वाकीभ लोगो

संत मुक्ताबाई अभंग

संत मुक्ताबाई अभंग

अभंग १

अंतर बाह्य निकें सर्व

अंतर वाह्य निकें सर्व इंद्रियांचे ।
चोज निजी निजबीज एकतत्त्व ॥१॥
आदि नाहीं अनादि नाहीं ।
तें रूप पाही अविट बाईये ॥२॥
मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण ।
आकार सगुण प्रपंचींचा ॥३॥

अभंग २

नामबळें देहीं असोनि

नामबळें देहीं असोनि मुक्त ।
शांति क्षमा चित्त हरिभजन ॥१॥
दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा ।
निरंतर वासना हरिरूपीं ॥२॥
माधव मुकुंद हरिनाम ।
चित्तीं सर्वमुक्ति नामपायें ॥३॥
मुक्ताईये धन हरिनामें उच्चारु ।
अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥

अभंग ३

करणें जंव कांही करूं

करणें जंव कांहीं करूं जाये शेवट ।
तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥
राहिलें करणें नचलें में कर्म ।
हरिविण देहधर्म चुकताहे ॥२॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना ।
तंव साधनीं परता पडो पाहे ॥३॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ।
तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥

अभंग ४

मुक्तपणें ब्रीद बाधोनियां

मुक्तपणे ब्रीद बाधोनियां द्विज ।
नेणती ते बीज केशव हरी ॥१॥
ज्याचेनि मुक्तता सर्वही पे मुक्त।
करूनियां रत न सेविती ॥२॥
वेदीं बोलियेले ब्रह्मार्पणभावें ।
सदा मुक्त व्हावें अरे जना ॥३॥
मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित ।
अवघेचि मुक्त सेवितां हरी ॥४।

अभंग ५

उजियेडु कोडें घेतलो

उजियेडु कोडें घेतलो निवाडें ।
आपुलिये चाडे जीवनकळा ॥१॥
एकरूप दिसे सर्वाघटीं भासे ।
एक हृषिकेशें व्यापियेलें ॥२॥
त्रिपुटि भेदुनी सर्वत्रगामिनी ।
एका रूपें मोहिनी तेही सदां ॥३॥
नित्यता उन्मत्त अवघेचि भरित ।
एकतत्त्वें दावित सोहं भावें ॥४॥
मुक्ताई सांगती कैसेनि गुंपती ।
मायादेवी समाप्ति निजतत्त्वीं ॥५॥

अभंग ६

विस्तारूनि रूप सांगि

विस्तारूनि रूप सांगितलें तत्त्वीं।
कैसेनि परतत्त्वीं वोळखी जाली ॥१॥
सोहंभावें ठसा कोणते पैठा ।
उभाउमी वाटा कैसा जातु ॥२॥
या नाहीं सज्ञान हा अवघा ज्ञान ।
आपरूप धन सर्वारूपीं ॥३॥
मुक्ताई मुक्तता सर्वपर्णे पुरता ।
मुक्ता मुक्ति अपेता निजबोधें ॥४॥

अभंग ७

मुक्तामुक्त कोडे पाहिलें

मुक्तामुक्त कोर्डे पाहिलें निवाडें।
ब्रह्मांडा एवढे महत्तत्त्व ॥१॥
निजतत्त्व आप अवघाचि पारपाक ।
एका रूपें दीपक लावियेला ॥२॥
आदि मध्यनिज निर्गुण सहज ।
समाधि निजतेज आम्हा रामू ॥३॥
मुक्ताईचें धन आत्माराम गूण ।
देखिलें निधान हृदय घटीं ॥४॥

अभंग ८

निर्गुणाची सैज सगु

निर्गुणाची सैज सगुणाची बाज ।
तेथे केशीराज पहुडले ॥१॥
कैसे याचें करणें दिवसां चांदि ।
सावळें उठणें एका तत्त्वें ॥२॥
नाहीं या ममता अवघीच समता ।
आदि अंतु बिंबतां नलगे वेळू॥३॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण ।
जीव शिव संपूर्ण एकतत्त्वें ॥४॥

अभंग ९

दिवसा शीतळ निशी

दिवसात निसीसीर अध केवळ निजवीज ॥१॥
या आदि नाहीं अनादिही नाहीं ।
कैचा मोहप्रवाही दिसेचिना ॥२॥
शक्तीचे संपुष्टीं मुक्ता मुक्त घट ।
अवघें वैकुंठ दिसताहे ॥३॥
मुक्ताई परिपाक अवघे रूप ।
एक देखिलें सम्यक सोहं भावें ॥४॥

