वाकीभ लोगो

संत निळोबाराय महाराज अभंग

संत निळोबाराय महाराज अभंग

अभंग १४८८

काय वर्णूं याचे गुण

काय वर्णूं याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रुपस ॥१॥
चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥
जेणें वाड केलें गगन । दिधलें आसन वसुंधरे ॥३॥
निळा म्हणे धरिला मेरु । भरिला सागरु दिव्य क्षीरें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४८९

कांहींच न होऊनि विस्तारला

कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥
नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥
एका ऐसा न होऊनि एक । नानाकोंरे हा अनेक ॥३॥
निळा म्हणे नट लाघवी । शेखीं वेगळा गोसावी ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९०

कैसा याचा वेध जाणती अनुभवी

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥
न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥
नेदीचि बाहेरीं उमसों बुध्दि मना । भरुनियां भावना झांकोळिली ॥३॥
निळा म्हणे तोचि साक्ष माझया जिवीं । चाळक गोसावी ब्रम्हांडाचा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९१

कैंचि याला बाईल आई

कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥
मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥
हात पाय नाक ना डोळे । देखणें आंधळें नातळेचि निळा म्हणे कांहींचि नव्हे । तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९२

कैंचि आतां जीवा उरी

कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥१॥
नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥२॥
भोग भोक्ता आपण झाला । वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥
निळा नामें रुपें नाहीं । भसे देहीं विठ्ठल ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९३

कोठें वसे झाडाचिवरी

कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥
कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥
कोठें पर्वतीं दरकुटीआंत । कोठें वनांत झाडखंडीं ॥३॥
निळा म्हणे चिखलीं शेणीं । वसे पाषाणीं काष्ठांत ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९४

कोठें ग्रामीं कोठें पुरीं

कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥
कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥
कोठें वोले वोलवंटी । वसे तळवटीं शिखरांवरीं ॥३॥
निळा म्हणे वसे शिरीं । केशाभीतरीं कोठे वस्त्रीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९५

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥
कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥
कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसती न कळे कोणा ॥३॥
कोठूनि याचें कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥
निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती । नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥५॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९६

खांबसूत्रीं खेळवीं दोरी

खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥
तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥
किनरी वाजे नानापरी । वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥
निळा म्हणे तैसा माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९७

गगनीं वसोनियां रवी

गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥
तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥
नभ न सांडुनी आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥३॥
निळा म्हणे सन्निधानें । चुंबक चालवी अचेतनें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९८

गंगा पवित्र सर्वागुणी

गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥
तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥
भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगें झाली ॥३॥
निळा म्हणे धर्माधर्म । वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १४९९

घंडु जातां अळकांर

घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥
नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥
आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥३॥
निळा म्हणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५००

छायामंडपींचीं चित्रें दिसती

छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥
परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥
तेविं आत्मप्रभा भासे । जग हें विलसे नानाकृती ॥३॥
निळा म्हणे गगनीं रवि । दावूनि जेविं अलिप्त ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०१

जाणे सकळां अंतरींचा

जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥१॥
तया करी तैसाचि मान । जैसें भजन ज्यापाशीं ॥२॥
जेविं एकचि स्वातीजळ । सर्पी गरळ हिरा भूमीं ॥३॥
निळा म्हणे एकचि हरी । जैशापरी तैसाचि ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०२

नवल हा प्रकाशवेगळा

नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥१॥
नव्हे हा उजळिला सवेंचि मावळला । आत्मतेजें केला उदो नित्य ॥२॥
ढवळा ना काळा पिंवळा ना जांभळा । जीवींच्या जीवनकळा प्रकाशितु ॥३॥
निळा म्हणे आजि आरतीचेनि व्याजें । कृपें पंढरीराजें कळलें मज ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०३

नाहींचि या डाळ मूळ

नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥
रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥
बाळ तरुण वयसा वृध्द । जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥
निळा म्हणे धरिला चित्तीं । कैंसा नेणों पूर्वी संतीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०४

नाहींचि उरला रिता

नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥
अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥
होतां जातां सहस्त्रवरी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥३॥
निळा अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०५

नाहीं म्हणतां अवघें तेंचि

नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥
म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥
डोळा देखणा देखे सर्व । न देखे बरव आपुली तो ॥३॥
निळा म्हणे तेवीं जाणों जातां । जाणणेंचि तत्त्वतां वस्तु होये ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०६

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥
म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥
जागृति ना निद्रा जेथें नाहीं सुषुप्ती । तुर्या ना उन्मनी कैंची स्वप्नाची भ्रांती ॥३॥
निळा म्हणे अनुभव तेथें अनुभवितें कैंचे । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळींचे ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०७

निर्विकार असोनि आत्मा

निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी ॥१॥
एरवीं करी ना करवी । जेवीं रवि निज व्योमीं ॥२॥
लोह चळे चुंबकयोगें । परि तो अंगे न शिवे त्या ॥३॥
निळा म्हणे आत्मसत्ता । वर्तणें भूतां कर्मतंत्रीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०८

नेणें मी परिहार

नेणें मी परिहार । देऊं कोणासीं उत्तर ॥१॥
म्हणोनियां हें खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥२॥
नेणोनियां तुमची गती । तंटा माझयाचि नांवे करिती ॥३॥
निळा म्हणे प्रत्युत्तर । मज तों न सुचे उत्तर ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५०९

पदार्थमात्रीं आठवे जरी

पदार्थमात्रीं आठवे जरी । नलगेचि तरी साधन ॥१॥
एरवीं दिसे देखणा तोचि । पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥
अवघाचि वसोनि अवघे ठायीं । दिसे दाखवीही अवघ्यांतें ॥३॥
निळा म्हणे भोगी त्यागी । तोचि जगीं जगदात्मा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१०

पहा ज्याचें तयाची परी

पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥
देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥
उंच नीच अधिकारें पावती आपुलाल्या व्यापारें ॥३॥
निळा म्हणे ज्यापरी रवी । ज्याचे वेवसाय तया दावी ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५११

दोष वसे पात्रांतरीं

दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥
सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥
स्वातिजळें मुक्ताफळ । शुक्तीं सपीं हाळाहळ ॥३॥
निळा म्हणे उपाधिभेदें । दावित निवाड शुध्दाशुध्दें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१२

सर्वी असतां सर्वपणें

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥
पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥
मीहि नाहीं तूंहि नाहीं । येकीं येकत्व नुपसें पाही ॥३॥
निळा म्हणे नहोनी कांहीं । नसोन असे आपुला ठांई ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१३

नवल हे कृपा घनवट

नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची ॥१॥
आपणांसवें आपण खेळे । आपआपणासी चावळे । शेखीं आपण आपणा मिेळे । खेळतां वेगळें दाउनि ॥२॥
ऐसा आपुलिया संतोषा । एकी भिन्नत्वाची आशा । अनेकत्वाचा मिरउनी ठसा । एकी येकला शेवटीं ॥३॥
दाऊनियां नानाकार । नानाकृति नारीनर । तेचि करुनियां निराकार । आपणाअंगी आपण ॥४॥
निळा म्हणे कृपातरणी । प्रगटोनियां माझिये वाणी । प्रकाशी आपुला किणीं । लाविली गुणीं वर्णावया ॥५॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१४

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥
पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥
चित्त चाकाटलें स्वरुपामाझारीं । न निघे बाहेरि सुखावलें ॥३॥
सुनीळ प्रकाशें उदेजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥४॥
शशीसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥
निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराजला निश्चित निश्चिंतीनें ॥६॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१५

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥
ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥
ब्रम्हरस ब्रहमीं सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतितीमुखीं ॥३॥
स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधननिजध्यास ग्रासोग्रासीं ॥४॥
आरोगयता निळा पावला आष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥५॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१६

नवलचि एक वाटे मज

नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥१॥
आपुली आपण बाईल जाला । आपणाचि व्याला आपणाशीं ॥२॥
मागें पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥
निळा म्हणे हा चराचरा । वसउ आंतरा बाहेरी ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१७

पाहों जातां हा न दिसे

पाहों जातां हा न दिसे । झांकोळिला विश्वाभासें ॥१॥
आतां पाहों कोणीकडे । आड आपणा हा दडे ॥२॥
डाहाळी आड आंबा । असोनि न दिसेचि उभा ॥३॥
साखर दिसे खडा । गोडी पाहों काणीकडा ॥४॥
निळा म्हणे सोनें । न दिसे झांकिलें भूषणें ॥५॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१८

देव प्रगटचि लपला

देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥
काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥
निज ज्वाळें वैश्वानर । लह्या लोपिला सागर ॥३॥
निळा म्हणे धुळी । आड ठेली महीतळीं ॥३॥

संत निळोबा महाराज

अभंग १५१९

विश्व अवघें मायाभास

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥
जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥
शुक्तिका प्रसवें मुक्ताफळ । जळींचें परि त्या नेणेचि जळ ॥३॥
निळा म्हणे धूम्री वन्हीं । नाहींचि तयातें प्रसवोनी ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२०

हातीं घेतला चितांक

हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥
तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥
न दिसेचि दोरा । माजी लपांला अंबरा ॥३॥
निळा म्हणे मारा । ठेल्या लपवूनियां नीरा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२१

इंद्रियांची पुरली धांव

इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥
तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥
बुध्दीचीहि जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥३॥
निळा म्हणे कुंठित गती । पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२२

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥
ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥
अष्ट अविर्भाव डवरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥३॥
त्रयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥
निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनचि प्राणें शोषियेला ॥५॥
निळा सुखासुखीं पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥६॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२३

एक्या जिवें एक्या भावें

एक्या जिवें एक्या भावें । एकचि एकलें एक्या देवें ॥१॥
एकाएकीं एकचि झालें । एका अंगी विरोनी गेलें ॥२॥
एकचि केलें निजानुभवें । एकाचि झालें एक्या नांवें ॥३॥
निळा म्हणे एकाएकीं । एकचि झालें तिहीं लोकीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२४

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥
पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥
दृश्याचि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग । काया वाचा मनचि नाहीं धारणा योग ॥३॥
निळा म्हणे जेथें सुख सुखपणा नये । निजानंदी निजानंद हारपले ठाय ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२५

अवघें होऊनि कांहींचि नव्हे

अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥
तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥
ध्वनि बीज ओंकार रुप । तेंही स्वरुप ऐलाडी ॥३॥
निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२६

असोनि अलिप्त सर्वसंगी

असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी ॥१॥
ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्यमुक्त त्रिभुवनीं ॥२॥
मी हें स्फुरे जेथूनियां । आत्मा परचि त्याहूनियां ॥३॥
निळा म्हणे मी हे वदती । मूर्ख देहातेंचि कल्पिती ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२७

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥
असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥
लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥
निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२८

आत्मा करी ना करवी

आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥
साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥
जैसें गगनीं अभ्र गळें । गगन अलिप्त त्यावेगळें ॥३॥
निळा म्हणे सन्निधानें । लोह चाले चुंबक नेणें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५२९

आपणा दाउनी भुरळे केले

आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनि माझें मीपण नेलें ॥१॥
आतां जाऊं कोणीकडे । पळों तरी तो मागें पुढें ॥२॥
धांवा म्हणोनि बोलो जाय । तंव बोलातें गिळूनी आपणाचि ठाये ॥३॥
ऐकों जाय याच्या गोठी । तंव तो शब्दा पाठीं पोटीं ॥४॥
देखों जातां देखणेंचि होय । दृश्यादृश्‍य हा नुरवीचि माये ॥५॥
सुगंध घेतां आपणचि नाक । गंधाचा गंध हाचि हा एक ॥६॥
मी माझें मज न दिसेची कोठें । बहुता जुगांचे हरिले सांठे ॥७॥
ठकूनियां निळा अवघाचि नेला । सकळही त्याचें आपणचि झाला ॥८॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३०

आत्मा निघोट निर्मळ

आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥१॥
जेवीं मृगजळातें भानु । प्रगटूनियां वेगळा भिन्नु ॥२॥
आत्मबिंब नव्हे छाया । तैसीं स्वरुपीं मिथ्या माया ॥३॥
निळा म्हणे हें स्वानुभवें । विचारितां होईल ठावें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३१

आंतु बाहेरी देखणाचि दिसे

आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥
ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥
त्याविण दिसतें देखतें देखतें कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥
निळा म्हणे आठव न धरे । तेणोंचि अंतरे हातोहातीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३२

जेविं देखोनि सकळां

जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥१॥
परि तो न म्हणावा कीं अंध । देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥
अवधियांतें जाणे । जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥
निळा म्हणे आहे तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३३

जें जें कांहीं होय जाय

जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं ॥१॥
तें अव्दैतही लोपल्या पाठीं । आपणाचि पोटीं आपण ॥२॥
तया नांव स्वरुप म्हणती । जें निज एकांतीं एकलें ॥३॥
निळा म्हणे दावूनियां नामरुपा । नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३४

जैशिया तैसा मिळोनियां

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥
गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥
डोळा देखतां एकचि दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥३॥
निळा म्हणे वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३५

तोचि ब्रम्हविद जाण

तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन ॥१॥
व्दैताव्दैत मावळलें । पूर्णब्रम्ह अनुभविलें ॥२॥
जन वन तें समान । मन झालें पैं उन्मन ॥३॥
निळा म्हणे त्यांच्या नांवे । दोष नाशती स्वभावें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३६

याचिया ध्यानें हें चराचर

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥
मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥
चंद्रसूर्य तारांगणे । सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥
निळा म्हणे जनीं वनीं । हाचि भरोनि राहिला ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३७

येती जाती वर्षती मेघ

येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥
तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥
नाना नटिया नटवेष । परि तो आपणास भिन्न नव्हे ॥३॥
निळा म्हणे नानावस्त्राकार तंतु । दाउनी आपणांतु आपण ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३८

समोर सदा संर्वाकडे

समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत ॥१॥
कां हो नेणों हरी ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥
उदका अंगी जैसा रसु । गगनीं अवकाशु घनदाट ॥३॥
निळा म्हणे अंतर्बाह्य । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५३९

सगुण निर्गुण कल्पनेचा भास

सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥
स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥
आपलाचि सादु अंतराळीं जेवीं । दुजेंवीण दावी दुजेंपण ॥३॥
लटिकें म्हणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥४॥
स्वप्नमाजी जेवीं नाना परिवार । प्रबोधीं साचार एकलाचि ॥५॥
निळा म्हणे रज्जू भासे सर्पपणें । झकविलें तेणें नेणतीया ॥६॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४०

