पैं जालें । न वचे ते बोल एकविध ॥२॥
साक्षात्कारे कैसें निजध्यासा आलें । मननासी फावलें श्रवणद्वारे ॥३॥
सुखासुख तेथें जालीसे आटणी । एका जनार्दनीं निजमुद्रा ॥४॥

अभंग २५६५

स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान

स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥
सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों विभूती अंगीं ॥२॥
चोविसापरतें एक वोळखिलें । तेचि उच्चारिलें मुळारंभीं ॥३॥
आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥४॥
अहं कर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ॥५॥
संसाराची तीन वोंजळीं घातलें पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥
सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥
एका भावे नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ॥८॥

अभंग २५६६

झाली संध्या संदेह माझा गेला

झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥
गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभाव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥
सद्बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण ।
शमदम विभुती चर्चुन जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करुं केव्हां ॥३॥
सहज कर्में झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहें अवघा हा जनार्दन ।
ऐसें ऐकेतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥

स्थूल जीवन
अभंग २५६७

स्थूल देहाचा विचार

स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥
स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥
मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गाजितां । नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरुषा ॥३॥
एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं । दर्पणामाजीं बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥

अभंग २५६८

ऐसी वाढलिया सद्वासना

ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला ॥१॥
लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनि ठेली त्या पदा ॥२॥
तेथें इंद्रिया ऊर्वसी । आलीया सेजेसी । जयाचिया मानसीं । कामा नुठी ॥३॥
एका जनार्दनीं बोध । अवघा झाला ब्रह्मानंद । लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥

कारण देह
अभंग २५६९

आतां कारण जें अज्ञान

आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें ॥१॥
कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयीं प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥
ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पैं भरला । मग सर्वांठायीं देखिलां । आत्मबोध ॥३॥
एका जनार्दनीं आत्म्याची भेटी । तेथें उडाली त्रिगुण । मग बोधासी राहटी । जेथें तेथें ॥४॥

महाकारण देह
अभंग २५७०

महाकारण जें देहज्ञान

महाकारण जें देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण । जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥
ऐशीं मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परौता । तो मुरोनि वस्तुता । वस्तु जाला ॥२॥
ऐशी विवेकाची राबणूक । विवेक आत्मा वोळख । एका जनार्दनीं परम सुख । प्राप्त जालें ॥३॥

नवविधा भक्ती
अभंग २५७१

नवविधा भक्ति नव आचरती

नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥
एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥
श्रवणें परीक्षिती तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥३॥
महाभागवत श्रवण करुनी । सर्वागाचें काम केलें तेणें ॥४॥
श्रीशुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परिक्षिती ॥५॥
हरिनाम घोषें गर्जें तो प्रल्हाद । स्वानंदें प्रबोध जाला त्यासी ॥६॥
स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं ॥७॥
पायाचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय प्ररुषोत्तमा । जाली तेणें ॥८॥
हरि पदांबुज सुकुमार कोवळें । तेथें करकमळें अखंडित ॥९॥
गाईचिया मागें श्रीकृष्ण पाउलें । अक्रुरें घातलें दंडवत ॥१०॥
करुनी वंदन घाली लोटांगण । स्वानंदें निमग्न जाला तेणें ॥११॥
दास्यत्व मारुती अचें देहास्थिती । सीताशुद्धि कीर्ति केले तेणें ॥१२॥
सेव्य सेवक भाव जाणें तो मारुती । स्वामी सीतापती संतोषला ॥१३॥
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी ॥१४॥
उपदेशिली गीता सुखीं केलें पार्थां । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५॥
आत्मानिवेदन करूनियां बळीं । जाला वनमाळी द्वारपाळ ॥१६॥
औट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वयें जाला ॥१७॥
नवविधाभक्ति नवजणें केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालागीं ॥१८॥
एका जनार्दनीं आत्मनिवेदन । भक्ति दुजेंपण उरलें नाहीं ॥१९॥