अभंग १०

जेथें जे पाहे तेथें तें आहे

जेथे जें पाहे तेथें तें आहे ।
उभारोनि बाहे वेद सांगे ॥१॥
सोमकांतीं झरा कोठील दुसरा ।
तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥२॥
हेतु मातु आम्हा अवघाचि परमात्मा ।
सोहंभावें सोहं आत्मा सर्वी असे ॥३॥
मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण ।
देहीं देहो सौजन्य निजतेजें ॥४॥

अभंग ११

पूर्णपणें सार अविट

पूर्णपणे सार अविट आचार ।
सारासार विचार निजतेजें ॥१॥
निर्गुणीं आकार सर्वत्र साकार ।
एकरूपें विचार निजतेजें ॥२॥
मुक्ताई चैतन्य अवधि पर ।
आदि अंतु खुण निवृत्तीची ॥३॥

अभंग १२

पूजा पूज्य वित्तें पूजक पै

पूजा पूज्य वितें पूजक पैं चित्ते ।
पाली दंडवतें भाव शीळ ॥१॥
चंपक सुमनें पूजी कातळीनें ।
धूप दिप मनें मानसिक॥२॥
भावातीत भावो वोगरी अरावो ।
पाहुणा पंढरीरावो हरि माझा ॥३॥
मुक्ताई संपन्न विस्तारूनि अन्न ।
सेवी नारायण हरि माझा ॥४॥

अभंग १३

अविट हे न विटे हरिचे हे

अविट हे न विटे हरिचे हे गुण ।
सवे सनातन ध्यातां रूपें ॥१॥
साध्य हैं साधन हरिरूपें ध्यान ।
रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥२॥
असंधि बटु नटलों में साधे नाहीं ।
त्या यमाचें भय आम्हां ॥३॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली ।
साधना दिधली चांगयासी ॥४॥

अभंग १४

व्यक्त अव्यक्तीचें रूपस

व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें।
एकतत्त्व दीपाचें हृदयीं नांदे ॥१॥
चांगवा फावलें फावोनी घेतलें।
निवृत्तीनें दिवले आमुच्या करीं ॥२॥
आदि मध्य यासी सर्वत्र निवासी ।
एक रूपें निशी दवडितु ॥३॥
मुक्ताई पूर्णता एकरूपें चित्ता ।
आदि अंतु कथा सांडियेली ॥४॥

अभंग १५

मनें मन चोरी मनोमय

मनें मन चोरी मनोमय ।
धरी कुंडली आधारी सहस्रवरी॥१॥
मन है वोगरु आदि हरिहरु ।
करी पाहुणेरु आदिरूपा॥२॥
सविया विसरू घेसील पडिमरु ।
गुरुकृपा विरु विरे सदां ॥३॥
मुक्ता मुक्तचित्तें गुरुमार्ग विते ।
पावन त्वरिते भव भाव ॥४॥

अभंग १६

सर्व रूपीं निर्गुण संचलें

सर्व रूपी निर्गुण संचलें में सर्वदा ।
आकार संपदा नाहीं तया ॥१॥
आकारिती भक्त मायामय काम ।
सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥२॥
निवृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता ।
सर्वही समता सांगितली ॥३॥
मुक्ताई अविट मुक्तपंथरत ।
जीवीं शिवीं अनंत तत्त्वविद ॥४॥

अभंग १७

उर्णाचिया गळां बांधली

उर्णाचिया गळां बांधली दोरी।
पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥
तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं ।
दुजी जंव साई तंव है अंध॥२॥
ऐसी मी हो अंध जात होतें वायां ।
प्रकृति सावया पावली तेथें ॥३॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज ।
हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥४॥

अभंग १८

सहस्त्रदळीं दळीं हरि

सहस्रदळीं दळीं हरि आत्मा हा कुसरी ।
नांदें देहा भीतरी अलिप्त सदां ॥१॥
रविबिंब बिंबे घटमठीं सदा ।
तें नातळे पे कदां तैसे आम्हां ॥२॥
अलिप्त श्रीहरि सेवी का झडकरी।
सेवितां झडकरी हरिच होआल ॥३॥
चंदनाच्या दूर्ती वेधल्या वनस्पती।
तैसें आहे संगतीं या हरिपाठे ॥४॥
मुक्ताई चिंतित चिंतामणी चित्तीं ।
इच्छिले पावती भक्ता सदां ॥५॥

