वाकीभ लोगो

संत नरहरी सोनार महाराज अभंग

संत नरहरी सोनार महाराज अभंग

अभंग १

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण ।
जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ ।
अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥
म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना अक्षर ।
परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ ३ ॥

अभंग २

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं ।
मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥
अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी ।
ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥
अखंड हें खेळें जपे सर्व काळीं ।
ह्रदयकमळीं आनंदला ॥ ३ ॥
प्रेम अखंडित निशिदिनीं ध्यात ।
नरहरीसी पंथ दाखविला ॥ ४ ॥

अभंग ३

ऐरावती बहु थोर

ऐरावती बहु थोर ।
त्याला अंकुशाचा मार ॥ १ ॥
व्याघ्र बहु भयंकर ।
त्याला सांपळा हो थोर ॥ २ ॥
सर्पविष हो विखार ।
मंत्रवल्ली केली थोर ॥ ३ ॥
देह जठराग्नी भारी ।
अन्नपाणी शांत करी ॥ ४ ॥
गुरु गैबीनाथ ।
नरहरी दास हा अंकित ॥ ५ ॥

अभंग ४

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर ।
होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥
तुजसरशी दया नाहीं आणिकासी ।
असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥
जन हो जोडी करा नाम कंठीं धरा ।
जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३
नरदेही साधन समता भावभक्ति ।
निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे ।
नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥

अभंग ५

काहीं करीना उपाय

काहीं करीना उपाय ।
दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥
संसारीं नाहीं समाधान ।
न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
शेण लोणी सोनें कांसें ।
एक मोले विके कैसें ॥ ३ ॥
दुर्जनसंग त्यागावा ।
संतसंग तो धरावा ॥ ४ ॥
नरहरी जोडोनियां कर ।
उभा सेवे निरंतर ॥ ५ ॥

अभंग ६

कृपा करी पंढरीनाथा

कृपा करी पंढरीनाथा ।
दीनानाथ तूं समर्था ॥ १ ॥
अपराध करीं क्षमा ।
तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
करीं भक्ताचा सांभाळु ।
अनाथाचा तूं कृपाळु ॥ ३ ॥
आम्ही बहुत अन्यायी ।
क्षमा करी विठाबाई ॥ ४ ॥
आलों पतीत शरण ।
पावन करीं नारायण ॥ ५ ॥
पापी अमंगळ थोर ।
कृपा करीं दासावर ॥ ६ ॥
मी तरी अवगुण बहुत ।
दयाकरीं पंढरीनाथ ॥ ७ ॥
दयासागरा अनंता ।
कृपा करीं पंढरिनाथा ॥ ८ ॥
तुझें नामामृत सार ।
नरहरि जपे निरंतर ॥ ९ ॥

अभंग ७

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता ।
गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥
अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी ।
मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥
दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु ।
करितां सांभाळु हरिभक्ताचा ॥ ३ ॥
हरिनाम उच्चारी देव कृपा करी ।
भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥ ४ ॥
कृपाळु भगवंते पुरविला हेत ।
मुखीं नामामृत नरहरी ॥ ५ ॥

अभंग ८

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत ।
मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥
स्नान संध्या केली संध्यावळी झाली ।
गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥
पांडुरंग न कळे आम्हा ।
नरहरी सप्रेमा सद्गदीत ॥ ३ ॥

अभंग ९

पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी

पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी ।
राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥
भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली ।
उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥
पुढें हो प्रतिमा नामदेव पायरी ।
उभा महाद्वारीं चोखामेळा ॥ ३ ॥
पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार ।
लिंग असे थोर महादेवाचे ॥ ४ ॥
पुढें भागीरथी मध्यें पुंडलिक ।
आणिकही तेथें वेणुनाद ॥ ५ ॥
आषाढी कार्तिकी साधुसंत येती ।
गोपाळकाला करिती आनंदानें ॥ ६ ॥
देवाचें समोर नरहरी सोनार ।
ह्रदयीं निरंतर नांव घेतो ॥ ७ ॥

अभंग १०

पंढरी नगरी दैवत श्रीहरी

पंढरी नगरी दैवत श्रीहरी ।
जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वें थोर ।
भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
साधुसंत थोर पताकांचा भार ।
मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला ।
ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥

अभंग ११

प्रारब्धाची गति

प्रारब्धाची गति ।
कदाकाळीं न सोडिती ॥ १ ॥
होणार सोडिना ।
आलें कपाळी टळेना ॥ २ ॥
दैवयोगाची गती ।
जी होणार ती होती ॥ ३ ॥
जें जें कर्माचें फळ ।
तें तें भोगावें सकळ ॥ ४ ॥
ज्याचें बीज पेरियेलें ।
त्याचें त्यास फळ आलें ॥ ५ ॥
ज्यानें जैसें आचरिलें ।
तैसें त्याच्या फळा आलें ॥ ६ ॥
मानवाचें कल्पना बळ ।
देव करितों सकळ ॥ ७ ॥
किल्ली कैसी चालविली ।
घडामोडी कैसी केली ॥ ८ ॥
सत्य सार बुडविलें ।
अवघे असत्यचि झालें ॥ ९ ॥
नरहरी म्हणे नाम थोर ।
नाम साराहुनी सार ॥ १० ॥

अभंग १२

प्रेम शांति दया शरण निर्धारेसी

प्रेम शांति दया शरण निर्धारेसी ।
बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥
काया वाचा मन निवडूनी प्राण ।
गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥
सद्‍गुरूची कृपा होय जयावरी ।
तो हा श्रीहरीचा संत झाला ॥ ३ ॥
संत साधुजन वंदुनियां पूर्ण ।
वचे नारायण नाम घेतो ॥ ४ ॥
नरहरी सोनार म्हणे हरिचा दास ।
भावें रात्रंदिवस नाम घेतो ॥ ५ ॥

अभंग १३

भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर

भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर ।
तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचें भुवना वेगळें ।
रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव ।
भूषण धवल विभूतीचें ॥ ३ ॥
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ ।
श्वेत शंख बळें फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे ।
जटेंतूनि वाहे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनी स्मशानीं जो राहे ।
पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती ।
पापी उद्धरती क्षणमात्रें ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर ।
पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥ ८ ॥

अभंग १४

शरीराची होय माती

शरीराची होय माती ।
कोणी न येती सांगाती ॥ १ ॥
सारी अवघीं कामें खोटी ।
अंतीं जाणें मसणवटी ॥ २ ॥
गोत घरें टाकुन सारी ।
शेवटीं गांवाचे बाहेरी ॥ ३ ॥
स्वजन आणि गणगोत ।
उपाय नाहीं हो चालत ॥ ४ ॥
ऐसें स्वप्नवत असार ।
नरहरी जोडितसे कर ॥ ५ ॥

अभंग १५

सकळ धर्माचें कारण

सकळ धर्माचें कारण ।
नामस्मरण हरिकीर्तन ॥ १ ॥
दया क्षमा समाधान ।
घ्यावे संतांचें दर्शन ॥ २ ॥
संत संग वेगीं ।
वृत्ति जडों पांडुरंगीं ॥ ३ ॥
नरतनु येयाची बा कदां ।
भावें भजा संत पदा ॥ ४ ॥
भुलूं नका या संसारीं ।
हरी उच्चारी उच्चारी ॥ ५ ॥
सर्व जायाचें जायाचें ।
हरि नाम हेंचि साचें ॥ ६ ॥
विठोबा रक्षिल शेवटीं ।
उभा कर दोन्ही कटीं ॥ ७ ॥
नरहरी जाणूनि शेवटीं ।
संतचरणा घाली मिठी ॥ ८ ॥

अभंग १६

सूर्य असे गगनीं

सूर्य असे गगनीं ।
परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥
मेघ असतो अंबरीं ।
पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥
आकाशीं चंद्र तारांगण ।
बिंब दिसे पाण्यांतून ॥ ३ ॥
बिंब पाहतां दर्पणीं ।
बिंबे दिसे त्यांतुनी ॥ ४ ॥
आत्मा अनुभवीं पाहतां ।
देव दिसे हो तत्वतां ॥ ५ ॥
गुरु कृपा होय पूर्ण ।
नरहरी लंपट निशिदिन ॥ ६ ॥

अभंग १७

चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी

चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी ।
तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥
पोरें हो खेळती शेवटीं मोडिती ।
टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥
तैसे जन सारे करिती संसार ।
मोहगुणें फार खरें म्हणती ॥ ३ ॥
कैसी जड माती चालविली युक्ति ।
नानापरी होती देह देवा ॥ ४ ॥
कांहीं साध्य करा साधुसंग धरा ।
नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ॥ ५ ॥

अभंग १८

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें ।
गरुडपारीं केलें रामतीर्थ ॥ १ ॥
भागीरथीतीरीं राम धनुर्धारी ।
अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥
पताकांचा भार नामाचा गजर ।
प्रेमाचा पाझर साधुसंतां ॥ ३ ॥
संतांचा हा दास नरहरी सेवेस ।
राहो रात्रंदिवस नाम घेत ॥ ४ ॥