सर्वांमाजी गगन आहे

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥
तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥
सागरीं पडतांचि लवणकण । निवडितां भिन्न न निवडे ॥३॥
निळा म्हणे तैशा परी । बोलतांचि वैखरी लीन तेथें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४१

सोनें असे सोनेपणें

सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय ॥१॥
तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥२॥
नाना मृगजळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडीच ॥३॥
निळा म्हणे घटमठ मोडी । अवकाश परवडी नाहीं तया ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४२

सोयरा श्रीहरी

सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥१॥
नाहीं तया आपपर । वसवी सकळांचे अंतर ॥२॥
देवां दानवां मानवां । स्थूळ सूक्ष्मादिकां सर्वां ॥३॥
निळा म्हणे जीवमात्रीं । व्यापकपणें तोचि धात्री ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४३

पायीं चित्त हें राहिलें

पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥
मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥
बुध्दि बोध्दव्या मुकली । एकाकारता पावली ॥३॥
निळा म्हणे नाहीं देह । तेथें कैंचा तो संदेह ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४४

पूर्णापासुनी आले आंख

पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥
पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥
दशक वाढवूनी शेवटीं । पूर्णपणें घाली पोटीं ॥३॥
निळा म्हणे कांहीचि नाहीं । तेंचि या बीज विश्वा पाहीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४५

प्रसाद तुमचा लाधलों आतां

प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥
पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥
कृपा करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥३॥
निळा म्हणे सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४६

प्राणी प्राण अर्पे

प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें ॥१॥
ऐशा आहे प्रेमाकळा । परी तो बोधक विरळा ॥२॥
दृश्याचिया पाठीं । दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥
निळा म्हणे ज्ञानें । ज्ञेय राहिले होऊन ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४७

बहुरुपी हा एकला

बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥१॥
पुरुषाकृति स्त्रिया बाळें । होउनी कोणाही नातळे ॥२॥
नामें रुपें वस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणें ॥३॥
निळा म्हणे फळें पुष्पें । पर्णे मूळें भिन्नचि रुपें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४८

मन विश्रांति पावलें

मन विश्रांति पावलें । गुरुचरणीं स्थिरावलें ॥१॥
ज्ञानयुक्त होतां मन । ब्रम्हभूत झालें जाण ॥२॥
जिकडे जिकडे जाय मन । तिकडे तिकडे अधिष्ठान ॥३॥
निळा म्हणे मन । होऊनि ठेलें तें उन्मन ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५४९

माझेंचि मज नवल वाटे

माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं ॥१॥
निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥
कोठें कांहिंचि न दिसे दुजें । निजात्मतेजें जग भासे ॥३॥
निळा म्हणे अवघे ठायीं । मीचि नाहीं दुजी परी ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५०

माया ब्रहमींचा आभास

माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥
यालागीं दिसे ते टवाळ । रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥
सूर्यचि सूर्यातें प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥३॥
निळा म्हणे स्वसंवेदया । नातळे विदया ना अविदया ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५१

माझिये मनीं बैसला हरी

माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥
भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥
पाहे तेथें आपणचि दिसे । स्वरुप विलसे पदार्थी ॥३॥
निळा म्हणे जें जें कांहीं । भासे तेंही त्याचीं रुपें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५२

मी माझें पाहतां न देखेचि दिठी

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥
टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥
मृगजळनदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥
निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी त्या ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५३

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥
अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥
नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥
निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५४

अवघियांचे असोनि देहीं

अवघियांचे असोनि देहीं । अंतर्बाहीं न दिसेचि ॥१॥
जेवीं साखरमाजीं गोडी । न दिसे उघडी असतांही ॥२॥
वादय दिसती न दिसे नाद । जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥
निळा म्हणे तैसा आत्मा । न दिसेचि भूतग्रामा कवळुनी ॥४॥
ज्ञानें अवघेंचि जाणें । परि एक नेणे आत्मज्ञाल ॥१॥
बोल तितुके बोलचि वरी । परि न चढे पायरी प्राप्तीची ॥२॥
आपुलेंचि हित आपण नेणे । वरी आणिकां शाहाणें करुं धांवे ॥३॥
निळा म्हणे ठाकुनी लोकां । आपणहि नर्का जात सवें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५५

अवघें देखे ब्रम्हरुप

अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे ॥१॥
त्याची झाली चित्तशुध्दी । कृपानिधी तोषला ॥२॥
हरीच्या भजनीं अत्यादर । पडेल विसर संसारें ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५६

स्वामी एक म्हणवी दास

स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें ॥१॥
मुळींचे दोघां एकपण । परीं हें भिन्न्‍ दाखविलें ॥२॥
एक म्हणे धांवा धांवा । एक कुडावा करी त्याचा ॥३॥
निळा म्हणे नवल वाटे । साने मोठे नव्हती हे ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५७

भेदचि याचा नये हातां

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥
मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥
पाहों जातां बुध्दीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥३॥
निळा म्हणे नेदीचि कोणा । देखों आपणा लपवितसे ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५८

पाहणें पाहातें

पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥
मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥
उदो अस्तु सविता नेणें । जेथें तेथें आपुलेपणें ॥३॥
निळा म्हणे नर्भी नभ । जेवीं दावूनियां प्रतिबिंब ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५५९

पाहों जातां देखणे तेंचि

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥
आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥
बुध्दीच्या प्रवेशें हरपे । मन जेथें संकल्पेंसहित विरे ॥३॥
निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें त्या ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६०

नातळोनियां नामरुपा

नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा ॥१॥
न कळे याची माव कोण । देवां दैव्यां विचक्षणा ॥२॥
वेदश्रुति धांडोळितां । कार्यकारणही हा परता ॥३॥
निळा हा अनुमाना । न ये योगिया मुनिजनां ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६१

धन वित्त दारा सुत

धन वित्त दारा सुत । गणगोत मृगांबु हें ॥१॥
आणणचि स्वयें दृश्यत्वा येतां । भासवी तत्वतां दृश्यजाता ॥२॥
निजांगे जेवीं विलसे छाया । तेवीं हे माया मिथ्यत्वें ॥३॥
निळा म्हणे मुख्य बिबेंवीण । भासविती कोण प्रतिबिंबा ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६१

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥
चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥
चित्तेंविण चिंतणें बुध्दीविण जाणणें । मनेंविण अनुभवणें अनुभव्यातें ॥३॥
निळा म्हणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें गमन पवना जेवीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६३

नमियेलीं घरांत घरें

नमियेलीं घरांत घरें । शिवशक्ति वधुवरें ॥१॥
आदिगुरु चराचरा । पासुनी ज्या परंपरा ॥२॥
प्रसवोनियां दृश्यजाता । सुरासुरा मातापिता ॥३॥
निळा म्हणे वरद हस्तें । पावविती जे परमार्थातें ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६४

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा -संत निळोबाराय अभंग

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥
जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिध्दाईच ॥३॥
निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला देऊनि हातीं ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६५

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥
त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥
चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी । आले उठाउठी चांगदेव ॥३॥
चांगदेव जन्मविदयेचा आयास । आणि योगाळयास मूळकथा ॥४॥
कथा हे विचित्र करितां श्रवण । पुण्यपरायण होती श्रोते ॥५॥

नारायणडोहो पुण्यक्षेत्र ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥६॥
ग्रामलेखनवृत्ति यजुर्वेदी ब्राम्हण । पंचमहायज्ञ कुळशीळ ॥७॥
धर्मपत्नी झाली गर्भातें धरिती । गर्भाधाम रीती संस्कारे ॥८॥
आणूनि कुळगुरु केलें पुंसवन । आले मरुदगण उदरासी ॥९॥
होतां नवमास प्रसूतीचा काळ । उपजला बाळ कुळदीप ॥१०॥