अभंग १९

नादाबिंदा भेटी जे वेळीं

नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली ।
ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ॥१॥
उगेची मोहन धरूनी प्रपंची ।
त्याशी पै यमाची नगरी आहे ॥२॥
जिवजंतू जडत्वासी उपदेशी ।
त्यासी गर्भवासी घाली देव ॥३॥
मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती ।
संसार पुढती नाही आम्हा ॥४॥

अभंग २०

देऊळींचा देवो घरभरी

देवींचा देवो घरभरी भायो |
कजसेवीण वाचो जातु असे ॥१॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें ।
चित्तअनुरागं भजतीना ॥२॥
असोनि न दिसे उगयाचि पिसें ।
घेती वायां वसे सज्जनेवीण ॥३॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं ।
साकारलें आहे न कळे तया ॥४॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली।
माया आड ठेली अरे रथा॥५॥
मुक्ताई परेसी दुमतें चहंगी ।
सत्राची सर्वरस एका देवें ॥६॥

अभंग २१

विश्रांति मनाची निज

विश्रांति मनाची निजशांति साची ।
मग त्या यमाची भेटी नाहीं ॥१॥
अधिकारी मन मग सारी स्नान ।
रोकडेंचि साधन आलें हाता ॥२॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान ।
चित्तीं नारायणमंत्र जपे ॥३॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन।
नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥४॥

अभंग २२

मुक्तपणें सांग देवो होय

मुक्तपणे सांग देवो होय ।
देवांग मीपणे उद्वेग नेघे स्था ॥१॥
वाउगे मीपण आथिलें प्रवीण ।
एक नारायणतत्त्व खरें ॥२॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी।
द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥३॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत ।
अवघाचि अनंत दिसे देहीं ॥४॥

अभंग २३

मुक्तजीव सदा होति पै

मुक्तजीव सदा होति पै नामपाठें ।
तेंचि रूप ईटे देखिलें आम्हीं ॥१॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।
आणूनि लवकरी तारी जन ॥२॥
ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची ।
निरसिली जनाची भ्रमभुली ॥३॥
मुक्ताई चिंतनें मुक्त में जाली ।
चरणीं समरसली हरिपाठ ॥४॥

अभंग २४

शून्यापरतें पाही तंव

शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं ।
पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥१॥
कैसागे माये हा तारकु दिवटा।
पंढरी वैकुंठा प्रगटला ॥२॥
न कळे याची गती आदि मध्य अंतीं ।
जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥३॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम ।
शून्याहि शून्य समशेजवाजे ॥४॥

अभंग २५

प्रकृति निर्गुण प्रकृति

प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण ।
दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥१॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं ।
पुंडलिका आंगणीं विठ्ठलराज ॥२॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेंसी निज ।
निर्गुणेंसी चोज केलें सर्वे ॥३॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल ।
निवृत्तीने चोखाळ दाखविले ॥४॥

अभंग २६

अलिप्त संसारी हरिनाम

अलिप्त संसारी हरिनामपाठे ।
जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥१॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदां ।
संसारआपदा भाव तोडी ॥२॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी ।
चेतविला हरि आप आपरूपें ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां ।
अभिनव भेदा भेदिलें ॥४॥

अभंग २७

आधी तूं मुक्तचि होता

आधीं तूं मुक्तचि होतासिरे प्राणीया ।
परि वासनें पापिणीया नाडिलासी ।
आधीचे आठवी मग घेई परी ।
हरिनाम जिव्हारी मंत्रसार ॥१॥
आदि मध्य हरि ऊर्ध्व में वैकुंठ ।
जाईल वासना हरि होईल प्रगट ॥धृ॥
एकतत्त्व धरी हरिनाम गोड ।
येर तँ काबाड विषय ओढी॥
नाम में सांडी वासना पापिणी ।
एक नारायणी चाड धरी ॥२॥
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना।
मुक्तामुक्ती राणा हरिपाउँ ।
नामाचेनि पोर्ट जळती पापराशी ।
न येती गर्भवासीं अरे जाना॥३॥

