वाकीभ लोगो

संत सावता माळींचे अभंग

संत सावता माळी महाराज अभंग

अभंग १

कांदा मुळा भाजी

कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाबाई माझी ।॥

लसूण, मिरची, कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी ।।

ऊस गाजर रताळू, अवघा झालासे गोपाळू।।

मोट, नाडा, विहीर, दोरी |अवधी व्यापली पंढरी ।।

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा ।।

अभंग २

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥

दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥

आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥

सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥

अभंग ३

मंगल मंगल नाम विठोबाचे

मंगल मंगल नाम विठोबाचे । उच्चारिता वाचे जन्म खंडे ।।

सुलभ , दुर्लभ ब्रम्हादिका वंद्य । वेदादिक शुद्ध गाती जया ।।

सावता म्हणे सर्व सुखाचे आगर । रुक्मादेवी -वर विटेवरी ।।

अभंग ४

ऐकावे हे विठ्ठल धुरे

ऐकावे हे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरे ।।

करी संसाराची बोहरी ।इतुके मागतो श्रीहरी ।।

कष्ट करिता जन्म गेला । तुझा विसर पडला ।।

माळी सावता मागतो संतान । देवा करीगा नि:संतान ।।

अभंग ५

नामाचिया बळे न भिऊ सर्वथा

नामाचिया बळे न भिऊ सर्वथा । कळीकाळाचे माथा सोटे मारू ।।

वैकुंठाचा देव आणूया कीर्तनी ॥ विठ्ठल गाउनी नाचू रंगी ।।

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमे वनमाळी चित्ती धरू ॥।

सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा । तेणे मुक्ती द्वारा वोळंगती ॥

अभंग ६

नको तुझे ज्ञान नको तुझा मान

नको तुझे ज्ञान नको तुझा मान । माझे आहे मन वेगळेचि ॥

नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती । मज आहे विश्रांती वेगळीच ॥

चरणी ठेउनी माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापना ।।

अभंग ७

विठोबाचे पाय राहो अखंड

विठोबाचे पाय राहो अखंड । चित्ती अखंड श्रीपती हेची द्यावे ।।

ध्यानी, मनी, वनी असता सर्वकाळ । साधी काळ-वेळ याची परी ।।

नाम हे तारक साचार जीवाचे । सावता म्हणे वाचे सदा घेई ॥

अभंग ८

समयासी सादर व्हावे

समयासी सादर व्हावे । देवे ठेविले तैसे राहावे ।।

कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवशी पालखी सुभेदार ॥

कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे । कोणे दिवशी बसून याची मन ।।

कोणे दिवशी घरात नाही धान्य । कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे ॥

कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ॥

कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे । कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा ।।

कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा । कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे ॥