अभंग २५७२

हरिकथा श्रवण परिक्षिती सुजाण ऐकतां आपण अंगें होय

होय न होय ऐसा संशय नाहीं पुर्वत्व राहे ।
राहिलें गेलें देह ज्याचा तो नेणें देहींचे विदेहीं होय ।
श्रवण समाधी नीचनवा आनंद ब्रह्माहस्मि न साहे रया ॥१॥
नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती ।
एका जनार्दनीं अखंडता मुक्तीची फिटे भ्रांति रया ॥ध्रु०॥
हरीच्या कीर्तनें शुक आणि नारद छेदिती अभिमानाचा कंदु ।
गातां पैं नाचतां अखंड पैं उल्हास कीर्तनीं प्रेमाल्हादु ।
हरिनाम गजर स्वानंदें हंबरें जिंतिला पायेचा बाधू ।
श्रोता वक्ता स्वयें सुखरुप जाला वोसंडला ब्रह्मानंदु रया ॥२॥
हरीचेनि स्मरणें द्वंद्व दुःख नाहीं हें भक्ति प्रल्हादा ठायीं ।
कृतांत कोपलिया रोमही वक्र नोहे मनीं निर्भयता निज देहीं ।
अग्नि विष आप नेदी त्या संताप न तुटे शस्त्राचे घाई ।
स्मरणाचेनि बळें परिपुर्ण जाला देह विदेह दोन्हीं नाहीं रया ॥३॥
हरिचरणामृत गोड मायेसी उठी चाड लाहे जाली रमा ।
चरणद्वय भजतां मुकलीं द्वंद्वभावा म्हणोनि पढिये पुरुषोत्तमा ।
हरिपदा लागली शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा ।
चरणीं विनटोनी हरिपदा पावली परि चरण न सोडी रया ॥४॥
शिव शिव यजिजे हें वेदांचें वचन पृथुराया बाणलें पूर्ण ।
पूज्यपुज्यक भाव सांडोनी सद्भावें करी पुजन ।
देवी देव दाटला भक्त सांडोनी सद्भावें करी पुजन ।
देवी देव दाटला भक्त प्रेमे आटला मुख्य हें पूजेचें विधान ।
त्रिगुण त्रिपुटीं छेदुनियां पूजेमाजीं समाधान रया ॥५॥
हरिचरण रज रेणु वंदूनिया पावना जाला अक्रुर ।
पावनपणें प्रेमें वोसंडें तेणें वंदी श्वानसुकर ।
वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण सद्भावें पूजी गौखुर ।
दंडाचिये परी लोटांगण घाली हरिस्वरुप चराचर रया ॥६॥
जीव जावो जिणें परि वचन नुलंघणें सेवेची मुख्य हा हेतु ।
या सेवा विनटोनि सर्वस्वें भजोनि दास्य उद्भट हनुमंतु ।
शास्त्रचेनि बळें न तुटे न बुडे न जलें देहीं असोनि देहातीतु ।
जन्ममरण होळी कासे भासें बळी भजनें मुक्त कपिनाथु रया ॥७॥
सख्यत्वें परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्माज्ञान ।
स्वर्गाची खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान ।
युद्धाचिये संधीं लाविली समाधी कल्पातीं न मोडें जाण ।
निज सख्य दोघां आलिंगन पडिलें भिन्नपणें अभिन्न रया ॥८॥
बळीची दानदीक्षा कैसी जीवें देउनी सर्वस्वेंसीं निजबळें बाधीं देवासी ।
अनंत अपरंपार त्रिविक्रम सधर आकळिला हृषीकेशी ।
हृदयींचा हृदयस्थ आकळितां तंव देवची होय सर्वस्वेंसी ।
यापरि सर्वच देवासी अर्पुनी घरींदारी नांदें देवेशीं रया ॥९॥
भक्ति हे अखंड अधिकाराचे तोंड खंडोनि केलें नवखंड ।
एकएका खंडें एक एक तरला बोलणें हें वितंड ।
अखंडतां जंव साधिली नाहीं तंव मुक्त म्हणणे हें पाषांड ।
बद्धता मुक्तता दोन्हीं नाहीं ब्रह्मात्व नुरे ब्रह्मांड रया ॥१०॥
सहज स्वरुपस्थिती तया नांव भक्ति नवविधा भक्ति भासती ।
ऐसी भक्तिप्रति अंगें राबे मुक्ति दास्य करी अहोराती ।
दासीसी अनुसरणें हें तंव लाजिरवाणें मूर्ख ते मुक्ति मागती ।
एका जनार्दनीं एकविधा भक्ति तैं चारी मुक्ति मुक्ति होती रया ॥११॥

