मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥
काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥
शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥
कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥
न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥
तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणें ॥३॥
एका जनार्दनीं धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥
भाविक हें संत कृपेचें सागर । उतरती पार भवनदी ॥१॥
तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥
दयेचें भांडार शांतीचें घर । एका जनार्दनीं माहेर भाविकांचें ॥३॥
संतसंगे तरला वाल्हा । पशु तरला गजेंद्र ॥१॥
ऐसा संतसमागम । धरतां उत्तम सुखलाभ ॥२॥
तुटती जन्मजरा व्याधी । आणिक उपाधी नातळती ॥३॥
संसाराचा तुटे कंद । नरसे भेद अंतरीचा ॥४॥
परमार्थाचे फळ ये हातां । हा जोडता संतसंग ॥५॥
घडती तीर्थादिक सर्व । सकळ पर्व साधतीं ॥६॥
एका जनार्दनीं संत । धन्य समर्थ तिहीं लोकीं ॥७॥
तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥
ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥
वेदशास्त्रें देती ग्वाही । पुराणें हीं सांगती ठायीं । संत्संगा वांचुनि नाहीं । प्राणियांसी उद्धार ॥३॥
श्रुति हेंचि पैं बोलती । धरावी संतांची संगती । एका जनार्दनीं प्रचीती । संतसंगाची सर्वदा ॥४॥
संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥
वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांहीं ॥२॥
पुराणासी वाड । श्रुति म्हणती न कळे कोड ॥३॥
योग याग वोवाळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥
हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥
पापतापां माहामारी । कामक्रोधाची नुरे उरी ॥३॥
एका जनार्दनीं लीन । संत पावन तिहीं लोकीं ॥४॥
यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां ॥१॥
त्यांचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥
उत्तम अधम न म्हणती । समचि देती सर्वांसी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । केलें पावन दीनालागुनी ॥४॥
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥
उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
खंडे फेरा चौर्यांशी । धरितां जीवेंशीं पाऊलें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥
सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥
थोर मायेचा खटाटोप । संतदरुशनें नुरे ताप ॥२॥
चार देहांची पैं वार्ता । संतदरुशनें तुटे तत्त्वतां ॥३॥
एका जनार्दनीं संत । सबाह्म अभ्यंतर देहातीत ॥४॥
संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥
मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्तीं ॥२॥
मायबापापरीस थोर । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥३॥
शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुगुटमणी ॥४॥
वैकुंठीचें वैभव । संतांपांयीं वसे सर्व ॥१॥
संत उदार उदार । देतो मोक्षांचे भांडार ॥२॥
अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे ॥३॥
एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥
मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥
नाहीं सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥
नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ हातां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतसमान देवाच्या ॥४॥
संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥
संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥
संतांच्या दरुशनें साधतीं साधनें । तुटतीं बंधनें सहज तेथें ॥३॥
एका जनार्दनीं संत कृपादृष्टीं । पाहतां सुलभ सृष्टी सहज होय ॥४॥
भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥
देव ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥
तया वचनाची पाहे वास । पुरवी सौसर मनींची ॥३॥
एका जनार्दनीं विनित । संतचरणरज वंदीत ॥४॥
जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥१॥
उदारपणें सम देणें । नाहीं उणें कोणासी ॥२॥
भलतिया भावें संतसेवा । करिता देवा माने तें ॥३॥
एका जनार्दनीं त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ॥४॥
देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥
जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥
वादक निंदक भेदक न पाहाती । एकरुप चिंतीं मन ज्यांचें ॥३॥
भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥
संतांचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥५॥
भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥
तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥
उपसना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥
निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥
शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य संतजनीं ॥५॥
धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥
धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥
धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥
एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥
धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥
वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥
सांदोनी घरदारा । जाती पंढरपुरा आवडी ॥३॥
एका जनार्दनीं नेम । पुरुषोत्तम न विसंबे त्या ॥४॥
परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥
तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥
उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजीं ॥३॥
एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥४॥
ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥
म्हणोनि नाचे मागें मागें । वाहें अंगें भार त्याचा ॥२॥
सांकडें पडुं नेदी कांहीं व्यथा । आपणचि माथां वोढवी ॥३॥
एका जनार्दनीं संत । त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥
आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥
गातां गीतीं साबडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥
योगियांची ध्यानें कुंठीत राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रें ॥४॥
ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची ॥१॥
काया वाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥
चौर्यांशीचें नाहीं कोडें । निवारें सांकडें पैं जाण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥
संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥
संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥
संतचरणतीर्थ माथा । वंदिती तीर्थें पैं सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं करी पूजा । पूज्यापूजक नाहीं दुजा ॥४॥
असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥
काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥
सदा सर्वकाळ्फ़ संतांची करी निंदा । पापांची आपदा भोगी नरक ॥३॥
स्वमुखें आपण सांगे जनार्दन । एका जनार्दन पूजन करी सुखें ॥४॥
संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥
त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥
तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । त्यांचें न पहावें वदन ॥४॥
संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥
तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥
तयाचें वचन नायकावें कानीं । हो कां ब्रह्माज्ञानीं पूर्ण ज्ञाता ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे जे पामर । भोगिती अघोर रवरव नरक ॥४॥
संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन ॥१॥
जन्मोनियां पापराशी । जातो पतना नरकासी ॥२॥
सोडवावया नाहीं कोणी । पडती चौर्यांशी पतनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । ऐसा अभागी खळ जाण ॥४॥
जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥
संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥
घाला लोटांगण वण्दू पा चरण । तेणें समाधान होईल मना ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥
नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥
पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥
चौर्याशीं भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥
एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥४॥
नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन ॥१॥
ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करितसे ॥२॥
अपरोक्ष ज्ञान करसवटी । संतावीण नये पोटीं ॥३॥
जैसा अंधारीं खद्योत । तैसा संताविण नरदेह प्राप्त ॥४॥
मनीं विषयाचा अभिलाष । कोण सोडवी तयास ॥५॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतापायीं देह ठेवणें ॥६॥
संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥
देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥
कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनीं पदवी पावे ॥३॥
एका जनार्दनीं गूज सांगे कानीं । रहा अनुदिनीं संतसंगे ॥४॥
संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥
संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥
दुर्जनाचे संगें दुःख प्राप्त होय । तेथें कैंचि सोय तरावया ॥३॥
एका जनर्दनीं हेंचि सत्य साचा । नको अभक्तांचा संग देवा ॥४॥
कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥
सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवेनेणिवेचें हावें पडुं नये ॥२॥