अभंग २८

नाम मंत्रें हरि निज दासां

नाम मंत्र हरि निज दासां पावे।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥
सुदर्शन करीं पावे लवकरी पांडवां ।
साहाकारी श्रीकृष्ण रथा ॥२॥
निजानंद दावी उघडें में बैकुंठ ।
नामेचि प्रगट आम्हालागीं ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्हीं ॥४॥

अभंग २९

भजनभावो देहीं नित्य

भजनभावो देहीं नित्यनाम पेठा ।
नामेचि बैकुंठा गणिका गेली ॥१॥
नाममंत्र आम्हां हरिरामकृष्ण ।
दिननिशीं प्रश्न मुक्तिमार्ग ॥२॥
नामचि तारक तरले भवसिंधु ।
हरिनामछंद मंत्रसार ॥३॥
मुक्ताई चिंतन हरिप्रेम पोटीं ।
नित्य नाम घोटी अमृत सदां ॥४॥

अभंग ३०

मुक्त पैं अखंड त्यासि पैं

मुक्त पैं अखंड त्यासि में फावलें ।
मुक्तचि घडलें हरिच्या पाठ॥१॥
रामकृष्ण मुक्त जाले पैं अनंत ।
तारले पतित युगायुगीं ॥२॥
कृष्णनामें जीव झाले सदा शिव ।
बैकुंठ राणिव मुक्त सदां ॥३॥
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ति कोडें ।
जालें पैं निवार्डे हरिरूप ॥४॥

अभंग ३१

मुक्तामुक्त दोन्ही आईक

मुक्तामुक्त दोन्ही आईक तो ।
कर्णी हरिनाम वर्णी सदा काळ ॥१॥
नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची।
हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं ।
कदां निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥
मुक्तपणे मुक्त मुक्ताई ।
हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥४॥

अभंग ३२

आदि मध्य ऊर्ध्व मुक्त

आदि मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरि।
सबाह्य अभ्यंतरी हरि एकु ॥१॥
नलगती तीर्थे हरिरूपें मुक्त ।
अवथि सूक्त जपिनिलें ॥२॥
ज्याचेनि नायें मुक्त में जडमूह ।
तरले दगड समुद्रीं देखा ॥३॥
मुक्ता हरिनामें सर्वदां पे मुक्त ।
नाहीं आदि अंत उरला आम्हां ॥२४॥

अभंग ३३

परब्रह्मीं चित्त निरंतर

परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा ।
तथा नाहीं कदा गर्भवास ॥१॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी ।
चित्त नारायण मुक्तलग ॥२॥
अव्यक्तीं पैं व्यक्ति चित्तासि अनुभव ।
सर्व सर्व देव भरला दिसे ॥३॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान ।
चित्त नारायण झालें त्याचें ॥४॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला ।
परतोनि अबोला प्रपंचैसी ॥५॥
मुक्ताईचे निरंतर मुक्त ।
हरि सिंचित आम्हां घरीं ॥६॥

अभंग ३४

सर्वी सर्व सुख अहं तेचि

सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख ।
मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥
साधक बाधक करूनि विवेक ।
मति मार्ग तर्क शोधियेला ॥२॥
सर्वतीर्थ हरि दुमाळु धनुवो।
चोळला कणवा चातकाचा ॥३॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा।
आकळावयाचा सत्त्व घरीं ॥४॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें ।
काहाणी ऐको जाय ।
कर्णी तंव परता जाय ॥५॥
मुक्ताई सोहंभावें भरलें दिसे देवें।
मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥६॥

अभंग ३५

आदि मध्य अंतु न कळो

आदि मध्य अंतु न कळोनि प्रांतु ।
असे जो सततु निजतत्त्वें ॥१॥
कैसेनि तत्त्वतां तत्त्व मैं अनंता ।
एकतत्त्वें समता आपेंआप ॥२॥
आप जंव नाहीं पर पाहासी काई ।
विश्वपर्णे होई निजतत्त्वीं ॥३॥
माजि मजवटा चित्त नेत तटा।
परब्रह्म वैकुंठा चित्तानुसारें ॥४॥
मुक्ताई सांगती मुक्तनामपंक्ति।
हरिनामें शांति प्रपंचाचीं ॥५॥