स्वरुपें सुंदर सभार लक्षणी । देखतां लोचणीं मनोहर ॥११॥
अनुलोभन केलें सीमंतनयन । जातीकर्म विधान नामकरण ॥१२॥
बहुतचि चांगलें चांगा म्हणउनी । जनिता जननी नाम ठेवी ॥१३॥
निष्क्रमण आणि अन्नप्राशन झालें । पुढें आरंभिले चौलोपनयन ॥१४॥
व्रतबंध दीक्षा अनुग्रह गायत्री । संध्या वेदमंत्रीं संपादिलीं ॥१५॥
प्रज्ञाशीळ बुध्दि गुरुमुखें ऐकतां । संध्या संपादिलें ॥१६॥
चारी वेद साही शास्त्रें अभ्यासिलीं । अर्थे विचारिलीं स्वानुभवें ॥१७॥
उपवेद आणि उपशास्त्रें घोकिलीं । पुराणे अवगमिलीं अष्टादश ॥१८॥
व्रतें उदयापनें कथानकें वो वसे । अध्यात्में इतिहासें निपुण जाला ॥१९॥
क्षुल्लकादिकमंत्र क्षुल्लकादिक विदया । आभ्यासिल्या सध्या चमत्कृता ॥२०॥
चौदा विदया आणि चौसष्टीही कळा । अध्ययनीं आगळा दुजा नाहीं ॥२१॥
अतीथि ब्राम्हण येती दर्शनासी । वंदुनी चांगयासी करिती पूजा ॥२२॥
म्हणती विदयासिध्द अवतार जाहला । नेणों ब्रम्हा आला येणें वेषें ॥२३॥
सकळांसी हा पूज्य सकळांसी वंदय । सकळांसी हा अदय गुरु होय ॥२४॥
ऐसा स्तुतिवाद करिती ब्राम्हण । समर्पिती धन कनक वस्त्रें ॥२५॥
अमर्याद धन चांगया बहुमान । म्हणती कन्यादान दयावें यासी ॥२६॥
सत्पात्र जोडलें निज भाग्ययोगेसी । करिती मुधोपंतासी विज्ञापना ॥२७॥
वरासी दक्षिणा देऊं शें होन । तंव दुजा म्हणे व्दिगुण देईन मी ॥२८॥
एक म्हणती सहस्त्रमुद्रांचा संकल्प । करितों तरी अल्प्‍ यथाशक्त्या ॥२९॥
महानाम्नी व्रत महाव्रत गोदान । जाहलें उपनयन चतुर्दश ॥३०॥
तंव वेदमूर्ती गुरु बैसवुनी पंगती । पूजन करुनि स्तविती चांगदेव ॥३१॥
या उपरी करा लग्नाचा विचार । हमणती लहान थोर आप्तवर्ग ॥३२॥
विनवित अती नम्र पुसती सकळांसी । उदईक प्रारंभासी ग्रळा कोण ॥३३॥
विनवीत अती नम्र पुसती सकळांसीं । उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥३४॥
तंव ते विस्मित होउनी बोलती ब्राम्हण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥३५॥
आतां नाहीं पहावया उरला । एक तो रहिला योग्याभ्यास ॥३६॥
तरी उपदेशा म्हणती चांगदेव । दयावा अनुभव त्याचा स्वामी ॥३७॥
तेवढीच विदया राहातें तें काय । पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥३८॥
तंव ते म्हणती आम्ही नेणों योगमार्ग । नाहीं तो प्रसंग विचारिला ॥३९॥
काय आम्हां चाड तया योगेवीण । करुं संध्यास्नान जपादिपत ॥४०॥
युक्त आहारी जे कां इंद्रियांचे जती । तेचि योग्य होती मार्गी ॥४१॥
मितलें बोलणें मितलें चालणें । मितलें ज्यार घेणें अन्नरसा ॥४२॥
नैराश्य निर्लोभ लौकिकाविरहित । तेचि प्रवर्तत अभ्यासीं या ॥४३॥
हठयोगें करितां प्राणनिरोधन । तो आव्हाटा भरोन विटंबी देहा ॥४४॥
मग हा ना तोसा ठावो नपवोनि साधक । पावती निष्टंक क्षीणता देहे ॥४५॥
काळासी वंचन करितां क्षोभे काळ । मग तो नेदी स्थळ विश्रांतीचें ॥४६॥
नाना विघ्नें लय विक्षेप कशाय । रसस्वादनें अपाय रची त्यासी ॥४७॥
सिध्दीचा संभ्रम घालूनियां आड करी त्याचा नाड स्वहिताचा ॥४८॥
ऐशिया संकटी बळिया तोचि पावे । इतरांसी नागवे दुर्जय पवन ॥४९॥
तरी म्हणती सुज्ञा ऐकावें वचन । आहे तें कारण निस्पृहाचें ॥५०॥
जे अखंड एकांती शुचिष्मंत चित्तीं । तेचि दृढावती योगासनीं ॥५१॥
तरी ते योगी कोठें आहेती स्वामीया । सांगा जाईन पायां शरण त्यांच्या ॥५२॥
तंव व्दिज हमणती योगी नाहींत स्वदेशीं । असती वाराणसीमाजी विरुळे ॥५३॥
तरी म्हणती चांगदेव जाऊं महाक्षेत्रा । योग आणि यात्रा उभय कार्यी ॥५४॥
मग तीर्थरुपा आज्ञा मागोनि यात्रेसी । करिती मुहूर्तेसी स्वस्त्ययन ॥५५॥
क्षौरादिक विधी केलें घृतस्नान । दक्षिणा भोजन देउनी व्दिजां ॥५६॥
गणपती पूजन पुण्याहवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥५७॥
पूजियेलीं मातापिता उभयतां । आप्तवर्गा गोता गौरविलें ॥५८॥
समर्पिले तयां पुरे ऐसें धन । होय पुनरागमन आपुलें तों ॥५९॥
क्षेत्र प्रदक्षिणा पूजिंलें ब्राम्हणां । वंदिलें चरणां शिष्टांचिया ॥६०॥
निघाले बाहेरी मुहूतें प्रस्थान । आले बहुत जन बोळवित ॥६१॥
ऐकोनि प्रांतवासी आखमदीन जने । विनविती स्तवनें चांगयासी ॥६२॥
म्हणती आम्हां नाहीं घडली वाराणसी । आणि हेत तो मानसी बहूत काळ ॥६३॥
तरी चला समागमें क्षणती चांगदेव । होईल निर्वाहो सर्वांविशीं ॥६४॥
मग अनाथें दुर्बळें निघालीं बाहेरी । चालिलीं परिवारीं लक्षावत ॥६५॥
खर्चा वेंचा तया देती चांगदेव । आणि सांभाळिती सर्व मागें पुढें ॥६६॥
सुसंग जोडला म्हणती सकळ जन । नलगे घेणे ऋण संगे याच्या ॥६७॥
भागल्या श्रमल्या जाणे हा उपाय । रोगें येऊं नये याचे दृष्टी ॥६८॥
चालतां मारगी सामोरे जन येती । ऐकोनि कीर्ति अलौकिक ॥६९॥
महाव्याधी हरी अंधळयासी डोळे । वांझा पुत्रफळें पंगुसी पाय ॥७०॥
जे जे रोगी येती तयांसी उपाय । करिती तया काय उणें मग ॥७१॥
प्रार्थनी करिती पूजा समर्पिती धनें । तोषविती स्तवनें नारीनर ॥७२॥
भरिल्या गाडया धनें वस्त्रांच्या समृध्दी । जाती राजपदीं मिरवत ॥७३॥
ऐसे आले वाराणसी एकोनि व्दिजवर । क्षेत्रवासी भार पाहों आले ॥७४॥
देखोनि योग्यता सकळिकीं पूजिला । बहुमान जाहला महाक्षेत्रीं ॥७५॥
केला तीर्थविधी यथाशास्त्रन्यायें । पूजिलें समुदाये ब्रम्हवृंदा ॥७६॥
ग्रहप्रवृत्तिदानें मठभिक्षा दिधली । अष्ट तीर्थां केली प्रदक्षिणा ॥७७॥ म
ग गंध अक्षता व्दिजां करुनी पूजन । आर्तीचें वचन अनुवादती ॥७८॥
म्हणेती कोणा आहे योगाची धारणा । ते म्हणती आपणा गम्य नाहीं ॥७९॥
वेदाध्ययनीं आम्ही स्वधर्मी निरत । नेणों कैसी मात योगाची ते ॥८०॥
यज्ञाचार आम्हां षटकर्मांचा धंदा । नेणो उदावादा पवनाभ्यास ॥८१॥
महा विवरीं एक आहे योगिराज । ऐकतसों सहज कर्णोकणीं ॥८२॥
परी तें स्थळचि परम गुप्त अवघड भयंकर । करवे संचार कोणा तेथें ॥८३॥
तरी म्हणती चांगदेव जाऊं दर्शनासी । केलें स्तंभनासी व्याघ्रसर्पां ॥८४॥
पंचाक्षरी विदया भारियेली भूतें । केलीं शरणागतें वेजाळादी ॥८५॥
तंव प्रार्थिती व्दिजवर नवजावें आपण । काय त्या योगेविण खेळंबलें ॥८६॥
सर्व विदया तुम्हा आहेती स्वाधीन । कोणेविशीं न्युन पडिलें सांगा ॥८७॥
तया म्हणती चांगदेव जी एवढीच उणीव । येते येर सर्व आलोटिलें ॥८८॥
तरी म्हणती देवा ऐकावें वचन । जीवासी येतन तेथें जातां ॥८९॥
दरकुटी विशाळ आहे भयानक । जातां सकळ लोक मुकती प्राणा ॥९०॥
पिशाचें बहुवस असती विंचु सर्प । माजी गडदधुप अंधकार ॥९१॥
घरामाजी घरें व्दारामाजी व्दारें । विवरांत विवरें लक्षवरी ॥९२॥
गेलीया निर्गम नव्हेचि कोणासी । वर्जितों स्वामीसी याचिलागीं ॥९३॥
समागमी सर्व येती काकूलती । अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥९४॥
नवजावें आपण कदा विवरांत । सांगती आघात सर्व तेथे ॥९५॥
परी चांगदेवा साधणें हदगत । ते नाईकती मात कोणाचीही ॥९६॥
म्हणती आम्हां आहे खर्चावया धन । एक मास पाहेन जावें मार्ग ॥९७॥
करुनियां संचार शोधिलें विवर । गेले योगेश्रवर जेथें होता ॥९८॥
लागोनियां चरणां वेदाक्षरीं स्तविला प्रसन्न तो केला तपोराशी ॥९९॥
तो म्हणे बाळका कैसा तूं आलासी । संचार पवनासी नसतां येथें ॥१००॥
येरु म्हणे स्वामी आपुल्रूा प्रसादें । आला आशिर्वादें चरणांपाशीं ॥२॥
संसारे पीडिलां जहलों खेदक्षीण । म्हणोनि शरण आलों देवा ॥३॥
स्वामीच्य वचनें कजन्मांतरें फेरे । चुकती आणि दुस्तरें हरती कर्मे ॥४॥
करोनियां कृपा म्हणावा जी आपुला । सेवक धाकुला नेणता मी ॥५॥
नुपेक्षावा कदा आला शरणागत । हे तों धर्मनीत स्वमी खरी ॥६॥
हदगत हें माझें पाववावें सिध्दी । अहो कृपानिधी गुरुराया ॥७॥
मज शरणागता करावा उपदेश । सांगा योगाभ्यास करीन मी ॥८॥
विचारिती गुरु आपुल्या मानसीं । म्हणती अनुतापेसी शरण आला ॥९॥
अव्हेरितां यासी येईल दृशण । विरक्त हा पूर्ण् मुमुक्षू जाला ॥१०॥
अनुतापाचें लेणें लेऊनियां अंगी । जाहालासे विरागी देहगेहा ॥११॥
वयें तो लहान दिसतो सगुण । अध्ययनें संपन्न वेदवेत्ता ॥१२॥
सच्छिष्य विरळा जोडे भाग्ययोगें । महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी ॥१३॥
देउनी आलिंगन आश्रवसिला कृपा । म्हणती केला बापा अंगिकार ॥१४॥
यथा सांप्रदायें आज्ञा समावेश । दावियेल सौरस परंपरे ॥१५॥
बैसउनी सन्मुख घालविलें आसन । कळा स्थान मान उपदेशिती ॥१६॥
कृपावंत गुरु म्हणती यमनियम । करीं प्राणायाम प्रत्याहार ॥१७॥
ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा । साधवी शिष्येंद्रा सिध्दीलागीं ॥१८॥
रेचक पूरक कुंभक त्राहाटक । पवनाभ्यास ऐक स्थिरबुध्दि ॥१९॥
सगर्भ अगर्भ दिविले प्रकार । करी पवन स्थिर मनेजयें ॥२०॥
देह शीतल पडतां करी अग्निधारण । सोमधारण उष्णें पडितां देह ॥२१॥
प्राणनिरोधन सोहंमंत्रे जाण ॥ करी प्राणापान ऐक्य दोघां ॥२२॥
षटचक्रांचे भेद दाविले विषद । मुक्त ब्रम्हरंघ्र जेणें ॥२३॥
काकीमुख अग्निचक्र औटपी॥ गोल्हाट । सहस्ऋदळ श्रीहट पावावया ॥२४॥
नाद बिंदू कळा ज्योतीचा अनुभव । जेणें साधे सर्व तें तें आंगे ॥२५॥
जालंधर भेद आंताळी अभ्याळी । भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणें ॥२६॥
ऐकतां सादर मुद्रा ठसावली । समाधि लागली चांगयासी ॥२७॥
सद्गुरुच्या वचनें ऐके ज्या ज्या खुणा । पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणीं ॥२८॥
परी ते सविकल्प समाधी काष्ठा म्हणती तीसी । नावडे संतांसी मूर्च्छा म्हणोनी ॥२९॥
वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ति जडत्व तें ॥३०॥
देखोनि त्याची प्राप्ति विस्मय करिती गुरु । म्हणती हा चमत्कारु थोर झाला ॥३१॥
एकाचि क्षणें कैसा झाला या अनुभव । प्रज्ञा अभिनव बाळकाची ॥३२॥
बहुत दिवस मीही करितों अभ्यास । परी न लभेचि सौरस याच्या ऐसा ॥३३॥
नवल हें देखिलें एकाचि उपदेशें । भेदियेलीं निमिषें चौदा चक्रें ॥३४॥
भ्रमरगुंफेमाजी केला रहिवास । गिळोनि नि:शेष दशहि प्राण ॥३५॥
ऐशी सप्त वरुषें समाधि भोगिली । सत्रावी शोषिली अमृतकळा ॥३६॥
जिंकोनियां काळ घातला तोडरीं । उभविली गुढी विजयाची ॥३७॥
झाली योगसिध्दि मांडिलें व्युत्थान । केलें उन्मज्जन इंद्रियांचे ॥३८॥
देखोनि गुरुदेव आलिंगन देती । आणि अनुभव मागती समाधीचा ॥३९॥
वचनें तयासी अवस्था लाविली । कसोटी दाविली सिध्दाईची ॥४०॥
घेऊनि अनुभव निघाले बाहेरी । ते आले घाटावरी मनकर्णिके ॥४१॥
तंव त्या देखियेलें तीरींच्या ब्राम्हणीं । ते लागले चरणी्र धवोनियां ॥४२॥
म्हणती समागमी बहू झाले चुकूर । नव्हतां सत्वर तुमचें येणें ॥४३॥
क्षेत्रवासी ब्राम्हणीं करुनियां खेद । म्हणती प्रमाद थोर झाला ॥४४॥
गेले तें सांगती तुमचे ग्रामासी । न येतां तुम्ही रुदन करित ॥४५॥
नेले क्षेत्रामाजी वादयांच्या गंजरीं । घोष जयजयकारीं करुनि हर्षें ॥४६॥
बाणली असुमाई आंगी योगकळा । गुरुत्वें आगळा भसे लोकां ॥४७॥
उपरम झाला सकळ इंद्रियां । स्वरुपी विलया मन गेलें ॥४८॥
ऐसिया स्वानंदे बुझाविवलें चित्त । राहिली अवचित वदनीं वाचा ॥४९॥
अष्टही आविर्भाव उरले आंगी । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥५०॥
वेदत्रयी ठसा पडिला शरीरा । वृत्ती गेली घरा निजाचिया ॥५१॥
निमोनियां गेले शब्दाचें बोलणें । पवनुची प्राणें शोषियेला ॥५२॥
ऐसा सुखासुखी पावला विश्रांती । पदपिंडा समाप्ती करुनियां ॥५३॥
देशोदेशीं वार्ता विस्तारली ऐसी ॥ ते येती दर्शनासी सिध्दाचिया ॥५५॥
राजे भेटी येती अनुग्रहीत होती । आशीर्वाद इच्छिती लहानथोर ॥५६॥
जया जे जे पाहिजे ते ते विदया देती । म्हणोनी शरण येती प्राणीमात्र ॥५७॥
नाना उपासना शिकती बीजें न्यास । मंत्रादि यंत्रांस करिती साध्य ॥५८॥
वेदांचीं अध्ययनें शास्त्रांची परिज्ञानें । शिकती रसायनें चिकित्सा नाडी ॥५९॥
ज्योतिष आयुर्वेद निघंट घेकिती । कोश विचारित पंचाक्षरा ॥६०॥
जारणमारणादि सप्तही प्रयोग । एक ते आगम योग करिती साध्य ॥६१॥
गारुडाचे दंश नृत्य संगीतास । घेती बहुत शिष्य विदया ॥६२॥
असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । झाले शरणागत करिती सेवा ॥६३॥
यावरी व्दितीय प्रकरणींची कथा । परिसावी ते श्रोता देउनी चित्त ॥६४॥
निळा म्हणे पुढें ज्ञानेश्वर आख्यान । अदभुत महिमान सिध्दाईचें ॥६५॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे जन्मकर्म विदयायोगाभ्यासकथनं नाम प्रथम प्रकरणं समाप्तम ॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६६

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं ॥१॥
उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें आणि क्षेत्रां ॥२॥
प्रांतोप्रांतीं शिष्यसांप्रदाय आपुला । वाढवावा हा धरिला उददेश मनें ॥३॥
मना आलें तेथें समाधी बैसोनी । प्रगट व्हावें कजनीं दुजीये स्थळीं ॥४॥
सिध्दीसी खेळणें गगनेसी बोलणें । पवनेसी धांवणे अदृष्यगती ॥५॥

सत्यवाचासिध्दी मनेजयसिध्दी । प्राणज्योबुध्दी निश्चयेसी ॥६॥
सर्वही पाहिलें सवही शोधलें । सर्व अभ्यासिलें विदयाजात ॥७॥
वरिष्ठ सकळां व्याकरणीं आगळा । गायनाची कळा सप्तस्वरी ॥८॥
नृत्य करुं जाणे थैमानें संगीत । अनुकारें दावित हावभाव ॥९॥
दशावतार खेळे सोंगें नानापरी । विदया नाहीं उरी ठेवियली ॥१०॥

