सर्वस्वरूप नाम राम सर्व – संत निवृत्तीनाथ अभंग
सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम ।
तो गोकुळीं आत्माराम दुध मागे ॥१॥
भाग्येंविण दुभतें दैव उभडतें ।
नंदाघरीं आवडते घरीं खेळे ॥२॥
मंजुळ वेणु वाजें लुब्धल्या धेनुवा ।
नंदाघरीं दुहावा पूर्ण वाहे ॥३॥
घरोघरीं दुभतें गौळियां परिपूर्ण ।
यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख ।
गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व ।
गोरक्ष गुह्म भाव सांगति मज ॥६॥
सर्वस्वरूप नाम राम सर्व – संत निवृत्तीनाथ अभंग