अभंग ९

माझी हीन याति

माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ।।

नका देऊ भुक्ति मुक्ति । माझी परिसावी विनंती ॥

सावता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावे भंगा ।।

अभंग १०

प्रपंची असुनी परमार्थ साधावा

प्रपंची असुनी परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग ।।

उंच नीच काही न पाहे सर्वथा । पुराणीच्या कथा पुराणीच ॥

घटका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊ नेदी ।।

सावता म्हणे कांते जपे नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ।।

अभंग ११

कृपाळू तू हरी

कृपाळू तू हरी। दीन दासाते उद्धारी।।

नको काही दुजा हेत। सदा जडो नामी चित्त।।

दुजे आणिक नको काही। ठाव द्यावा संतापायी।।

माळी सावता विनंती करी। परिसा परिसा तुम्ही हरी।।

अभंग १२

एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी

एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी। तोचि कल्पवरी, चिरंजीव।।

ऐशा ज्याचा भाव, वाचे नारायण। नाही त्या बंधन, कळीकाळाचे ।।

अभंग १३

साधनांची आटाआटी

साधनांची आटाआटी। कासया पाठी लाविता।।

एक तुमचे नामाचि पुरे। हेचि धुरे साधन॥

भाळी भोळी करीन सेवा। माना देवा तुम्ही धन्य॥

सावता म्हणे रुक्मिणीवरा। अहो अवधारा वचन माझे ।।

अभंग १४

भंगो नेदी माझे प्रेम

भंगो नेदी माझे प्रेम । चालवावा हाचि नेम ॥

ऐका दया धना देवा । कोण भाग्य तुझी सेवा ॥

तुझे सेवे वाचुनी काही । पाहता सुख कोठे नाही ॥

अगा रुक्मिणी-रमणा । सावता विनवितो चरणा ।

अभंग १५

विवाद करिता भागली दरूशने

विवाद करिता भागली दरूशने । तोचि आले केणे भीमा-तीरी ।।

पुंडलिक-पेठे रहिवासु केला । शब्द हा मिरविला विठ्ठलनामे ॥

आषाढी-कार्तिकी दोन्हीच पै हाट । वैष्णव बोभाट करिताती ।।

सावता म्हणे तया घालू लोटांगण । हरले भाग शीण जन्मोजन्मी ।

अभंग १६

जगी तारक एक नाम

जगी तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ।

चला जाऊ तया गावा । पाहू देवा विठ्ठला ।।

वंदू संत चरण -रज । तेणे काज आमुचे ।।

सावता म्हणे विटेवरी । उभा सम चरणी हरी ।।

अभंग १७

उचित जे तुम्हा गोडी

उचित जे तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतो ।

वास देई चरणापाशी । हेचि तुम्हांसि मागतो ।।

कन्या -पुत्र यांचा भाग । तोडा तोडा लिगाड ।।

माळी सावता लागे चरणी । करी विनवणी विठ्ठल ।।

अभंग १८

पुंडलिका भुलोनी आला

पुंडलिका भुलोनी आला । उभाचि ठेला अद्यापिही ।।

येति जे जे दुराचारी । दरुशने उध्दरी नरनारी ।।

सावता म्हणे वेदशृति । अखंड जयासि ते गाती ।।

अभंग १९

मागे बहुताचा लाग

मागे बहुताचा लाग। तोडिला पांग, तुम्ही देवा ।।

म्हणोनि येतो काकुळती । पुढती पुढती कीव भाकी ॥

सावता म्हणे विश्वंभरा । तुम्ही उदारा त्रिभुवनी ॥

अभंग २०

पूर्वापार कुळी पंढरीचा नेम

पूर्वापार कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठ्ठलाचे॥

तारी अथवा मारी, देवा तुचि एक। न घ्यावी भाक पांडुरंगा।।

वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवी। व्यर्थ न भुलवी मायापाश ॥

सावता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा। आठव असू द्यावा, माझा बाप।।

अभंग २१

शिव, ब्रह्मा, विष्णू तिन्ही देव एक

शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥

विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥

अद्वैत वासना संतांचि संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३॥

हरि मुकुंद मुरारी…. । हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥

अभंग २२

वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली

वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही ॥

तें या पुंडलिका सुलभ पै जाहले । उद्धारावया आले भीमातटी ॥

सावता म्हणे धन्य विठ्ठल दयाळ । लागों नेंदी मळ भाविकांसी ।

अभंग २३

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी । वासनेची बेडी पडली पाया ।।