चौदाशें वरुर्षे काळाचा अतिक्रम । करुनि मठ आश्रम तप्तीतीरीं ॥११॥
जेवीं मोरासी सर्वांगीं विछावरी डोळे । परी एक आंधळे दृष्टावीण ॥१२॥
तयापरी विदयासिध्दीचा सोहळा । परी अपरोक्ष आंधळा आत्मज्ञानी ॥१३॥
नेणे भक्तीप्रेम सुखाचें साधन ।सीगे चढला मान सर्वज्ञेचा ॥१४॥
चौदांशे वरुषांचे सिध्द चांगदेव । स्वीकारिती भांव पूजकाचे ॥१५॥
विदयेचे मूळपीठ साधनी वरिष्ठ । स्वधर्मेकनिष्ठ व्रतधारी ॥१६॥
आरोग्य शरीर आंगी दिव्य कांती । नामें विराजती चतुर्दश ॥१७॥
चांगदेव चांगा वटेश्वर चांगा । चक्रपाणी चांगा चांगसिध्द ॥१८॥
शिवयोगीचांगा मणीसिध्दचांगा । अनकरचांगा नाहमानामें ॥१९॥
मागेश नामें चांगा । सत्येसिध्द चांगा निश्चळदास ॥२०॥
चिंधादेवी चांगा म्हणवी बुटीचांगा । चौदानामें चांगा वर्तामान ॥२१॥
राजे प्रजालोक अनुग्रहीत झाले । विदया अभ्यासिले बहुसाल ॥२२॥
सिध्दीचा साधक वास तप्तीतीरीं । पुजिती नरनारी भावयुक्त ॥२३॥
नित्य नूतन यात्रा येउनी लक्षावत । पावोनी मनोरथ फिरोनी जाती ॥२४॥
वसविले बाजार भोवतें सवदागर । विकिताती संभार केणीयाचे ॥२५॥
त्रिकाळ पूजन त्रिकाल भोजन । करिती शिष्यजन आरतीया ॥२६॥
तंव आला अतिथी पांथीक व्दिजवर । सांगे समाचार पैठणींचा ॥२७॥
देखीलें अपूर्व चरित्र लोचनीं । विस्मय तो मनीं नित्य वाटे ॥२८॥
म्हणे जी सिध्दिराया नवलाची वर्तलें । प्रतिष्ठानीं देखिलें सर्व जनीं ॥२९॥
म्हैशीपुत्रामुखें बोलविल्या श्रुती । येउनी बाळमूर्ति महासिध्द ॥३०॥
आणूनि स्वर्गवासी पितर जेवविले । ते पुढती बोळविले निजस्थाना ॥३१॥
तें ऐकोनियां सकळही धि:कारिती त्यासी । म्हणती जाला यासी बुध्दीभ्रंश ॥३२॥
कैसा हा बोलीयेला भयचि न धरितां अजागळी वार्ता अघटीतची ॥३४॥
म्हणती या मूर्खासी भोवंडा बाहेरी । पिशाच निर्धारी बरळे भलतें ॥३५॥
तंव तो म्हणे स्वामी निजनेत्रीं देखिलें । आणि तुम्हां हें वाटलें मिथ्या वाक्य ॥३६॥
तंव सिध्द म्हणती त्यासी येऊनियां जवळी । सांगावी समुळी वितली कथा ॥३७॥
न वाटेचि हें सत्य अनुमानें सांगतां । केंवी झाला वदता पशू मुखें ॥३८॥
काय त्यांची नांवे जीहीं बोलवीला । म्हैसा पढविला निगमे केंवी ॥३९॥
तरि तो म्हणे स्वामी परिसावें सादर । सांगेन सविस्तर वर्तमान ॥४०॥
तेथें चौघेंजणें बाळें अकस्मात आलीं । अंगी विराजली योगमुद्रा ॥४१॥
प्रायश्चितालागी आलीं तया स्थळा । परि दाखविली लीळा असुमाई ॥४२॥
निवृती ज्ञानदेवा सोपान मुक्ताई । नांवाची नवाई विप्रीं केली ॥४३॥
सातवें वरुष विरजे निवृत्ती । साहा वरुषांची मूर्ति ज्ञानेश्वर ॥४४॥
पांचवें वरुष सोपानदेवासी । बाळकें म्हणती नानीरगोंडी ॥४६॥
म्हणविती पतीत नाहीं वडीलधारें । पातित्य कवण्या व्दारें पुसावयासी ॥४७॥
तंव ते म्हणती स्वामी धाडिलें ब्राम्हणीं । तीहीं दिधलें लिहूनि सविस्तर ॥४८॥
मग त्या दाविती वंशावळी पत्रिका । आणि म्हणती कीजो रंकां पावन आहमां ॥४९॥
पत्र तें वाचिती सादर मानसें । ऐकती विन्यास विप्रकुळें ॥५०॥
आपेगांवकर गोविंदपंत निराई । आणि सिदोपंत गिरजाई आळंकापुरी ॥५१॥
ते श्रीगैरनीनाथाची शुध्द सांप्रदायी । परी येरयेरा नाहीं परिचय कदा ॥५२॥
त्या गोविंदपंता उदरीं वंशाचा उध्दार । उपजला कुमर विठ्ठल नामें ॥५३॥
केला व्रतबंध पढविला अक्षर । वेदातादि सारसांख्ययोग ॥५४॥
परमार्थिक ग्रंथ पाहिले गुरुमुखें । अध्यात्मी निजमुखें विराजला ॥५५॥
परम विरक्त ज्ञानाया सात्विक । ब्रम्हचर्य निष्टंक व्रत चाळी ॥५६॥
मातृपितृभक्त परम सुशीळ । नेदी अहंतामळ लागों अंगी ॥५७॥
परी जावें रामेश्वरा उत्कंठीत मनीं । मग तीर्थरुपा पुसोनि निघते झाले ॥५८॥
ब्रम्हचर्य व्रत त्रिकाळ साधन । स्त्रानअर्ध्यदान करित चाले ॥५९॥
गोदा उभय तीरें अवलोकिलीं । पुढें चालीं भीमातीरें ॥६०॥
मधुकरभिक्षा अनुतापें अथीला । तो आळंकापुरा आला अकस्मात ॥६१॥
तंप तेथें गिरजाई होते सिदोपंत । परम भागवत स्वधर्मशीळ ॥६२॥
तीहीं विठोबाची देखोनियां स्थिती । कन्या दिधली हाती संकल्पुनी ॥६४॥
करुनियां लग्न शुध्द कन्यादान । केली समर्पण रुक्माई त्या ॥६५॥
मग ते तीर्थवासु गेल रामेश्वर । करुनियां इतरा दक्षिण तीर्था ॥६६॥
सवेंची तेथुनी गेले वाराणसी । तंव ऐकिलें वार्तेसी गांविचीये ॥६७॥
गयावर्जनाचा श्रीगोविंदप्रतासी देवआज्ञा झाली । मग उत्तरकार्य करुनी गयेसी गेले ॥६८॥
गयावर्जनाचा संपादिला विधी । जाले शुध्दबुध्दी विरक्ती बळें ॥६९॥
ऋणत्रयापासुनी झाला तोहि मुक्त । मग आले ते पुनरक्त महाक्षेत्रा ॥७०॥
विरक्त मानसीं अनुतापाचें बळ । वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥७१॥
मठी नृसिंहाश्रमासी जाऊनियां शरण । केलें विसर्जन गृहस्थाश्रमा ॥७२॥
सर्व प्रायश्चितें केला प्रषोच्चार । नशिले विकार साही वैरी ॥७३॥
पूर्व आश्रमाचें त्यागूनियां नाम । जाले चैतन्याश्रम सतीधर्मे ॥७४॥
शिरीं नारायण उदरीं नारायण । गायात्री नारायण सर्व संधी ॥७५॥
जनीं नारायण विजनीं नारायण । वंदनीं नारायण सर्वकाळ ॥७६॥
सद्गुरुसेवनीं राहीले सतत । ते ऐकिीयेली मात सिदोपंती ॥७७॥
करुनियां खेद उभय दंपत्य । ह्रदयीं रुक्माईतें आलिंगिती ॥७८॥
म्हणती सर्वोविसीं तुझें वो अनहीत । आम्हीचि तें नेणत केलें मूर्खी ॥७९॥
पांथिाक विरक्त आला तीर्थवासु । तो देखोनियां उदासू दिधलें तुज ॥८०॥
होणार ते बळीवंत होऊनियां गेलें । पूर्वार्जिता न चले कांही ॥८१॥
जिता अन्न तुज देऊं चीर चोळी । तुंचि आमुचे कुळीं कन्यापुत्र ॥८२॥
यावरी तुळसीवृंदावनीं पूजन । करुनि प्रदक्षिणा सारी काळ ॥८३॥
मग तेंचि दृढ व्रत धरियेलें रुक्माई । नेणे दुजें कांही सेवेवीण ॥८४॥
तव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नीं दृष्टांत । झाला अकस्मात महाक्षेत्री ॥८५॥
चैतन्याश्रमासी आहे भार्या घरीं प्रतिव्रता माहेरीं मार्ग लक्षी ॥८६॥
तरी तुम्ही जाऊनियां आणावी ते येथें । आणी दयावें संन्याशातें तिचिये हातीं ॥८७॥
उभयतां एकत्र नांदवावी ऐक्यें । जंव होती बाळकें चौघे पोटीं ॥८८॥
इंद्रायणीतीरीं आहे ते सुंदरा । माजी आळंकापुरा प्रतिव्रता ॥८९॥
तरी तुम्हीं अनुमान न करितां सदथीं । जावें शीघ्रगती आणवी ते ॥९०॥
मग नृसिंहाश्रम आले आळंकापुरासी । आणी नेलें वाराणसी सिदोपंत ॥९१॥
गिरजा बाई सवें रुक्माबाई घेतली । त्या उभयां भेटी केली वधुवरां ॥९२॥
आज्ञापिलें तेव्हा चैतन्याश्रमासी । रहावें सहवासी स्त्रियेचिये ॥९३॥
जंव चवघे अपत्यें होती ईचे कूसीं । तंव तुहमी उदासी नये होऊं ॥९५॥
दंड कमंडलु घेतला हातीं । आणि केला उभयतांचा मेळा पाक ॥९५॥
करुनियां यात्रा आले आळंकापुरासी । कन्या जामातेसी सिदोपंत ॥९६॥
त्यां देखोनि प्रांती उपहासिलें बहूत जनी । म्हणती यातें नयनीं पाहों नये ॥९७॥
संन्यासी होऊनी भाग्येशी संबध । स्वप्नीं हें निषिध्द न देखावें ॥९८॥
वनिता आणी घरीं आणि बाहेरी संन्यासी । आतळतां यासी प्रंत्यवाय ॥९९॥
कामलोभी तरी कां झाला संन्यासि । नेलें पूर्वजांसी अध:पाता ॥१००॥
हरिलें शिखा सूत्र वर्ण याति गोत्रा । ग्रहदारादी सर्वत्र त्यजूनियां ॥१॥
आणी घेऊनियां पत्नी पहुडे हा शेजेसी । पापात्मा संन्यासी पापरुपी ॥२॥
विटाळ मानिती सर्वही दर्शनाचा । म्हणती हा पतीतांचा शिरोमणी ॥३॥
बुडविले स्वधर्म चतुर्थश्रमासी । इहलोक परत्रासी आंचवला ॥४॥
विटंबिली काया नासीला परमार्थ् । वेदबाह्य अनर्थ केला येणें ॥५॥
धिक् ऐसें जिणें म्हणती स्त्रियाबाळें । नेली उभय कुळें निरयवासा ॥६॥
उबगोनी षटकर्मा त्याजिलें शिखासूत्र । आणि अपंगिले कलत्र परिग्रहो ॥७॥
परि तो कोणासीहि न बोले वचन । सर्वदा लपोन वसे गुंफे ॥८॥
नैवेदय वैश्वदेव नाही स्मार्ताध्यान । श्राध्द ब्रम्हयज्ञ विवर्जित ॥९॥
तयाची संतती मुलें चौघें जणें । प्रायश्चित कोणें कैसे दयावें ॥१०॥
वडील निवृत्तह दुजा ज्ञानदेवो । तिजा सोपानदेवो मुक्ताबाई ॥११॥
वाचिलीया पत्र हांसती सकळ । म्हणती यातिकुळ नाही यांसी ॥१२॥
नव्हतें जें ऐकिलें तें नेत्रीं देखिलें । अपूर्व ही मुलें श्रीपादाचीं ॥१३॥
चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबध । ऐकतां हें निषिध्द घडती दोष ॥१४॥
ठेवियेलीं नांवे बरवी विचारुनी । केलीं उपजवोनी पतित पोरे ॥१५॥
ज्ञानदेवा अर्थे ज्ञानाचा दिवस । आणि होता पतित वेष बाळकाचा ॥१६॥
यातिचिये पोटीं जन्मले पतीत । नामें विपरीत ठेवियेलीं ॥१७॥
जेविं छत्रपति म्हणती घरींच्या बाळका । परी कैंचा गज सिक्का राज्या त्यासी ॥१८॥
निवृत्ति नाम आणि प्रवृत्ति बांधला । सोपान अवघडला प्रत्यवाई ॥१९॥
मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी । ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥२०॥
तंव एक म्हणती होता नामापासीं काय । राजा आणि वाहे मोळया शिरीं ॥२१॥
रवी नाम आणी दधी मंथन करीत । फणी विचंरीत वनित वनिता केश ॥२२॥
इंद्रधनुष्य आणि क्षणामात्रेंची विरे । मेरु आणि फिरे माळेसवें ॥२३॥
पैल तो गे म्हैसा पखाले वाहती । आणि र्याना तया म्हणती विश्वजनीं ॥२४॥
म्हैसीपुत्र आणि नामें म्हणती ग्याना । तरी काय तो हाईन प्रज्ञाशीळ ॥२५॥
हे ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयांसी । होती ज्ञानरासी आत्मा माझा ॥२६॥
आज्ञानासी ठावो नाहींची पाहतां । विचारावें आतां देईल साक्ष ॥२७॥
म्हणती व्दिज हे पूर्णाची बोलणी । बोलती वायाणी मूर्खे पोरें ॥२८॥
उपवासी उदार देती णाल्या ऐसे । परि ते फोस कजैसें भुकेल्याचें ॥२९॥
श्रीपाद बोलता ऐकिलीं जीं वचनें । तेची धरुनि मने बैसलीं हे ॥३०॥
कुपथ्य हें यासी झालें सर्वोपरी । प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा ॥३१॥
वासुदेव सर्वांभूतीं हे बोलती । परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥३२॥
शुका सनकादिकाचे हे स्वानुभव द पावती मानव कैशापरी ॥३२॥
शुका सनकादिकाचे हे स्वानुभव । पावती मानव कैशापपरी ॥३३॥
शब्दज्ञानी सर्वहि कथनीं हेंचि कथिती । परी तैसा न पवती स्वानुभव ॥३४॥
ऐशा करुनियां खीक्या धि:कारें बोलती । नाश केला म्हणती वृथा ज्ञानें ॥३५॥
पुसा यासि कैसा तुझा आत्मा पशू । हा दावी सौरसु बोलिल्याचा ॥३६॥
त्याचीया ताडणें तुज येती वेदनपा । कीं पावसी घातना त्याच्या घातें ॥३७॥
हा दाविशी चमत्कार तरी तूं ज्ञानेश्वर । ऐसें व्दिजवर बोलियेलें ॥३८॥
म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा । म्हैसा आणवावा जवळीके ॥३९॥
मग आणूनि टोणगा मारिती शिपुटी । तव तोचि उठी ज्ञानदेवा ॥४०॥
देखोनि आश्चर्य येरयेरां दाविती । आसुमाई हें म्हणती नवल थोर ॥४१॥
बोलिल्या सारखी कर्तृत्वाची शक्ती । आंगी तोचि विभूति ईश्वराची ॥४२॥
उदंडें बोलतो हावभाव दाविती । परी ते प्रतिष्ठाची मिरविती ॥४३॥
आजी हें अपूर्व देखिलें लोचनीं । जें परदु:ख लेऊनि दाविलें अंगी ॥४४॥
तंव ते कुटील म्हणती हे सर्व ही बाजीगिरी । दावितीती परी विदयाचिया ॥४५॥
गौड बंगाली हे विदया प्रसिध्द । शिकवूनि प्रबध्द केलीं पोरें ॥४६॥
चतुर्थाश्रमांत करिती तीर्थाटणें । शिकला टाणेटोणे क्रियाभ्रष्ट ॥४७॥
पतीत संन्यासी पत्तिताचे मंत्र । पढविलें अपत्रि अर्भकांसी ॥४८॥
सर्वांविशीं तेणें नाश केला यांचा । जें प्राश्चित वाचा न वदे श्रुती ॥४९॥
गुरु आज्ञेवरी हाकऊनि सोकाळ । लावियेला विटाळ चतुर्याश्रमा ॥५०॥
अभिचार पूजा कापटयाचीं बीजें । घोकविलीं बोजें मूर्खा पोरां ॥५१॥
या अर्भकांसी थार नाही ऐसी केली । आणि उभकुळें नेलीं पतनव्दारा ॥५२॥
तंव सात्विक प्रबुध्द बोलती तयांसी । नये गुणदोषी चित्त ठेवूं ॥५३॥
दीक्षादानी ऐसे भासती लोचनीं । पैशून्य वचनीं काय काज ॥५४॥
न कळेचि महिमा कदाहि कोणचा । नये बोलों वाचा हेळसुनी ॥५५॥
जानकी स्वयंवरीं श्रीराम बाळरुप । भंगूनियां चाप पर्णिली सीता ॥५६॥
बटूरुपी वामन तीन पादभूमी । मागोनि आक्रमी अवनी सर्व ॥५७॥
तैसाचि प्रल्हाद दैत्याचिया वंशी । झाला वैष्णवांशी अग्रगण्य ॥५८॥
मर्कट योनीसी जन्मला हनुमंत । प्रताप अध्दूत आंगी त्याचे ॥५९॥
घटामाजी जन्म आणि प्राशिला सागर । पहा तो व्दिजवर अगस्तीमुनी ॥६०॥
असो हें न झांके सुवर्ण कसवटी लावितां । भानू आच्छादितां अभ्रछाये ॥६१॥
याहिवरी यासी युक्ति एकी आहे । जेणें नि:संदेह फिटे भ्रांती ॥६२॥
जरी हा बोलवील पशु निजमुखें । तरी याचे श्रुतिकें आत्मज्ञान ॥६३॥
तरी मानूं म्हैसा याचा आत्मा खरा । करुं परिहारा दोषमुक्त ॥६४॥
ऐकोनियां सकळ मानवले व्दिज । म्हणती हेचि वोज बरवी युक्ति ॥६५॥
येहवी पध्दती नाहीं ग्रंथांतरीं । प्रायश्चित्तावरी वचन याच्या ॥६६॥
यतीधर्मामाजी पत्नी आपंगिली । नाहीं हे ऐकिली शिष्टाचारीं ॥६७॥
कैचें प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरां । कीजे परिहारा दंडूनि दोषां ॥६८॥
न करवे सर्वथा याचा अंगिकार । बरवा हा विचार काढियेला ॥६९॥
वरी म्हणे निळा पुढीलीये प्रकर्णी । वेद घोषे वाणी गर्जेल पशू ॥७०॥
॥ इति श्री चांगदेव चरित्रे ज्ञानेश्वर जन्मकर्म निरुपणं व्दितिय प्रकरणं समाप्त ॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६७

बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें

बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥
विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥
तुझा याचा आत्मा आहे एक जरी । वदवी ग्यान्या तरी येचि क्षणीं ॥३॥
नाहीं तरी वृथा न करावी वल्गना । घेऊनियां पतना जावें स्थळा ॥४॥
हमणती ज्ञानदेव तुमच्याचि प्रसादें । करील घोष वेद म्हैसी पुत्र ॥५॥

कराल तें काय नव्हे धरामर । पाषाणीं ईश्वचर प्रतिमे स्थापा ॥६॥
ग्रथत्रयामाजी सांगा जी निरुता । पढावा कोणता वेद येणें ॥७॥
ऐकोनि सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदचि म्हणती पढवा यासी ॥८॥
देऊपि वरदान केली आज्ञा त्यासी । पशू प्रारंभासी करिता झाला ॥९॥
मुख्य प्रणवाच्चार काढियेला स्वर । देखोनि व्दिवर ठकावले ॥१०॥

लागली टकमक सांडलें निज धैर्या । म्हणती गेलों वांयां दुराभिमानें ॥११॥
संहिता पद क्रम उपन्यासें त्वरित । सूत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥१२॥
अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राम्हण । मांडिलें अध्ययन जुगादीचें ॥१३॥
बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वारी । हें सकळ व्दिजवरीं देखियेलें ॥१४॥
गळाले अभिमानें जाहले बिगलीतं । चरणीं लोळत दीनपणें ॥१५॥
म्हणती हेचि देव तिन्ही मूर्तिमंत । मुक्ताई सादयंत परामाया ॥१६॥
नेणोनियां महिमा चावळनसें जी देवा । तो परिहार आतां दयावा काय किती ॥१७॥
घडले जे अपराध ते ते करा क्षमा । अहो सिध्दोत्तमा विश्वसंदया ॥१८॥
अज्ञान गर्वित गेलों जी अभिमानें । बोलियेलों वचनें अमर्यादे ॥१९॥
सर्वी सर्व तुम्हीं सदा सर्वगत । कैंचें प्रायश्चित नित्यमुक्ता ॥२०॥
निमित्तें करुनि करितां उध्दार । जडजीवां आधार चरण तुमचे ॥२१॥
विश्वाच्या उध्दारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥२२॥
कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापुनी सकळांतें सगुणरुपीं ॥२३॥
ऐशीं करुनि स्तवनें करिती दंडवत । आणि मागती आज्ञेतें विनीतता ॥२४॥
घेऊनि निरोप जाती मंदिरासी । हमैसा देऊनि त्यासी पढीण म्हणू ॥२५॥
ऐकोनि अदभूत ऐसा चमत्कार । येती नारीनर नमस्कारा ॥२६॥
घरोघरीं चर्चा स्त्रियाबाळें करिती । प्राणीमात्र वर्णितीत कीर्ति त्यांची ॥२७॥
मिळोनि परस्परें विप्र अनुवादती । योग्यता हे म्हणती नकळे त्यांची ॥२८॥
आणीकही एक नवल वितलें । क्षेत्रींच्या देखिलें सर्व जनीं ॥२९॥
करिती विस्मयचर्चा तंव येरें दिवसी । श्राध्द गृहस्थासी होतें घरीं ॥३०॥
तेणें त्या चौघांसी दिधलें निमंत्रण । त्याचे पितृगण आणियेले ॥३१॥
देऊन भोजन केले स्वर्गवासी । सांगितली ऐशी मात तेणें ॥३२॥
तें सादर चांगदेवें ऐकीयेलें श्रवणी । आणखीही ब्राम्हणीं संनिधींच्या ॥३३॥
श्रवणेंचि सिध्दासी ताटस्थ्‍ा लागलें । प्रश्नी वियारिलें ज्योतिषमतें ॥३४॥
तंव तें सत्य ऐसें आलें अनुमाना । विस्मयें त्या नयनां अश्रु आले ॥३५॥
म्हणे हें तों नव्हे तपाचें सामर्थ्य । होती मूर्तिमंत देवची ते ॥३६॥
अपूर्व हे वार्ता नवलचि ऐकिली । पूर्वी नाहीं झाली नव्हे पुढें ॥३७॥
अनुतापें झाला उव्दिग्न मानसीं । पुसे ब्राम्हणासी पुढतोपुढती ॥३८॥
कोण त्यांचा ग्राम झाले किती दिवस । व्दिज म्हणे मास एक झाला ॥३९॥
इंद्रायणी तीरीं आहे अलंकापूर । तेथे निरंतर वास्तव्य त्यां ॥४०॥
पुसोनि ब्राम्हणा गेले निवासिया । म्हैसा घेऊनियां समागमें ॥४१॥
ऐकोनि चांग देवें शिष्य पाचारिलें । आणि एकांतासी गेले सांगती त्यां ॥४२॥
यावरी पूजन न करावें आमचें । सांगतो हें साचें धरा चित्तीं ॥४३॥
तंव ते विनविती होऊनि भयभीत । आज्ञा किंनिमित केली ऐसी ॥४४॥
आम्ही तों अज्ञान नेणों स्वामी सेवा । अपराध तो देवा कीजे क्षमा ॥४५॥
त्या म्हणती चांगदेव पूजेचे अधिकारी । आले महीवरी तेचि पूज्य ॥४६॥
जेवीं सूर्यवंशी अवतरतां राघव । राहिला भार्गव मागील मागें ॥४७॥
शिष्ट असतां पूज्य न दयावी आपण । आहें प्रमाण वेदशास्त्रीं ॥४८॥
घडतां अमर्यादा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥४९॥
शतमख करुनियां नहूष्‍ स्वर्गा गेला परी अमर्यादें पावला सर्वत्व तो ॥५०॥
त्रिशंकू सगर ऐस सांगों किती । अमार्यादें येती पतनव्दारा ॥५१॥
तरी ते जूज्य प्रकट झाले मूर्तिमत । ऐकिलें तें सांप्रत याचि काळे ॥५२॥
नव्हती ते मानवी देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥५३॥
मुक्ताबाई आदिमाया हे जननी । केला प्रतिष्टानीं कीर्तिघोष ॥५४॥
म्हैसीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती । आश्चर्य हें चित्तीं बहूत वाटे ॥५५॥
जावें भेटीलागी विचारलें मनीं । हे सिध्दी माधनीं नव्हें कोणा ॥५६॥
अनुतापें झाला संतप्त मानसीं । म्हणे सिध्दाईसी खेव आला ॥५७॥
तंव बोलती प्रबुध्द त्यासीचि आणावें । अहो मूळ पाठवावें सिध्दराया ॥५८॥
सर्व सत्ता तुम्हां आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आज्ञेमाजी ॥५९॥
तंव म्हणती चांगदेव नव्हे हा विचार । आज्ञेचा बडिवार कोणा अंगीं ॥६०॥
वंचूनियां काळा रक्षिलें शरीर । बहुत दिस भार वाढविला ॥६१॥
परी हें सामर्थ्य नाहीं आम्हां अंगी । जावें भेटीलागीं हेंचि सत्य ॥६२॥
जन्माचें सार्थक सिध्दाचीये भेटी । होईल या तुटी संसारेसीं ॥६३॥
परी सिध्दपणा येईल उणीव । काय कीजे जीव तळमळी ॥६४॥
ते म्हण्‍ती देवा हे नव्हे सत्य वार्ता । म्हैसी केवीं वदता होईल वेदा ॥६५॥
आणि मृत स्वर्गवासी पितर कैसे येती । ते भोजने करुनि जाती हेंही मिथ्या ॥६६॥
स्वामीसी विश्वास वाटे भलतीयाचा । परी हा नव्हे साचा वर्तमान ॥६७॥
नाहीं ये वार्तेसी साक्ष पडताळा । बोलियेला वाचाळ मिथ्या व्दिजा ॥६८॥
तया म्हणती चांगदेव प्रश्न म्यां पाहिला । तोही उतरिला यथार्थ्पणें ॥६९॥
तों शिश्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो । न सांपडता जातो वेळ काळ ॥७०॥
हें ऐकोनी तयांसी सिध्दद म्हणती तुम्ह मुर्ख । अरे विदया आहे चोख पढित माझाी ॥७१॥
तरि ते म्हणती जहारे प्रतिष्ठाना । आणि हें वर्तमान आणा यथातथ्य ॥७३॥
चिरंजीव सकळ क्षेत्रवासी व्दिजां । आशीवाद माझा लिहा पत्रीं ॥७४॥
नवल हें ऐकिलें रेडा बोलविला । निगमाक्षरीं केला घोष तेणें ॥७५॥
स्वर्गस्थ्‍ा पितर आणूनि जेवविले । पुनरपि बोळविले स्वर्गाप्रती ॥७६॥
साच कीं मिथ्या धाडावे लिहुनी । तें ऐकावया मनी उत्कंठीत ॥७७॥
सांगती शिष्यासी जाऊनी त्वरीत । यावे शिघ्रवत वरावरी ॥७८॥
चालिले तेथूनी सत्वचर ब्राम्हण । ते पावले पैठण गंगातीरा ॥७९॥
तीहीं ऐकोनी चांगदेवें पाठविलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रावासी ॥८०॥
धूतवस्त्रावरी गाधुमाचां राशी । मांडिलें पत्रासी पूजा केली ॥८१॥
आलिंगिले पत्र कंठी दरीं शिरीं । वाचिलें समग्रीं श्रवण केलें ॥८२॥
कळला अभिप्रावो विस्मयें दाटलें । ते सिध्द आठवले बाळवेशी ॥८३॥
फुंदती गाळिती उभय नेत्रीं जीवन । म्हणती धन्य ईश तिन्ही ॥८४॥
पूर्वार्जितें होती उत्तम गोमटीं । म्हणोनि ते दृष्टीं देखियेले ॥८५॥
मग म्हणती सिध्दासी झालें हे उपश्रुत । नवल जें अदभुत वितलें येथें ॥८६॥
दिव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धांवत वायावरी ॥८७॥
कैसी विस्तारिली आख्या दूरदेशीं । आश्चर्य हेंचि मानसीं बहुत वाटे ॥८८॥
सन्मानुनी ब्राम्हणां दीधलें भोजन । वस्त्रें पांघरवून गौरविलें ॥८९॥
दिधली दक्षिणा मार्गी खर्चावया । पत्र लिहूनियां दिलें हातीं ॥९०॥
परात्परा सिध्दा गुरुसी नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी ॥९१॥
विदयार्थी ये आम्ही सर्वही ब्राम्हण । झालो सुखसंपन्न आशीर्वादें ॥९२॥
ऐकिले जे वार्ता सत्य विपली येथें । पढविलें पशूनें वेदघोषें ॥९३॥
गृहस्थाचे पितर आणुनी जेवविले । प्रत्यक्ष पाहिलें आपण नेत्री ॥९४॥
निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वय तों लहान बाळवेषी ॥९५॥
करुनि ऐसी क्रीडा येथुनी स्वार झाले । नेवासिया गेले महासिध्द ॥९६॥
तया स्थळी केला भगवदीता अर्थ । दहा सहस्त्र ग्रंथ सिध्द झाला ॥९७॥
बाबाजीपंतांनीं स्वहस्तें लिहिला । परी ओंवीबध्द केला ज्ञानेश्वरीं ॥९८॥
सच्चिदानंदबाबा ठेवियेलें नांव । शिक्षापिला भाव देखोनियां ॥९९॥
एक पशु दुजा सच्चिदानंदबाबा । शिष्य केले नभा नकळती ॥१००॥
येथूनियां जातां अळंकापुरीसी । पशू आळियापाशीं स्थापियेला ॥१॥
अजान वृक्ष तेथें ठेवियेली खूण । झालें निरुपण निवेदिलें ॥२॥
घेऊनियां पत्र व्दिज आले तप्तीतीरा । नमिलें वटेश्वरा चांगयासी ॥३॥
करुनि नमस्कार पत्र दिलें हातीं । नवलावो सांगती देखिले तो ॥४॥
म्हणती सत्य देवा अदभुत चरित्र । वर्णिती सर्वत्र तेथिंचे जन ॥५॥
वाचिलीया पत्र म्हणती चांगदेव । वार्ता अभिनव नित्य नवी ॥६॥
विचारितां दिसे नव्हें सामान्य । गेला अभिमान गळोनियां ॥७॥
कायरे अतिक्रम करविला मज हातीं । फिटली असती भ्रांती पाहोनि त्यांते ॥८॥
आतां तरी जावें म्हणती अलंकापुरा । सामग्रीया करा सिध्द वेगीं ॥९॥
तंव शिष्यजन सर्व गृहस्थ मिळाले । सकळीं प्रार्थिले म्हणती देवा ॥१०॥
सिध्दाई कोणाची नाहीं स्थिरावत । तपाचें सामर्थ्य वेंचलीया ॥११॥
आहे नाहीं आतां त्याचें सिध्दपण । धाडा विचक्षण पाहोनि येती ॥१२॥
मग तैशासारिखा करावा विचार । येणे येरझार चुके देवा ॥१३॥
मग पाचारिले प्रौढ वृध्द तपोराशी । जा म्हणती तयांसी अलंकापुरा ॥१४॥
वसती सिध्द तेथें निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥१५॥
सिध्दपण त्यांचे आहे कीं वेंचलें । तें पाहोनि यावें वहिलें वेगावत ॥१६॥
ते म्हणती स्वामीया संताचें लक्षण । काय कैसी खूण सांगा आम्हां ॥१७॥
वर वेषा आम्हीं पाहावें तें काय । अंतरीचें नव्हे विदयमान ॥१८॥
गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥१९॥
एक वेडे मुके पंगु मुद्राहीन । चतुर व्युत्पन्न दिसती एक ॥२०॥
देहाच्या संबंधें दिसे देहाकृती । अवस्थाही भोगिती यथाकाळें ॥२१॥
निद्रित निजेमाजी जागोचि जागृतीं । स्वप्न्रींहि देखती नानाविध ॥२२॥
इंद्रियां वर्तविती स्वभावव्यापारीं । दिसती संसारी अतिदक्ष ॥२३॥
बाळक कौमार वृध्दाप्य तारुण्य । दिसती लौकिकासारखेची ॥२७॥
न चोजवे आम्हां संतांचीं निज खूण । सांगावें लक्षण तेंचि पहों ॥२८॥
आंगे संत तोचि ओळखे संतासी । काय आणिकासी वर्म कळे ॥२९॥
म्हणती चांगदेव साच हे बोलिले । विचार न चले युक्ती तेथें ॥३०॥
कायरे करावें पूसती शिष्यांसी । ते म्हणती सिध्दासी दयावें पत्र ॥३१॥
लिहोनि पत्रिका दयावी यांचे हातीं । देऊनि हे पाहती स्थित्यंतर ॥३२॥
पत्राचं उत्तर काय देती कैसें । अर्थी अनायासें येईल कळों ॥३३॥
मग पत्र लिहावया बैसले एकांती । न चालेची युक्ति थोटावली ॥३४॥
अनामासी नाम अरुपाशीं रुप । कैसें लावूं पाप कल्पनेचें ॥३५॥
चिरंजीव म्हणों तरी विश्वात्मक । तीर्थरुप तरी बाळकदशा आंगी ॥३६॥
न दिसे पूर्वी न लभेचि अक्षर । पडियेला विचार न चले हात ॥३७॥
मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्तीं चिंतवणी पैठी झाली ॥३८॥
देखोनि सकळ प्रार्थिती सिध्दासी । कां हे दशा ऐसी विपरीत ॥३९॥
म्हणेती चांगदेवकाय रे लिहावें । मूळ न संभवे पत्रिकेचें ॥४०॥
तरी ते म्हणती देवा कोरें पत्र पुरे । दयावें अत्यादरें पाठवुनी ॥४१॥
युक्तीमाजी दिसे बरवा हा सिध्दांत । सिध्दाईचा अर्थ गूढ गुह्य ॥४२॥
घालुनियां घडी कोरें पत्र देती । आणि उत्तर म्हणती मागा त्यांसी ॥४३॥
जाऊनियां तुम्हीं यावें शीघ्रवत । करा दंडवत क्षेम सांगा ॥४४॥
चालिले तेथुनी आले शिवपीठा । वास्तव्य वरिष्ठा सिध्दा जेथें ॥४५॥
यावरि म्हणे निळा पत्राचें उत्तर । देती ज्ञानेश्वर परिसावें तें ॥४६॥
अत्यंत रसाळ आहे निरुपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥४७॥
॥ इति चांगदेव चरित्रे पत्र प्रेषणंनाम तृतिय प्रकरणं ॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६८