अभंग १९

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप ।
सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें ।
सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें ।
कवतुक दाविलें मायाजाळ ॥ ३ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ ।
परब्रह्मीं खेळे अखंडित ॥ ४ ॥
अखंडित वस्तु ह्रदयीं बिंबली ।
गुरुकृपें पाहीं नरहरी ॥ ५ ॥

अभंग २०

देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे ।
अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस ।
आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी ।
रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन ।
कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी ।
रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं ।
दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी ।
उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥

अभंग २१

देह जन्मला व्यर्थ

देह जन्मला व्यर्थ ।
झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
कांहीं नाहीं तीर्थ केलें ।
जन्मूनियां व्यर्थ झालें ॥ २ ॥
दान धर्म नाहीं केला ।
देह मसणवटीं गेला ॥ ३ ॥
नरहरी सेवक सद्‍गुरूचा ।
दास हो साधुसंतांचा ॥ ४ ॥

अभंग २२

देह जन्मला व्यर्थ

देह जन्मला व्यर्थ ।
झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
दान धर्म नाहीं केला ।
शेवटीं जन्म व्यर्थ गेला ॥ २ ॥
देह अवघा क्षणभंगुर ।
दिसे स्वप्नवत् सार ॥ ३ ॥
नरहरी ह्मणे शेवटीं ।
संगें न येई लंगोटी ॥ ४ ॥

अभंग २३

धन्य पुंडलिक भक्त निवडला

धन्य पुंडलिक भक्त निवडला ।
अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥
भक्त नामदेव अक्षयीं जडला ।
पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥
ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त ।
अक्षयीं राहत परब्रह्मीं ॥ ३ ॥
बोधरज भला वचनीं गोविला ।
कीर्तनीं राहिला पांडुरंग ॥ ४ ॥
साधुसंत फार येती थोर थोर ।
उभा निरंतर चोखामेळा ॥ ५ ॥
संत साधुजन वंदिती चरण ।
नरहरी निशिदिन सेवेलागी ॥ ६ ॥

अभंग २४

सिक्का जयाचा आहे थोर

सिक्का जयाचा आहे थोर ।
हातीं पताकांचा भार ॥ १ ॥
भजन होय स्थळोस्थळीं ।
अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
वैकुंठीची खूण ।
रणखांब आहे जाण ॥ ३ ॥
खांबासी भेटती जन ।
शिळेवरी लोळे जाण ॥ ४ ॥
पापतापही जळाले ।
संतचरणीं नरहरी लोळे ॥ ५ ॥

अभंग २५

नाशिवंत देह मनाचा निश्चय

नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥
कलीमध्यें फार सद्‍गुरू हा थोर ।
नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार ।
ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥

अभंग २६

नाम हे नगरी वैकुंठ पंढरी

नाम हे नगरी वैकुंठ पंढरी ।
नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥
नरदेहीं जन्मले पंढरीस गेले ।
दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥
भीवरेचें स्नान देवाचें दर्शन ।
पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥
चरणावरी माथा नरहरी ठेविला ।
ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥

अभंग २७

कांहीं उपाय चालेना

कांहीं उपाय चालेना ।
कांहीं स्वहित घडेना ॥ १ ॥
कांहीं केलें नाहीं पुण्य ।
काय जन्मासी येऊन ॥ २ ॥
केलीं नाहीं कांही भक्ती ।
देही नाहीं हो विरक्ती ॥ ३ ॥
कांहीं केलें नाहीं तीर्थ ।
जन्म गेला अवघा व्यर्थ ॥ ४ ॥
व्यर्थ प्रपंच हा केला ।
अवघा शेवटीं वायां गेला ॥ ५ ॥
गुरु कृप होय जरी ।
नरहरी क्षणांत उद्धरी ॥ ६ ॥

अभंग २८

पापांचे पर्वत मोठे झाले

पापांचे पर्वत मोठे झाले ।
शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥
जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें ।
देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
जिणें आशाश्वत देह नाशिवंत ।
अवघें सारें व्यर्थ असे देखा ॥ ३ ॥
कांहीं नाहीं दान कांहीं नाहीं पुण्य ।
जन्मासी येऊन व्यर्थ जाय ॥ ४ ॥
परोपकार कांहीं नाहीं केला देवा ।
सद्‌गुरु केशवा ह्रदयीं ध्यावा ॥ ५ ॥
सारामध्यें सार नाम असे थोर ।
ह्रदयीं निरंतर नरहरीच्या ॥ ६ ॥