अभंग ३६

मुक्तलग चित्तें मुक्त पै

मुक्तलग चित्तें मुक्त पै सर्वदां ।
रामकृष्ण गोविंदा वाचें नित्य ॥१॥
हरिहरिछंदु तोडी भवकं ।
नित्य नामानंद जपे रया ॥२॥
सर्वत्र रूपडें भरलेंसे दृश्य ।
ज्ञाता ज्ञेय भासे हरिमाजी ॥३॥
मुक्ताई सधन हरी रूप चित्तीं ।
संसारसमाप्ति हरिच्या नामें ॥४॥

अभंग ३७

चितासी व्यापक व्यापूनि

चित्तासी व्यापक व्यापूनि दुरी ।
तेंचि माजि घरीं नांदे सदां ॥१॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी।
शांति वसे घरीं सदोदित ॥२॥
नाहीं या शेवट अवघाचि निघोट ।
गुरुतत्त्व वाट चैतन्याची॥३॥
मुक्ताई संपन मुक्त सेजुले ।
सर्वत्र उपविमुक्ति चोख ॥४॥

अभंग ३८

प्रारब्ध संचित आचरण

प्रारम्भ संचित आचरण गोमटें |
निवृत्तितटाके निघालों] आम्ही ॥१॥
मुळींचा पदार्थ मुळींच में गेला |
परतोनि अबोला संसारासी ॥२॥
सत्यमिध्याभाव सत्वर फळला |
हृदयीं सामावला हरिराज ॥३॥
अव्यक्त आकार साकार हे स्फुर्ति ।
जीवेंशिवं प्राप्ति ऐसें केलें ॥४॥
सकामनिष्कामवृत्तीचा निजफेर |
वैकुंठाकार दाखविलें॥५॥
मुक्तलग मुक्त मुक्ताईचें तट |
अवर्षेचि वैकुंठ निघोट रवा ॥६॥

अभंग ३९

शांति क्षमा वसे देहीं देव

शांति क्षमा बसे देहीं देव पैसे |
चित्त समरसें मुक्त मेळु ॥१॥
निर्गुणें उपरमु देव पुरुषोत्तम |
प्रकृति संगम चेतनेचा ॥२॥
सज्ञानीं दिवटा अज्ञानी तो पैठा |
निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता ॥३॥
मुक्ताई दिवस अवघा हृषीकेश |
केशर्वेविण वास शून्य पैसे ॥४॥

अभंग ४०

देउळाच्या कळशीं नांदे

देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी |
तया घातली पुशी योगेश्वरीं ॥१॥
दिवसा चांदिणे रात्री पडे उष्ण |
कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥२॥
ऋषीं म्हणे चापेकळिकाळ मैं कांपे |
प्रकाश पिसे मनाच्या धारसें एक होय ॥३॥
एकट एकलें वायांचि पै गुंफलें |
मुक्त में विठ्ठलें सहज असे ॥४॥
वैकुंठ अविट असोनि प्रकट वायांचि |
आडवाट मुक्ताई म्हणे ॥५॥

अभंग ४१

मुंगी उडाली आकाशीं

मुंगी उडाली आकाशीं |
तिणें गिळिलें सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जाहला |
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय |
शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली |
देखोन मुक्ताई हांसली ॥४॥

अभंग ४२

अखंड जयाला देवाचा

अखंड जयाला देवाचा शेजार ।
कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥
मान अपमान वाढविसी हेवा ॥
दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ ॥
आंधळे पां डोळे कां वा जाले ॥३॥
कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥
घरीं कामधेनु ताक मागूं जाय ।
ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥
म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा ।
आधीं अभिमाना दूर करा ॥६॥

अभंग ४३

शुद्ध ज्याचा भाव झाला

मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं ।
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥

अभंग ४४

मुक्तपणे अखंड त्यासी पै

मुक्तपणे सांग देवो होय ।
देवांग मीपणे उद्वेग नेघे स्था ॥१॥
वाउगे मीपण आथिलें प्रवीण ।
एक नारायणतत्त्व खरें ॥२॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी।
द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥३॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत ।
अवघाचि अनंत दिसे देहीं ॥४॥

अभंग ४५

संत जेणें व्हावें

संत जेणे व्हावे जग |
बोलणे साहावे |
तरीच अंगी थोरपण |
जया नाही अभिमान ॥
थोरपण जेथे वसे ।
तेथे भूतदया असे ॥
रागे भरावे कवणाशी |
आपण ब्रह्म सर्वदेशी ।
ऐसी समदृष्टी करा |
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ४६

योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा ।
विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी ॥
शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ४७