पावले ब्राम्हण अलंकापुरासी

पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥
देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥
पूजूनि सिध्दासी नरनारी बाळें । जाताती राउळा आपुलाल्या ॥३॥
बाळलीळा वेषें आनंदें खेळती । नर नारी देखती येतां जातां ॥४॥
खालावुनी माथा श्रीमुख पाहती । आपुलाल्या जाती कामा लोक ॥५॥

देखोनियां ब्राम्हण मनीं विवारिती । येथें नमस्कारिती मार्गी कोणा ॥६॥
पुढें देखियेल्या खेळतां कुमारी । पुसती उच्चस्वरीं तयांप्रती । ॥७॥
निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठें । कोणीकडे मठ आहे त्यांचा ॥८॥
ऐकोनि कुमारी हिडसुनी धिक्कारी । बोट कानावरी ठेवूनियां ॥९॥
कोठील रे तुम्ही नेणां विनीतता । उध्दट बोलतां महामूर्ख ॥१०॥

अर्भकाच्या परी नामें उच्चारुनी । पुसतां महामुनी सिध्दराया ॥११॥
दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥१२॥
गव्हाराच्या परी बोला सैरा शब्द । मूर्ख तुम्ही मुग्ध हीनबुध्दी ॥१३॥
व्यापकासी स्थान अपारासी मान । मानितां अज्ञान मूढमती ॥१४॥
ऐकावें स्वर्गीचे श्रीमंत गोसावी । नाटक लाघवी ब्रम्हांडाचे ॥१५॥
तया एकदेशी कल्पूनियां स्थान । पुसतां अज्ञान मठ त्यांचा ॥१६॥
तिहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणां महिमा त्यांचा मतिमन ॥१७॥
अरे ब्रम्हादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥१८॥
संज्ञामात्रें नेत्र खुणेनें दाविती । पहा ते खेळती नित्यमुक्त ॥१९॥
ज्ञानप्रभा दिनमणी ते उगवले । ते प्रत्यक्ष देखिले देव तिन्ही ॥२०॥
सहजाचें आसन आंगी योगकळा । देखियेली लीळा आत्मनिष्ठ ॥२१॥
देखतां लोटिले देह लोटांगणीं । लागले चरणीं अति नम्र ॥२२॥
म्हणती ज्ञानदेव चांगयापासून । आले हे ब्राम्हण समाचारा ॥२३॥
तें ऐकोनियां व्दिज म्हणती अंतर्निष्ठ । जाणीतलें स्पष्ट अंतरींचे ॥२४॥
यावरी सिध्दाइ्र असावी ते कैसी । सर्वांतरवासी देवचि हे ॥२५॥
लागोनियां चरणीं दिधली पत्रिका । सांगितलें निकें वर्तमान ॥२६॥
म्हणती चांगदेवें प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणांवरी ॥२७॥
पत्राचें उत्तर मागितलें स्वामी । भेटी अंतर्यामीं इच्छिताती ॥२८॥
म्हणती निवृत्तिनाथ वाचा ज्ञानेश्वरा । तंव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥२९॥
कोरें पत्र बरें निवृत्ति बोलती । पाकाची निष्पत्ती होय तेथें ॥३०॥
कोरें ते सोंवळें खरकटें ओंवळें । धुतल्याही जळें शुध्द नोहे ॥३१॥
कोरें तें निर्मळ स्वीकारिलें जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥३२॥
कोरीया अक्षर उमटे कसोटी । रददी जाय हाटी विकावया ॥३३॥
एकाक्षर ब्रम्ह प्रणवाचे कुशीं । नुच्चारे पुरेशी उच्चारिता ॥३४॥
पाविजे अक्षर गुरुकृपा खुणे येराशी उमाणे नुकलवे ॥३५॥
शिणती बहुतें करितां खटपट । अर्थ उफराटा पडे तयां ॥३६॥
अक्षर परब्रम्ह वेदा अगोचर । कैंचा अनुस्वार उमटला ॥३७॥
न चले जाणीव न चले शाहाणीव । तुर्का नुरे ठाव अक्षर तें ॥३८॥
पत्र लिहा तुम्हीं कृपेचा प्रसंग सोरसें । अज्ञापिलें ऐसे निवृत्तिनाथें ॥३९॥
रेखियेली पत्रीं लिखिती पासष्टी । पाहतां अर्थ दृष्टीं तत्वी पडे ॥४०॥
परम गुह्या गुह्य उपनिषदीभाग । कृपेचा प्रसंग संपादिला ॥४१॥
वाचिलीया अर्थ अणितां मानसीं । पाकजे अनायसी परमतत्वा ॥४२॥
न करितां यजन अध्ययन अध्ययन । न करिता साधन आत्मप्राप्ती ॥४३॥
देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोरपर सांगावा विवराहे ॥४४॥
घेऊनियां पत्र निघाले ब्राम्हण । वंदिले चरण पुढतोपुढतीं ॥४५॥
आले तप्तीतीरा नमिलें सिध्दासी । वर्तमान त्यासी निरोपिलें ॥४६॥
म्हणती सिध्दराया पाहिला जी महिमा । आंगी निरुपमा सामर्थ्याचा ॥४७॥
अदभुत ऐश्वर्य देखिलें लोचनी । दिधलें लिहोनी पत्र तुम्हां ॥४८॥
देऊनियां पत्र म्हणती व्दिजवरा । देवाचे अवतार नि:संदेहें ॥४९॥
मग करुनियां पूजा पत्र वाचियेलें । तंव गुह्य देखिलें न चले युक्ती ॥५०॥
मग म्हणे अभिमान अदयापि न जाळे । तिमिरें गेले डोळे न दिसे हित ॥५१॥
कृत्रिम आचरणें दशा झाली ऐशी । विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥
ऐकतों श्रवणीं पहावें लोंचणी । निश्चय तो मनी दृढ केला ॥५३॥
अनुतापें उददेश धरिला चांगदेवें । अळंकापुरा जावें सिध्दा भेटी ॥५४॥
तरी सार्थक धरिलिया जन्माचें । नाहीं तरी काळाचें भातुकलें ॥५५॥
न चुकती जन्म चौर्‍यांयशी यातना । काळासी वंचना कोठवरी ॥५६॥
पाचारिले वर्स परिपत्य अधिकारी । सांगती तयारी करावी त्यां ॥५७॥
वहनें सामग्रीया सिध्द करा वेगीं । जाणे भेटीलागीं सिध्दाचिये ॥५८॥
कोठवळे जमादार आले पोतनीस । सरंजाम त्यांस आज्ञापिला ॥५९॥
ऐकोनियां सर्व गृहस्थ शिष्यवर्ग । धांविले सवेग आले जवळी ॥६०॥
म्हणती सिध्दराया परिसावी विनंती । जाणें तरी युक्ति ऐसें जावें ॥६१॥
प्रतापें महत्वें आपुल्या महिम्यानें । ऐश्वर्य भूषणें सिध्दाईच्या ॥६२॥
विदयेच्या सामथ्यें आपुलीया वैभवें । जाऊनि भेटावें बडिवारे ॥६३॥
आपणा देखोनि झांकेल त्यांचे तेज । येतील तेहि सहज शरण पायां ॥६४॥
तैसाचि योजिला युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें सोंग बहुविध ॥६५॥
व्याघ्रावरी स्तंभनें सर्पासी मोहनें । सिध्द केलीं वहनें रथ वारु ॥६६॥
हाकारिला सर्व शिष्यसमुदाय । सांगितलें काय तयांप्रती ॥६७॥
बैसा व्याघ्रावरी सर्प धरा करीं । नाना अळंकारी जाऊ चला ॥६८॥
जाती चांगदेव भेटी समुदायें । महा महोत्साहें अलंकापुरा ॥६९॥
तप्तीतीराहूनि गृहस्थ अपार । सवें दळभार गजवारु ॥७०॥
कश्यप स्वामीचा फळला आशिर्वाद । राजश्रिया पद भोगप्राप्ती ॥७१॥
चालियेला राजे गृहस्थ मंडळी । केलीं विप्रकुळीं परस्थानें ॥७२॥
म्हणती सिध्दा भेटी होईल परस्परें । पाहों अत्यादरें उत्साह तो ॥७३॥
परिवारें सांगतीं घेतलीं स्त्रियाबाळें । व्यवसायीं पाठयाळ थोपटिली ॥७४॥
निघाला उदमि म्हणती सौदागर । भरियेले संभार गोणीयांचे ॥७५॥
हांशील जकाती न लगे चौकी देणें । लाभा नाहीं उणें पिकला कौल ॥७६॥
नटवे नृत्यांगना गुणिजनांचे भार । चालिले अपार समागमें ॥७७॥
ठाकूर नगारी गर्जती पवाडे । सवें चालती देव्हडे सिध्दापुढें ॥७८॥
गजावरी वादयें निशाणें कुसरी । द्रव्यें भरिल्या हारी गाडीयांच्या ॥७९॥
नरंमिन्याचीं दिंडें सवें शिकारखाना । राज्यभार सेना तैसा चालें ॥८०॥
डेरे कनातांचे लादियेले उंट । चालती संघाट काटीयांचे ॥८१॥
नौबनी नगारे वादयजात सकळ । घाषें तया भूगोल दुमदुमिला ॥८२॥
लक्षावत यात्रा तप्तीतीराहुनी । चालतां अवनी न पुरे मार्ग ॥८३॥
छबिने पताका मोरपिसा कुंचे । टाळ मृदंगांचे समारंभें ॥८४॥
शृंगारिला भेख विदयेच्या कुसरी । सोंगें नानापरी दर्शनाचीं ॥८५॥
सवारले शिष्य गुरु आज्ञेवरी । नाना वेषधारी बाह्यरंग ॥८६॥
चर्चियेलीं भस्में काशांबरवासी । मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाहीं ॥८७॥
कडुक कुंडले शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंबर नागवेचि ॥८८॥
जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नानावर्ण ॥८९॥
झोळया बटवे कक्षेमाजी जडया बुटया । आडबंद लंगोटया बटूवस्त्रें ॥९०॥
कुबडया काठया छडया वेणूदंड हातीं । टोप विराजती कफणीया ॥९१॥
कुंडले सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढाया गुडगुडया ॥९२॥
पक्ष्यांचे पिंजरे सांगाते कुतरे । चितळें सामरें सोकविलीं ॥९३॥
पांवे मोह्या चंग किन्नरी झल्लरी । डफ हुडुक करीं नागसरे ॥९५॥
गोरख छंदे हाती गोलाणें धनुष्यें । धांवति आवेशें विदयोचिया ॥९५॥
कुशळ कवि ते वाचाळ बोलते । बहुमतें झाकविते तर्कवादी ॥९६॥
फळें जळाहारी एक दुग्ध पिती । मौन्याचे व्रतस्थी पवनाभ्यासी ॥९७॥
व्याघ्रा आरोहणें रथाचीं वहनें । सर्पाचीं वेष्टणे नानाविध ॥९८॥
योगमुद्रा अंगी दाविती कसोटी । नाना लक्ष दृष्टी उफराटिया ॥९९॥
कलरवापरी अंजनें घालूनि नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥१००॥
भाविका नरनारी बाळा झकविती । हेंचि ब्रम्हा म्हणती तेजाकार ॥१॥
सत्याचा दुष्काळ असत्याची रुढी । दाविताती प्रौढी थोरपणा ॥२॥
मार्गीचे जन लोक सामोरे धांवती । लोटांगणी येती चांगदेवा ॥३॥
नानावस्त्रें भेटी सिध्द सामग्रिया । समर्पोनी पायां नमस्कारिती ॥४॥
याचेनि दर्शनें जडजीवां उध्दार । करिती जयजयकार नामघोषें ॥५॥
आले पुण्यस्तंभा श्रीगोंदें सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ॥६॥
व्दिज संतर्पणें वांटियेलीं दाने । पुढारी गमनें आरंभिलीं ॥७॥
आळेखिंडीवरुनि चालियेले भार । केले नमस्कार म्हैसीपुत्रा ॥८॥
केंदुरावरुनि उतरले घाट । गर्जती उध्दट सिध्दनामें ॥९॥
कान्होपाठक प्रीतीं चालविले सवें । प्रार्थुनी चांगदेवें अत्यादरें ॥१०॥
आले भीमातीरीं स्नानीं स्थिरावले । पुढें पाठविलें सांगोनियां ॥११॥
यावरी म्हणे निळा होईल सिध्दभेटी । परस्परें ते गोमटी आहे कथा ॥१२॥
बहुत अपूर्व असमाई चरित्र । परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥१३॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनंनाम चतुर्थ प्रकरणं समाप्तम् ॥

