१४२५. अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥
तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥
जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥३॥
निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥

१४२६. आणिकांते उपदेशी । आपण मळिन मानसीं ॥१॥
बोले ते ते धूर्त वादें द लटिक्याचि प्रेमें रडे स्फुंदे ॥२॥
सोंग परमार्थ हा सार । आशा अंतरी विखार ॥३॥
निळा म्हणे देहाभिमानें । गेलीं भोगिती ते पतनें ॥४॥

१४२७. आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर ॥१॥
दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश ॥२॥
वाचे सात्विक बोलणें । विषयीं वासनेचें ठाणें ॥३॥
निळा म्हणे घेउनी सोंगें । निरवे चार करीत उगे ॥४॥

१४२८. ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥
मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥
अनुताप दाविती वैराग्य । वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥
निळा म्हणे उगीचि रीति । पडलीं संसारीं कुंथितां ॥४॥

१४२९. कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥
करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥
कळा दाविती व्युत्पत्ति । चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥३॥
निळा म्हणे संतापुढें । येतां लाजती ती माकडें ॥४॥

१४३०. बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥
काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
रसाळ वाचेसी बोलणें । माळा मुद्रांची भूशणें ॥३॥
निळा म्हणे गेलीं द वांयां न भजतां विठठलीं ॥४॥

१४३१. प्रत्यक्ष जनीं जनार्दन । नूणोनियां कथी ज्ञान ॥१॥
काय तैसी ते वाचाळें । करिती चावटी तोंडबळें ॥२॥
नाहीं अंगी हरिची भक्ति । दाविती कोरडीच विरक्ति ॥३॥
निळा म्हणे नेणतां वर्म केलें पाठी लागे कर्म ॥४॥

१४३२. सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥
काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥
शुभा नांवे विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥३॥
निळा म्हणे पाखांड करिती । जगीं म्हणविती गोसावी ॥४॥

१४३३. त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥
जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥
सांगती पाखंड । बोल बोलोनियां वितंड ॥३॥
निळा म्हणे जाती । घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥

१४३४. जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो ॥१॥
सांगतांहि न मानी हीत । करी आघात आपुल ॥२॥
मना आला अर्थ काढी । ओढे ओढे अहंतेचे ॥३॥
निळा म्हणे व्दैतबुध्दि । नये तो कधीं परिपाका ॥४॥

१४३५. तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे ॥१॥
खरियासी मानी खोटें । खोटें खया ऐसें वाटे ॥२॥
अंध न देखे निवाडू । तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥
निळा म्हणे बुध्दिमळीन । नेणें पाप कीं हें पुण्य ॥४॥

१४३६. निर्भीड बोलणें । ज्याचें अपस्वार्थी जिणें ॥१॥
त्याचिये संगतीचे फळ । होय चित्तसी खळबळ ॥२॥
परदु:ख नेणतां । कर परान्नें पुष्टता ॥३॥
निळा म्हणे दावी सोंग । ऐसा त्यजावा मातंग ॥४॥

१४३७. नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥
जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥
सर्व काळ अल्प बुध्दी । नेणे बोलों सभासंधी ॥३॥
निळा म्हणे तया दिसे । अवघें जगचि वेडें ऐसें ॥४॥

१४३८. नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥१॥
नसतीच वाढवूनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥२॥
नाठवूनियां विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥३॥
निळा म्हणे जन्मोनि गेला । वृथाचि पडिला निरयांत ॥४॥

१४३९. न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी ॥१॥
वाचाळ धोवे तैसें । कार्येविण निरुददेशें ॥२॥
करी बोलतां प्रमाद । वाढवुनि वादावाद ॥३॥
निळा म्हणे महा मूर्ख । करी सकळां सर्वे दु:ख ॥४॥

१४४०. घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥
आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥
जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥
निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥

१४४१. चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥
परी तें अवघें वांयां गेलें । एका न भजतां विठठलें ॥२॥
गायनाची कळा । आसनें मुद्रेचा सोहळा ॥३॥
निळा म्हणे जें जें करी । सोंगींचि तें तें अवघें वरी ॥४॥