सुखसागरी वास झाला

सुखसागरी ठाव झाला उंच नीच |
काय त्याला आपण जैसे व्हावे।
देवे तैसेचि करावे |
ऐसा नटनाट्य खेळ |
स्थिर नाही एक पल ॥
एकापासूनी अनेक त्यात आपपर लोक |
शून्य साक्षित्वे समजाये |
वेद ओंकाराच्या नावे एके |
उंचपण केले घर अभिमाने गेले ॥
द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ४८

वरी भगवा झाला नामे

वरी झाला भगवा जाण ।
अंतरी वश्य नाही मन ॥
त्याला म्हणू नये साधू जगी ।
विटंबना बाधू आप आपणा शोधूनि घ्यावे ।
जगी जैसे विरक्त व्हावे ॥
विष ग्रासोग्रासी घ्यावे ।
विवेक नांदे त्याच्या सवे ॥
आशा दंभ दूर करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ४९

संत तेचि जाणा जगीं

सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख ।
मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥
साधक बाधक करूनि विवेक ।
मति मार्ग तर्क शोधियेला ॥२॥
सर्वतीर्थ हरि दुमाळु धनुवो।
चोळला कणवा चातकाचा ॥३॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा।
आकळावयाचा सत्त्व घरीं ॥४॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें ।
काहाणी ऐको जाय ।
कर्णी तंव परता जाय ॥५॥
मुक्ताई सोहंभावें भरलें दिसे देवें।
मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥६॥

अभंग ५०

एक आपण साधू झाले

एक आपण साधु झाले ।
येर कोण वाया गेले ॥
उठे विकार ब्रह्मी मुळी ।
अवघे मायेचे गा बळी ॥
माया समुळ मुरेल जेव्हा ।
विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसे ।
समजा आदि अंती ।
मग सुखी व्हावे संती ॥
चिंता क्रोध मागे सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ५१

ब्रह्म जैसें तैशा परी

ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वेढिले भूति चारी ।
हात आपला आपणा लागे ।
त्याचा करू नये राग ॥
जीभ दाताने चाविली ।
कोणे बत्तीशी पाडिली ॥
थोडे दुखावले मन पुढे उदंड साहाणे॥
चणे खावे लोखंडाचे ।
मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनि ।
उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ५२

सुखसागर आपण व्हावें

सुखसागर आपण व्हावे
जग बोधे निववाये ।
बोधा करू नये अंतर ॥
साधूस नाही आपपर जीव ।
जीवांसी द्यावा मागे करू नये हेवा ।
तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ५३

सांडी कल्पना उपाधी

सांडी कल्पना उपाधि ।
तीच साधूला समाधि ॥
वाद घालावा कवणाला ।
अवघा द्वैताचा घाला ॥
पुढे उमजेना काय ।
बुडत्याचे खोल पाय ।
एक मन चेष्टा करी ।
भूते बापुडी संसारी ॥
अवघी ईश्वराची करणी ।
काय तेथे केले कोणी ।
पुन्हा शुद्ध मार्ग धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ५४

गिरीगव्हारे कशासाठीं

गिरीगव्हर कशासाठी ।
रागे पुरविली पाठी ॥
ऐसा नसावा संन्यासी ।
परमार्थाचा होय द्वेषी ॥
घर बांधणे डोंगरी विषय ।
हिंडे दारोदारी काय केला ।
योगधर्म नाही अंतरी निष्काम ।
गंगाजळ हृदय करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥

अभंग ५५

अहो क्रोधे यावें कोठे

क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे ।
ऐसे कळले ज्याला पूर्ण जनी तेचि जनार्दन ॥
ब्रीद बांधले चरणी ।
नीच दाविता करणी वेग ।
क्रोधाचा उगवला अवघा ।
योग फोल झाला ।
ऐसी दूरदृष्टी करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

अभंग ५६

अवघी साधन हातवटी

अवघी साधने हातवटी ।
मोले मिळत नाही हाती ।
शुद्ध ज्याचा भाव ।
त्याला दूर नाही देव ॥
आपण जैसे व्हावे ।
अवघे अनुमानोनी घ्यावे ।
ऐसे केले सद्गुरुनाथे ।
बापरखुमादेवीकांते ॥
कोणी कोणास शिकवावे |
सारासार शोधूनि घ्यावे ।
तुम्ही तरुनि विश्व तारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

व्हॉट्सअॅप