संत निळोबा महाराज

अभंग १५६९

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥
तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥
बाळक्रीडालीळें होतीं भिंतीवरी । बैसलीं सूर्यकरीं उष्ण घेत ॥३॥
तंव ते पातले वार्तिक व्दिजवर । करिती नमस्कार विनीतता ॥४॥
सिध्द आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृतांत साष्टांगेसी ॥५॥

ऐकोनि चांगदेव आले भेटावया । उल्हासल्या बाह्या आलिंगना ॥६॥
जावें सामोरें निवृत्तिनाथ बोलती । तंव ज्ञानदेवा चित्तीं विस्मय वाटे ॥७॥
सर्वांतरवासी स्वामी सर्वगत । नभीं नभ सतत जयापरी ॥८॥
सन्मुख विन्मुख सूर्य कोणाकडे । आज्ञेचे बागडे नाचवीत ॥९॥
जेथें जावें तेथें भरुनि उरलेती । सर्वांतरी वस्ती तुमची स्वामी ॥१०॥

मग हंसूनि तयासी म्हणती निवृत्तीनाथ । वदलासी यथार्थ सिध्दांत तूं ॥११॥
परी येथें सगुणें भेटावें । निर्गणीं तो अवघें शुन्याकार ॥१२॥
व्दैतयोग घडे निजसुखाची वृध्दी । अभेदी तो सिध्दी आपेंआप ॥१३॥
आणखी एक गुज ऐकें ज्ञानसिंधू । इंद्राचा हा बंधु मरुदगण ॥१४॥
पुत्र कश्यपाचा उदरीं दितीचा । जन्म झाला याचा पूर्वजन्मीं ॥१५॥
मातेनें याचिये मागीतला वर । व्हाव राज्यधर पुत्र माझा ॥१६॥
तोचि भोगावया आला हा वैभव । पारमार्थिक सर्व लेउनी लेणीं ॥१७॥
इंद्रादिकां पूज्य व्हावी ऐसी बुध्दि । विदयायोग रिध्दी वरेंदु हा ॥१८॥
स्वर्गवासी आला वरदें मृत्युलोका । विदयांचा आवांका सर्व अंगी ॥१९॥
चतुर्वेद वक्ता षडषास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराणें मुखोदगत ॥२०॥
चतुर्वेद विदया कळा ही चौसष्टि । मंत्र सप्तकोटी विधी ज्याचे ॥२१॥
स्थान मान कळा जाणे योगसिध्दी । अष्टादषौषधी रसायनें ॥२२॥
जडया बुडवा जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥२३॥
मणी मंत्र सिध्दी तोटके वेधका । साधका बाधका विदया जाणे ॥२४॥
चतुर हरिभक्त चौदाशे वर्षांच । बहुविदया सिध्दाच्या सिध्दजनीं ॥२५॥
आर्तभूत आले भेटी लवलाहो । उचित हें आहे सामोर या ॥२६॥
णती ज्ञानदेव चलावेंजि प्राज्ञा । भिंतीशी केल आज्ञा चला म्हणे ॥२७॥
निर्जिव चाले भिंती देखे विश्वजन । धांवती ब्रम्हण पुढें सांगों ॥२८॥
तों येती चांगदेव वादयांच्या गजरीं । आरुढोनि गजावरी चवरडोली ॥२९॥
तंव सांगती वार्तिक महासिध्द आले । भिंती आळंघले चालविती ॥३०॥
ऐकूनि चांगया गलितपत्र झाला । लोटांगणी आला गडबडां ॥३१॥
घाली दंडवत उभा ठाके पाहे । भिंती चालताहे गजगती ॥३२॥
तेज सूर्यापरी चौघे भिंतीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥३३॥
ऐसे शतवरी संख्या नमस्कार जाले । तंव ते पातले जवळीके ॥३४॥
विनीत चांगया देखियेली स्थिती । उतरले क्षितीं भेटावया ॥३५॥
जाली भेटी तोचि विश्रांतीचा वट । छाया घनदाट बैसावया ॥३६॥
प्रीतीच्या पडिभरें पडिलें आलिंगन । परम समाधान उभयतां ॥३७॥
आलिंगनिमिसें हदगत आपुलें । सुख निक्षेपिलें ह्रदयीं त्याच्या ॥३८॥
चांगदेवा कृपादृकष्टी अवलोकीलें । अमृताचें झालें मार्जन त्या ॥३९॥
नेणों काय केलें ह्रदयीं क्षेम देतां । विश्रवीं एकात्मता ठसावली ॥४०॥
तुटलें बिरडें पुढें जन्मावळी । मागें झाली होळी संचिताची ॥४१॥
सकळ जनयात्रा दंडाचिये परी । जैसी महीवरी पडली वस्त्रे ॥४२॥
देखोनियां भाव देव कृपामूर्ती । आलिंगन देती लहान थोरां ॥४३॥
देवासी सारिखी आले शरणागतें । दुबळी समथें उंचनिचें ॥४४॥
अनन्याचा भाव जाणती हदगत । करिती त्या सनाथ दर्शनमात्रें ॥४५॥
सकळ विश्व जन यात्रा समुदाय । आलिंगिले बाह्या पसरुनियां ॥४६॥
आनंद पिकला सिध्दाचिये भेटी अमृताचि वृष्टि अनिवार ॥४७॥
विश्रांतीसी सुख आलें जया ठाया । रुळवि त्या पायावी निढळें ॥४८॥
गर्जती आनंदे नामाच्या गजरीं । घोष तो अंबरीं न समाये ॥४९॥
नाचती नाचणी संगीत कूसरी । राग सप्तस्वरीं आळविती ॥५०॥
वाजविती वादयें करिती सोहळा । समर्पिती कळा अभ्यासिल्या ॥५१॥
सिध्दाच्या चरित्रें गर्जती पवाडे । नाचती सुरवाडे आनंदाच्या ॥५२॥
ऐसे आले अळंकापुरी इंद्रायणीतीरा । ब्रम्हानंद नरनारी लोकां ॥५३॥
म्हणती चांगदेव महा लाभ झाला । हा सद्गुरु भेटला कृपामूर्ती ॥५४॥
विधियुक्त पूजा षोडशोपचारीं । समर्पिली शिरीं पुष्पांजुळी ॥५५॥
पतित पतित तारावें पतीता । चांगा विनितता शरण आला ॥५६॥
वरदहस्त आतां मस्तकीं ठेवावा । चांगा म्हणवावा शिष्यवर्ग ॥५७॥
मग श्रीनिवृत्तीनाथें कृपेच्या सागरें । आणि ज्ञानेश्वरें सोपानदेवें ॥५८॥
निरविला चांगा मुक्ताबाईप्रती । यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥५९॥
चांगदेवें चरणी न्यासिला मस्तक । मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ॥६०॥
न कळे ब्रम्हादिकां सद्गुरुची हतवटी । कला उठाउठी निजबोध ॥६१॥
स्वरुपीं अढळ ठेली चित्तवृत्ती । इंद्रियां विश्रांति तेणें सुखें ॥६२॥
न लाविची मुद्रा कष्ट नाहीं अंगी । केला राजयोगी जिवन्मुक्त ॥६३॥
लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ । होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥६४॥
चांगदेव म्हणे आजिची जन्मलों । गुरुपुत्र झालों मुक्ताईचा ॥६५॥
मागील चौदाशे झाली जन्मांतरे । आजी जन्म खरें सार्थकाचें ॥६६॥
मीचि मज भासे विश्वातें वसविता । हें सद्गुरु वचनें आतां प्रतीती आलें ॥६७॥
धन्य हा सद्गुरु निवृत्ति ज्ञानेश्वरु । सोपान मुनेश्वरु मुक्ताबाई ॥६८॥
दर्शनेंचि यांच्या सवरुप साक्षात्कारु । चांगा वटेश्वरु सुखी केला ॥६९॥
मग केशवदास चांगा म्हणती ज्ञानेश्वर । तुज असो बडिवार नामाचा या ॥७०॥
हा एकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनासी परिवारे ॥७१॥
म्हणती सिध्द भेटी आले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां ॥७२॥
सकळ वर्ण आले पहावया चरित्र । पंचक्रोशी क्षेत्र न पुरे ठावो ॥७३॥
व्यवसायी जन आले घेऊनि सौदे माल । होईल उकल म्हणती येथें ॥७४॥
साधिले बाजार मांडिलें दुकान । पहिले तो वाण सिध्द आहे ॥७५॥
म्हणती चांगदेव करावें पूजन । दयावें निमंत्रण सर्व यात्रे ॥७६॥
त्रिलक्ष भोजनाची अइत सारिली । पूजा आरंभिली सद्गुरुची ॥७७॥
उभय तीरी दिले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥७८॥
सकळ यात्रा आणि ज क्षेत्रवासी । यावें भोजनासी प्रार्थियेले ॥७९॥
नरनारीं बाळें अवघीं लहानथोरें । प्रार्थिलीं आदरें प्रसादासी ॥८०॥
भगवदभुती दयावें सर्व भुतीं अन्न । हेंचि मुख्य पूजन सद्गुरुचें ॥८१॥
आरभिले पाक अन्नें नानापरी । शाखा कोशिंबिरी चिरयेल्या ॥८२॥
शर्करा मिश्रीत सघृत पक्कानें । षडस दिव्यान्नें सिध्द केलीं ॥८३॥
मग षोडशोपचारें पूजेस आरंभ । वेदघोषें नभ गर्जिन्नलें ॥८४॥
सिदोपंत गिरिजाबाईचें पूजन । करुनि स्तवन बहुत केलं ॥८५॥
तुमचिये कुळीं हे विश्वाचे तारक । उपजलें बाळक महासिध्द ॥८६॥
समर्पिली पूजा वस्त्रें अळंकार । संपदा अपार वोपियेली ॥८७॥
सिध्दाचें पूजन आरंभिले वोजा । मेळवूनियां व्दिजां व्युत्पन्नांसी ॥८८॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥८९॥
रत्नजडित चौक्या बैसविले वरी । अर्घ्यपादयादि उपचारी पंचामृतें ॥९०॥
शतसहस्त्र विप्र भोंवताले फेरी । अभिषेक पात्रें करीं धरिलीं व्दिजीं ॥९१॥
महारुद्र आरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषं दुमदुमीत ॥९२॥
मंगळ उतुरे नाना वादयांचा गजर । घोषें अवलोकिती चरण दृष्टी ॥९५॥
नानापरिमळ द्रव्यें गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पिली ॥९५॥
सुवर्ण तंतु वस्त्रें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदेवें ॥९६॥
मुद्रिका भूषणें जडितांचि कुंडलें कटी सूत्र सुदले वाळे वाकीं ॥९७॥
नाना सुमन हार घालूनियां कंठी । अवलोकुनी दृष्टी भरुनियां ॥९८॥
विसन्न चांगया जाणे विधी मार्ग । पूजा केली सांग उपचारेशीं ॥९९॥
पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥१००॥
सुवर्ण दक्षिणा गौदाना दिधली । पूजा सांग केली सद्गुरुची ॥१॥
पहाती लोचनी नरनारी बाळें । आणि नाचती कल्लोळें प्रेमाचिया ॥२॥
जवादी कस्तुरी बुक्याचे धुसर । उघळती अपार देवावरी ॥३॥
नैवेदय पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा । सकळां ब्राम्हणां पूजीयेले ॥४॥
हरिभक्त वैष्णव पूजिले आदरें । वादयें मंगळतुरे घोष ध्वनि ॥५॥
व्यवसायी जन यात्रा पूजीयेले क्षेत्रवासी । दिधलीं सवसिणीसीं हळदी कुंके ॥६॥
चांगदेवें मग पोटया सुंदर जानु जंघा ॥८॥
उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा । शोभली निर्मळ उटी अंगी ॥९॥
सरळ भुजादंड तुळशीपत्रें माळा । नानापुष्पें गळां डोल देती ॥१०॥
हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती । दुबाही पंगति विराजली ॥११॥
नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या कळाळीं गंधाक्षता ॥१२॥
जावळ कुरळमंडीत मस्तक । पूजा ब्रम्हादिक समर्पिती ॥१३॥
मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा । नित्य मुक्तलीळा दावी अंगी ॥१४॥
अर्ध्यापादयादिक वेदाच्या सुस्वरी चांगदेव करी ध्यान पूजा ॥१५॥
धन्य तो दिवस नैवेदय अर्पिला पुष्पांजुली केला प्रणीपाता ॥१६॥
पूजिले ब्राम्हण विधी अपचारें । हरिभक्त आदरें यथोचित्ता ॥१७॥
बैसविल्या पंगती इंद्रायणी तीरीं । पात्री नानापरी विस्तारिल्या ॥१८॥
दिव्यान्नें परवडी अन्नशुध्दी वाढिली । मंत्रे प्रोक्षीयेलीं त्रिपदेच्या ॥१९॥
सोडिला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिलें पाप संदेहाचें ॥२०॥
तदर्पण केलें ज्ञानेश्वर नामें । भोजनें संभ्रमें सारियेलीं ॥२१॥
एक एक शीत व्दिजमुखीं अर्पिता । शतक्रतू भोक्ता नारायण ॥२२॥
ऐसा ये क्षेत्रींचा अदभुत महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥२३॥
मग समर्पिले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥२४॥
मंत्राक्षता व्दिजीं अर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरी क्षेत्र महिमा ॥२५॥
मग बैसवोनि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥२६॥
अदभुत सोहळा हरीचीं कीर्तनें । वांटियेलीं धनें याचकांसी ॥२७॥
सकळांसी तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तवनें नारीनर ॥२८॥
प्रत्यक्ष पंढरी ते हे अळंकापूर । मुक्तीचें माहेर उपासका ॥२९॥
निर्विकार जन सकळ क्षेत्रवासी । पूजिती सिध्दांसि नित्यकाळ ॥३०॥
धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेसी येती लोक ॥३१॥
ऐसा चांगदेवें स्तुतीवाद केला । आणि मस्तक ठेविला चरणांवरी ॥३२॥
याचि जन्में बहुत जन्मा निवारीलें । वंदितां पाउलें सद्गुरुचीं ॥३३॥
बहुतेक विदयांचे बहु गुरु आहेती । परी ते तुळणे येती सद्गुरुचे ॥३४॥
ज्याचिया प्रसादें पावलो हा बोधू । समूळ मायाकंदू तोडियेला ॥३५॥
निजानंद पदीं स्थापिलों सतत । केला जीवन्मुक्त क्षणामाजी ॥३६॥
काय उताराई होंऊं कवण्या अर्थे । अर्पितां नाशिवंतें जीवादिकें ॥३७॥
कायावाचामनें करुनि कुरवंडी । धरी तें न सोडीं चरण याचे ॥३८॥
येणें काळें सर्व लाभाचिया कोटी । लाधलों या भेटी सिध्दाचिया ॥३९॥
सकळ विदया सहित करुनि वोवाळणी । सांडीन वरुनी जीवप्राण ॥४०॥
म्हणती चांगदेव कृतकृत्य झालों । चरणीं राहिलों मुक्ताईचे ॥४१॥
या संतचरित्र ओव्या मुक्ताफळें माळा । मिरवी जो गळां आवडीनें ॥४२॥
पुढें वाचे गाये आणीका परिसवी । लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥४३॥
संतांचे चरित्र आवडी जो गाये । पढीयंता तो होये विठोबांसी ॥४४॥
आवडे श्रीहरी संत आचारित । म्हणउनी तिष्ठत हरीकथे ॥४५॥
नारद प्रल्हाद पुंडलीक नामा । प्रिय पुरुषोत्तमस जीवाहुनी ॥४६॥
गोरा परसा आतां नरहरी सावता । कूर्मा आवडता पांडुरंगा ॥४७॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताइ्र । चांगा मिराबाई भानुदास ॥४८॥
विसोबा खेचर जाल्हान कबीर । रोहिदास वच्छरा चोखामेळा ॥४९॥
जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुंठनायका आवडते ॥५०॥
संतोबा पवार हरीभक्त अपार । हे परम प्रीतीकर विठोबाचे ॥५१॥
या सकळांची चरित्रें श्रवणें पठणें । मुक्त वाचाऋणें झाला निळा ॥५२॥
नव्हे वाचस्पती मूढ वाचक मी । परि उदयोकर्ता स्फूर्ति ज्ञानेश्वर ॥५३॥
तिहींच हा ग्रथ पावविला सिध्दी । प्रवर्तूनि बुध्दी स्फूर्ती दिली ॥५४॥
श्रोता वक्ता तूंचि आवडीच्या भोरें । ग्रंथ अत्यादरें लिहविला ॥५५॥
नेणता प्रमेय कथेच्या अन्वया । नेणों केलें काय सामर्थ्यगुणे ॥५६॥
सत्य सत्य सत्य त्रिवाचा हें सत्य । वदविता यथार्थ तुकया सिध्द ॥५८॥
उदंड राहिलें कथीं कथिता कथनीं । वाढेल म्हणउनी ग्रंथ थोर ॥५९॥
देवाचिया चित्ता आलें तोंचि पुरे । राहिल्या विस्तारें काय काज ॥६०॥
पुढातो पुढती संतां हेचि विनवणी । बैसावें श्रवणीं करुनी कृपा ॥६१॥
ऐकूनि हें संत तोषले सकळ । म्हणती तूं प्रेमळ कळों आलें ॥६२॥
हरिप्रियाची कथा सप्रेमें वदलासी । झाला हा आम्हांसी पाहुणेरु ॥६३॥
प्रासादिक वाणी आम्हांरे रुचली । अष्टांगें निवालीं श्रवणमात्रें ॥६४॥
निळा म्हणे सुखें आनंदे निवाला । चरणासि लागला धांवोनियां ॥६५॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनअनुग्रहपूजादिउपचारकथनं नाम पंचमप्रकरणं समाप्तम् ॥