सार
अभंग २५७३

वेदामाजीं ओंकार सार

वेदामाजीं ओंकार सार । शास्त्रासार वेदान्त ॥१॥
मंत्रामाजीं गायत्री सार । तीर्थ सार गुरुचरणीं ॥२॥
ज्ञान सार ध्यान सार । नाम सार सर्वांमाजीं ॥३॥
व्रतामाजी एकादशीं सार । द्वादशी सार साधनीं ॥४॥
पूजेमाजीं ब्रह्माण सार । सत्य सार तपामाजीं ॥५॥
दानामाजीं अन्नदान सार । कीर्तन सार कलियुगी ॥६॥
जनामाजीं संत भजन सार । विद्या सार विनीतता ॥७॥
जिव्हा उपस्थ जय सार । भोग सार शांतिसुख ॥८॥
सुखामाजीं ब्रह्मासुखसार । दुःख सार देहबुद्धी ॥९॥
एका जनार्दनीं एका सार । सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥

वाकीभ

संत साहित्य, अभंग, ओव्या आणि ग्रंथांचा समृद्ध मराठी संग्रह. वारकरी परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हा आमचा प्रयत्न.

मेन्यू मुखपृष्ठ ग्रंथ अभंग/भजन संत विभाग संपर्क vakibhmedia@gmail.com +91 99239 16476 पुणे, महाराष्ट्र

© २०२६ वाकीभ. सर्व हक्क सुरक्षित.

अभंग २५७४

येऊनि नरदेहीं वायां जाय

येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥
शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥
देवपूजा नेणें कर्म । न घडे स्नानसंध्या धर्म ॥४॥
ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥
एका जनार्दन शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥

अभंग २५७५

मंत्रतंत्राची कथा कोण

मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥
ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥
वेदशास्त्रीं नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥
एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजीं अधर्म ॥४॥

अभंग २५७६

कलीमाजीं नोहे अनुष्ठान

कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥
नोहे योगयागाविधी । नसती अंगीं ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥
न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधांचे महिमान । लोपली तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥
न ठाके कोणाचा कोठें भाव । अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥

अभंग २५७७

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥
आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥
अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजीं ॥३॥
एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥

अभंग २५७८

पंडित शास्त्री होती नीच याती

पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥
स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥
नीचाचें सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥
एका जनार्दनीं आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥

अभंग २५७९

या पोटाकारणें न करावें तें करिती

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥
नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥
श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांहीं न तें भीती पुण्यपापा ॥३॥
एका जनार्दनीं सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥

अभंग २५८०

कलियुगामाजीं थोर जाले पाषांड

कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥
नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥
वेद पठण शास्त्रें संभाषे पुराणमत । अवघें बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥
देव भजन संतपुजन तीर्थ महिमान न कळे मुढ । ऐसें कलियुगीं जाले जाणत जाणत दगडा ॥४॥
एका जनार्दनीं काया वाचा राम जपा । सोपें हें साधन तेणें नोहे पुण्यपापा ॥५॥

अभंग २५८१

अल्प ते आयुष्य धन कलीं

अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥
जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥
असत्याचें गृह भरलें भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥
एका जनार्दनीं म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥

अभंग २५८२

कोण मानील हा नामाचा विश्वास

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥
कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥
नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥
एका जनार्दनीं पातकाची राशी । नाम अहर्निशीं न जपती ॥४॥

अभंग २५८३

वंदुं अभाविक जन

वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैं होती ॥१॥
न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥
यज्ञ यागादिक दान । कोणां न कळें महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥
लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥
ऐसियानें करावें काय । तिहीं ध्यावें विठ्ठल पाय । एका जनार्दनीं ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥

वेषधाऱ्याच्या 
अभंग २५८४

कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार

कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥
लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥
तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसें देव तयाचें तोडावर थुंकु ॥३॥
एका जनार्दनीं सर्वभावें सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥

अभंग २५८५

भक्त रागेला तवकें

भक्त रागेला तवकें । देव फोडोनि केलें कुटकें ॥१॥
कटकट मूर्ति मागुती करा । मेण लावुनी मूर्ति जडा ॥२॥
न तुटे न जळे कांहीं न मोडे । त्या देवाचे केलें तुकडे ॥३॥
रांडवा म्हणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥
जवळींच शुद्ध असतां देवो । भक्तांसी पडीला सदेवो ॥५॥
शाळीग्रामक शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥६॥
चवदा गांठींचा बांधिला दोरा । तोही अनंत नेला चोरा ॥७॥
अनंतासी अंतु आला । भक्ता तेथें खेदु जाहला ॥८॥
एका जनार्दनीं भावो । नाहीं तंव कैंचा देवो ॥९॥

अभंग २५८६

देव म्हणती मेसाबाई

देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चाकरिती पाही ॥१॥
नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥
बळेंचि मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥
बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥
एका जनार्दनीं ऐसा देव । येथें कैसा आमुचा भाव ॥६॥

अभंग २५८७

प्रेमें पूजी मेसाबाई

प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥
काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥
आपुलीये इच्छेसाठीं । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥
तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥
न सांडीची विठाबाई । एका जनार्दना पाहीं ॥५॥

अभंग २५८८

सांडोनियां विठाबाई

सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई ॥१॥
विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥
अरे जोगाई तुकाई । इजपुढें बापुड्या काई ॥३॥
एका जनार्दनीं माझीं आई । तिहीं लोकीं तिची साई ॥४॥

अभंग २५८९

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥
ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥
सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥
गेले दोनी ठाव आतां कोठें उरला वाव । एका जनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥

अभंग २५९०

पूजिती खंडेराव परत भरिती

पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥
लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥
ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काय वाचा शरण ॥३॥

अभंग २५९१

फजितीचे देव मागती घुटीरोटी

फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥
नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥
अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणें मारिती पशुघात ॥३॥
एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचें काळें तोंड ॥४॥

अभंग २५९२

म्हणती देव मोठे मोठे

म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥
कषाट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥
जीत जीवा करुनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥
रांदापोरें मेळ जाला । एक म्हणतो देव आला ॥४॥
नाक घासुनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ॥५॥
एका जनार्दनीं म्हणे । जन भुललें मुर्खपणें ॥६॥

अभंग २५९३

पाषाणाची करूनि मूर्ति

पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥
तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥
मारिती पशूंच्या दावणी । सुरापाणी आल्हाद जयां ॥३॥
आमुचा देव म्हणती भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥
ऐशा देवा देव म्हणे न कोणीही । एका विनवी जनार्दनीं ॥५॥

अभंग २५९४

प्रतिमेचा देव केला

प्रतिमेचा देव केला । काय जाणें ती अबला ॥१॥
नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥
न कळेचि मुढा वर्म । कैसें जाहलेंसे कर्म ॥३॥
प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैचे देवपण ॥४॥
देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनीं रडती पोटा ॥५॥

अभंग २५९५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥
खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥
एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥

अभंग २५९६

करूनि नवस मागती ते पुत्र

करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥
नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥
सदा सर्वकाळ निंदावें सज्जन । काया वाचा मन परद्रव्या ॥३॥
परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥
ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥
एका जनार्दनीं नवासाचें फळ । कुळीं झाला बाळ बुडवणा ॥६॥

अभंग २५९७

जयाचेनि तुटे भवबंधन

जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥
करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥
मुळींच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥
विसरूनि खर्‍या देवासी । भुलले आपुल्या मानसीं ॥४॥
सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

अभंग २५९८

वोस घर वस्तीस काह्मा

वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥
सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥
घेती मासांचें अवदान । देवपण कैंचे तेथें ॥३॥
ऐसिया देवासी पुजणें । एका जनार्दनीं खोटें जिणें ॥४॥

अभंग २५९९

येउनी नरदेहा भूतातें पूजिती

येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥
दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥
रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥
आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥
एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥

अभंग २६००

भजन चालिलें उफाराटें

भजन चालिलें उफाराटें । कवण जाणें खरें खोटें ॥१॥
जवळी असतां देव । भक्तां उपजला संदेह ॥२॥
सचेतन तुळशी तोडा । वाहाती अचेतन दगडा ॥३॥
बेला केली ताडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥
आग्निहोत्राचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥
तिन्हीं देव पिंपळांत । अग्निहोत्रीं केला घात ॥६॥
मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥
चवदा गांठींचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥
शालिग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥९॥
एका जनार्दनीं एक भाव । कुभाविका कैंचा देव ॥१०॥