अखंड जयाला देवाचा शेजार – संत मुक्ताबाई अभंग
४
अखंड जयाला देवाचा शेजार ।
कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥
मान अपमान वाढविसी हेवा ॥
दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ ॥
आंधळे पां डोळे कां वा जाले ॥३॥
कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥
घरीं कामधेनु ताक मागूं जाय ।
ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥
म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा ।
आधीं अभिमाना दूर करा ॥६॥