संत निळोबा महाराज

अभंग १५७६

चाडियामुखें दाणा पडे

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥
तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥
सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥
वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥
निळा म्हणे सांप्रदाय शुध्द । उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥

संत निळोबा महाराज

अभंग १५७७

तुकोबाचें कीर्तनमेळीं

तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥
क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥
उदकामाजीं रक्षी वह्या आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥
निळा म्हणे ऐशा कीर्ति । वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५७८

पशुमुखें ज्ञानेश्वर

पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥
तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥
मी तों मुळींचाचि मतिमंद । जाणोनियां भेद अंतरींचा ॥३॥
निळा म्हणे अंगिकार । केला जी वर देऊनियां ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५७९

येऊनियां कृपावंतें

येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥
माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५८०

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण । बहमानंदे गर्जोनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥
निजात्मनगरीहुनी धडफुडा । वैदय आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधींचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥
जे औषधीचेनि सुवासमेळें । व्दैतरोग उठोनि पळे । अहं कुपिताचें पेटाळें । उमळोनियां सगळें तात्कळ पडे ॥३॥
घेतां माझीं दिव्य औषधें । सनकादिकांसि निघालीं दोंदें । महर्षि मातले ब्रम्हानंदे । जाणिजे नारदें प्रतीत हे ॥४॥
अहंविषानळें घेरला । सदाशिवही झिजणीं पडिला । त्रिविध तापें होता आहाळला । तो म्या उपचारिला निजात्मवैधें ॥५॥

देऊनि स्मरणाचें रसायण । हरिलें बध्दतेचें कठीणपण । देहातीत करुनियां जाण । ठेविला करुन पूर्वी जैसा ॥६॥
क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी । ते म्यां प्रल्हादचिये हदयकमळीं । घातली होती म्हणोनि विषकल्लोळीं । वांचला अग्निज्वाळी शस्त्रघाती ॥७॥
ऐसे एकैक स्वानुभव । सांगतां नवल त्याची ठेव । कैंचा उरेल अहंभाव । जाईल ठाव सांडोनियां ॥८॥
ऐशा नानाप्रकारच्या दिव्य औषधी । देऊनि उपचारिलीं लक्षावधी । भ्रमें भ्रमलीयांचिये शुध्दी । उपाव त्रिशुध्दी मज हातीं ॥९॥
म्हणोनियां आलों गा धांवत । विश्वास पहावया दया हो हात । नाहीं नाडीलेति केला घात । फुटली घात ईतकरें अहंकारें ॥१०॥

विषय कुपथ्याचेनी भरें । त्रिविधतापें तापलेती ज्वरें । अहंममतेचें लागलें स्यारें । बध्दता थोरे देहबुध्दी ॥११॥
ममाभिमानेंसी कुंथत । भेदबुध्दिचेनि विकारें बरळत । मी माझें लटिकेंचि बोलत । पडिलेति लाळत शुध्दि नाही ॥१२॥
विधीचा न साहेचि वारा । अविधि जातसां चाचरा । तेणेंचि सन्निपात विकारा । प्रबळ शरीरा वाढली तृष्णा ॥१३॥
न चलवे ऐक्याचिया भूमिके । विपरीत ज्ञानाचे खातसे झोंके । अंधारी पडिलेती देखोनि निकें । सत्यातेंचि लटिकें मानुनी ॥१४॥
तयासी एकचि विचार । क्षणमात्रेंचि होईल उतार । घ्या माझें वचन हे साचार । व्दैत कल्पना संचार न करावा ॥१५॥
एक चमत्कारिक औषध देईन । वैराग्यवल्लीचें रसायन । वरी माझिये अभेदमात्रेसी सेवन । चिदैक्यभावें करावें ॥१६॥
सांडुनी रसनें रसाची गोडी । नित्यानित्यविवके आवडी । प्रत्यगावृत्ति धारण फुडी । निरसेल गाढी भ्रमभावना ॥१७॥
पथ्येंसी असावें निरंतर । हो नेदावा विपरीत ज्ञानाचा संचार । माझीये वचनी विश्वास धर । धरितां साचार हरेल व्यथा ॥१८॥
मागें म्यां थोराथोरांकारणें । दिधलीं होती ही रसायनें । नांवे सांगों तरी शास्त्रें पुराणें । उदडं व्याख्यानें गर्जताती ॥१९॥
अर्जुन वांचविला नाना सांकडीं । उध्दव उपचारिला काढाकाढी । शुक वामदेवादिक परवडी । ऋषींची भवभयसांकडीं निवारिली ॥२०॥
ऐसे उपचारिले बहुत जन । संख्यारहित विवक्षण । आतांही हें रसायन । सेविती ते होउनी आरोग्य ठाती ॥२१॥
निळा म्हणे वस्ताद माझा । शिरीं असतां सद्गुरुराजा । निवारीन रोग घेउनी पैजा । धरितां वोजा विश्वास मनीं ॥२२॥
यापरि सादावूनियां सकळां । जातो आपुल्या निजात्मस्थळा । रामराम करुनियां म्हणे निळा । कृपा अखंडित असों दयावी ॥२३॥

संत निळोबा महाराज

अभंग १५८१

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं -संत निळोबाराय अभंग

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥
हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥
सद्गुरुरायाचीं पाउलें गोमटीं । वंदितांची भेटे हदयस्थ ॥३॥
माझया सद्गुरुचें अवलोकितां मुख । समाधिचें सुख तुच्छ वाटें ॥४॥
सद्गुरुरायाचें स्वरुप पहातां । विश्वीं एकात्मता भासों लागे ॥५॥

नित्य सद्गुरुचीं आळवितां नामें । येती निजधामें भेटों सये ॥६॥
सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध । वचनेंचि बोध करी शिष्यां ॥७॥
सद्गुरु सद्गुरु करितां उच्चार । येती हरीहर भेटों सये ॥८॥
सद्गुरुच्या नामें पोट माझें धाय । आनंदाचा होय पाहुणेरु ॥९॥
निळा म्हणे माझया सद्गुरुची मूर्ति । सकळांही विश्रांति विश्रातीसी ॥१०॥

संत निळोबा महाराज

अभंग १५८२

सेवेलागीं सेवक जालों -संत निळोबाराय अभंग

सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥
अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥
सहज लीळे उदकीं वह्या । तुम्ही रक्षिलीया निजसत्तें ॥३॥
निळा म्हणे धराल हातीं । तरी दयाल मति निरुपम ॥४॥

संत निळोबा महाराज

अभंग १५८३

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥
हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥
तें गुज विधाता सांगे नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥
राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी व्दैपायनें कृपा केली ॥४॥
कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥

राघवा चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥
बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुक्याला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥
जगदगुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥
निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥

संत निळोबा महाराज

व्हॉट्सअॅप