सोडवण करा आलोनि संसारा । शरण जा उदारा देवराया ।

प्रबळ मोहपाश विषयासी गोवी । अखंड भोगवी क्लेश नाना ।॥

सावता म्हणे तुम्ही विचारावे मनी । सोयरा निर्वाणी हरी एक ।।

अभंग २४

नेणो योग-याग तपे

नेणो योग-याग तपे । वाचे जपे विठ्ठल ।।

हेची आमुचे निजधन । सुखसंपन्न विठ्ठल ।।

नलगे संपत्ती मान-धन । आम्हा परिपूर्ण विठ्ठल ।।

सावता माळी म्हणे देवा । मज निरवा संतापायी ।।

अभंग २५

ज्या नामे तरले दोषी जे अपार

ज्या नामे तरले दोषी जे अपार । तोचि हा श्रीधर कर कटी ॥

मौनेचि उभा मौनेचि उभा । मौनेचि उभा विटेवरी ॥

सावता म्हणे ते जन्मा ये अंबरी । केशर कस्तुरी मळवट ।।

अभंग २६

जपतप क्रिया धर्म साधन

जपतप क्रिया धर्म साधन । वाउगें बंधन उपाधीचें ॥

येणे काय घडे समाधान सर्वथा । वाउगाची शीण व्यथा होत आहे ।।

सावता म्हणे सार, कंठी धरा नाम । नको दुजा नेम वाउगाची ।।

अभंग २७

लागलासे काळ पाठी

लागलासे काळ पाठी । कोण तुटी करी त्यासी ।।

ऐका ऐका पंढरीनाथा । निवारा भयापासूनी ।।

नको, नको. या उपाधी । जोडा संधी काळचक्र ॥

सावता म्हणे करुणाकरा । अहो श्रीहरी दयाळा ।।

अभंग २८

विश्रांतीचा ठाव

विश्रांतीचा ठाव । पंढरीराव विटेवरी ।

धावोनिया जाईन गावा । अवघा हेवा चुकवील ॥

दरुशने होय लाभ । नभानभ दाटणी ॥

सावता म्हणे जन्म व्याधी । तुटे उपाधी कर्माची

अभंग २९

विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें

विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें । ते उभे असे ठेलें विटेवरी ॥

डोळियांचे धनी पाहतां न पुरे । गौळी ते साजिरे खेळविती ॥

आगमा न कळे, निगमा वेगळे । गोकुळी लोणावळे चोरितसे ।।

सावता म्हणे ज्याचा न कळेचि पार । तो हरी साचार चारी गाई ।।

अभंग ३०

अकाराच्या माथा नकार बैसला

अकाराच्या माथा नकार बैसला । लकार भारला मिथ्या पाही ।।

ऐसा तो उमज नाही या मानवा । उगाच वणवा लागे देही ।।

विषयी गुंतला नाही केले ध्यान । पातकी दुर्जन अविचारी ॥

सावता म्हणे भजन करावे देवाचे । योग-याग तयाचे कष्ट बहू

अभंग ३१

पैल पहा हो परब्रह्म भुलले

पैल पहा हो परब्रह्म भुलले | जगदीश काहो परतंत्र झाले ||

काय सुख केले येणे नेणिजे | कोण भाग्य गौळियाचे वर्णिजे ||

आदि अंतु नाही जया व्यापका | तो माये उखळी बांधिला देखा ||

सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसला हे श्रीमुखकमळ ||

योगिया ह्रदय कमळीचे हे निधान | दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ||

सावता स्वामी परब्रह्म पुतळा | तनु मनाची कुरवंडी ओवाळा ||

अभंग ३२

योग याग तप धर्म

योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता॥

तीर्थ व्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको ॥

समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहता ॥

सावता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हा उचिता ॥

अभंग ३३

विकासले नयन स्फुरण आले बाही

विकासले नयन स्फुरण आले बाही । दाटले ह्रदयी करुणा भरित ॥

जाता मार्गी भक्त सावता तो माळी । आला तयाजळी पांडुरंग ॥

नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भितर गेला देव ॥

तब तो समाधीस्थ झाकुनी नयन। वाचे रामकृष्ण जपे सदा ॥

माथा ठेऊनिया हात केला सावधान। दिले आलिंगन चहुभुजी ॥

चरणी ठेवोनी माथा, विनवितो सावता। बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥

अभंग ३४

भली केली हीन याति

भली केली हीन याति। नाही वाढली महंती ॥१॥

जरी असता ब्राम्हण जन्म ।तरी हे अंगी लागते कर्म ॥२॥

स्नान नाही, संध्या नाही । याति कुळ संबंध नाही ॥३॥

सावता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ॥४॥

अभंग ३५

दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव

दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव । नको काही आन ठाव ॥१॥

सदा वाचे नामावळी। गर्जो नित्य वेळोवेळी ॥२॥

सावता म्हणे दयाघना । आठव मना असू दयावा ॥३॥

अभंग ३६

आमुची माळियाची जात

आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥

आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुल झाडा ॥

शांती- शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥

सावताने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळा॥

स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ॥

अभंग ३७

मागणे ते आम्हा नाही हो कोणासी

मागणे ते आम्हा नाही हो कोणासी । आठवावे संतासी हेचि खरे॥

पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशीच ॥

सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥

व्हॉट्सअॅप