अभिमान झटा वेदांचा पसारा । शास्त्रांचा तो थारा वहातां अंगीं ॥३॥
एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देहीं घडतसे ॥४॥
शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्यांशीं ॥१॥
द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
वंदितांचरणरज । पावन देह होती सहज ॥३॥
घालितां चरणीं मिठी । लाभ होय उठाउठी ॥४॥
प्रेमें दर्शन घेतां । मोक्ष सायुज्य ये हातां ॥५॥
म्हणे जनार्दन । एका लाधलीसे खुण ॥६॥
हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥१॥
तेणें साधती साधनें । तुटतीं भवांचीं बंधनें ॥२॥
संताविण प्राप्ति नाहीं । ऐशीं वेद देत ग्वाही ॥३॥
एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥
आणिक कांहीं नाहीं चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥
नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचें ॥३॥
एका जनार्दनीं तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥
संत उपाधिरहित । नाहीं तया दुसरा हेत ॥१॥
सदा मुखीं नाम वाचे । तेणें जन्माचें सार्थक ॥२॥
संग नावडे तयां कांहीं । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥
एका जनार्दनीं चित्त । ध्यानीं मनीं संत आठवीत ॥४॥
काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥
नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥
आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥३॥
एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरु उतरिती ॥४॥
संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥
संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥
संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥
एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥
दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥
ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥
देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥
एका जनार्दनीं ते संत । कृपावंत दीनालागीं ॥४॥
सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥
पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥
हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावे विदेही ॥३॥
एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥
मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥
राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥
घेणे देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥
एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥
मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥
नाम ऐकुनि बागुलातें । बाळ सांडु पाहें प्राणातें ॥२॥
चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥
सन्मानें नामरुप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥
धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥
करितसे कथा कीर्तनीं आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥
एका जनार्दनीं धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥
छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥
आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेची ॥२॥
याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥
देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥
द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥
एका जनार्दनीं अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥
सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥
सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥
जाणीव जाणपण नेणिवां नेणपण । दोहींच्या विंदाने सहजाचें दर्शन ॥३॥
एका जनार्दनीं जाणीव नेणीव । सहज चैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥
कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥
अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥
ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥३॥
जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥२॥
संकल्पविकल्पाची ख्याती । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥
यापरी जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥
आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥
आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥
आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥
आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शंतींचें घर चळो नेदी ॥४॥
एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥
असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥
नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥
असोनियां अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥
इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥
परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥
वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें विरळे प्राणी । कोटी माजीं जनें एक देखो ॥४॥
न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥
ऐसें मज शरण येती । तयांचे उणें न पडे कल्पांती ॥२॥
नाहीं संसाराची चाड । नाहीं भीड कवणाची ॥३॥
एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनीं ॥४॥
देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥
कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥
देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंव समाधान पहा हो ॥३॥
एका जनार्दनाच्या पाही । वृत्ती दिसे तैं दोष नाहीं ॥४॥
सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥
तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥
कामक्रोधाची वार्ता । अंगीं नाहीं पैं सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं निष्काम । सदा परिपूर्ण मंगळधाम ॥४॥
मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥
मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हें तों सरसें भांडवल ॥२॥
लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥
एका जनार्दनीं दास्य करी । मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥
संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥
त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥
तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥
एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥
जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥
नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥
काशीं मरणें होय मुक्ति । तेथें वचनें न मरतां होय मुक्ति ॥३॥
एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥
धन जयासीं मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥
निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥
एका जनार्दन पाय धरी । भुक्ति मुक्ति नांदे घरीं ॥४॥
साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥
जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥
ऋद्धिसिद्धि त्यांच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशी ॥३॥
एका जनार्दनीं साधु । जयापाशी आत्मबोधु ॥४॥
सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥
जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥
सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥
एका जनार्दनीं संत । नित्य साधी आत्महित ॥४॥
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥
लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥
गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥
एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥
वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥
प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं एकरुप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥
देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥
असे अखंड समाधी । नसे कांहीं आधिव्याधी ॥२॥
उपाधीचे तोडोनी लाग । देहीं देहपणें भरिलें जग ॥३॥
एका जनार्दनीं संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥
काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥
तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥
अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥
जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥१॥
अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥
निंदा अथवा वंदा । नाहीं विषय ती बाधा ॥३॥
शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ॥४॥
एका जनार्दनीं धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥
मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥
मान देखोनियां दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥
मी एक लौकिकी आहे । ऐसें कवणा ठावें नोहे ॥३॥
सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥
त्याचे पोटीं दृढ अभिमान । तो सदा इच्छि सन्मान ॥५॥
सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण मिरवी वृथा ॥६॥
ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥७॥
ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे ॥१॥
हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥
धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥
अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