आमचा साचार आमचा विचार – संत निवृत्तीनाथ अभंग
आमचा साचार आमचा विचार ।
सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश ।
सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे ।
तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा ।
हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप ।
एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी ।
आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥
आमचा साचार आमचा विचार – संत निवृत्तीनाथ अभंग