अभंग २९

पहा दिसतो पदार्थ

पहा दिसतो पदार्थ ।
अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥
माया बहुरूपी नटली ।
नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
प्रपंच हें माया जाळ ।
घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥
उमज पडेना हो कांहीं ।
मस्तक सद्‍गुरूचे पायीं ॥ ४ ॥
सद्‌गुरुनाम हें अमृत ।
नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥

अभंग ३०

पंढरी नगरीं नांदतो श्रीहरी

पंढरी नगरीं नांदतो श्रीहरी ।
गाई वळित्या करी गोपाळपुरीं ॥ १ ॥
गोपाळ मिळाले गोपाळपुर झालें ।
अक्षयीं राहिले देव तेथें ॥ २ ॥
संध्या जेथें केली संध्यावळी झाली ।
प्रतिमा ठेवली स्थळोस्थळीं ॥ ३ ॥
चरण ठेविले पद्मतीर्थ झालें ।
अक्षयीं राहिलें तेव्हां तेथें ॥ ४ ॥
वेणु वाजवीत चंद्रभागीं आले ।
वेणुनाद झाले अखंडित ॥ ५ ॥
पंढरी हें स्थळ वैकुंठ सकळ ।
साधु हो निर्मळ आहे तेथें ॥ ६ ॥
कोटि लिंग आहे कोरटींत पाहें ।
चक्रोसी राहे देव सर्व ॥ ७ ॥
व्रत एकादशी करिती नेमेसी ।
पापी चांडाळांशी उद्धरती ॥ ८ ॥
पंढरी द्वारका भूमिका निर्मळ ।
साधु हो दयाळ आहे तेथें ॥ ९ ॥
राम लक्ष्मण सीता संतजणाची ।
हवेलींत पूर्ण अक्षयीं तो ॥ १० ॥
अखंडित वाचेते उच्चार नामाचा ।
सेवक संतांचा नरहरिदास ॥ ११ ॥

अभंग ३१

भस्म उटी रुंडमाळा

भस्म उटी रुंडमाळा ।
हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर ।
कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती ।
हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर ।
म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

अभंग ३२

ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला

ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥
आणिक हिता गा आला अवचित फेरा ।
हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥
ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर ।
भक्तासी भय नाहीं संत संगती घर ॥ ३ ॥
संसार सार नोहे माया मृगजळ भास ।
क्षणांत भ्रांती याचा काय विश्वास ॥ ४ ॥
घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास ।
सावधान नरहरी मालो चरणीं निजध्यास ॥ ५ ॥

अभंग ३३

सत्य ज्योतिलिंग बारा

सत्य ज्योतिलिंग बारा ।
प्रातःकाळीं स्मरण करा ।
कोटि कुळें उद्धारा ।
भव तरा बापहो ॥ १ ॥
वाराणसी विश्वनाथ ।
मोक्षदाता तो समर्थ ।
पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ ।
सोरटी ॥ २ ॥
ॐकार ममलेश्वर ।
सेतबंध रामेश्वर ।
भीम उगमीं भीमाशंकर ।
घृणेश्वर वेराळीं ॥ ३ ॥
नागनाथ अमृतोदकीं ।
विश्वजन केलें सुखी ।
परळी वैजनाथ सुखी ।
सुकृत साचें जन्माचें ॥ ४ ॥
त्र्यंबक हा तीर्थराज ।
पुरवील अंतरीचें काज ।
त्याही तेजामाजीं तेज ।
महाकाळ उज्जनी ॥ ५ ॥
दुजे कैलास भुवन ।
श्रीशैल्य मल्लकार्जुन ।
वाचे स्मरतां धन्य धन्य ।
अनुपम्य क्षेत्र तें ॥ ६ ॥
ब्रद्रिकेदार उत्तरें ।
ज्याचें स्मरणें भव हा तरे ।
ध्यान धरितां वृत्ति नुरे ।
निज निश्चळ दासाची ॥ ७ ॥
नरहरी म्हणे जन्मा यावे ।
शुद्ध सत्य प्रेम
संत नरहरी सोनार अभंग समाप्त

अभंग ३४

नाम फुकाचें फुकाचें

नाम फुकाचें फुकाचें ।
देवा पंढरीरायाचें ॥ १ ॥
नाम अमृत हें सार ।
ह्रदयीं जपा निरंतर ॥ २ ॥
नाम संतांचें माहेर ।
प्रेम सुखाचें आगर ॥ ३ ॥
नाम सर्वांमध्यें सार ।
नरहरी जपे निरंतर ॥ ४ ॥

व्हॉट्सअॅप