तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी ।
साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तुं नाभाचा जो साक्षी शब्दें केवीं आतुडसी ॥१॥
राम राम रामा सच्चिदानंद रामा । भवसिंधु तारक जयतुं मेघःश्यामा ।
अनंत कोटी ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा । अहं सोहं ग्रासुनी हें तो मागतसे तुम्हां ॥२॥
अष्तांगयोगें शरीर दंडुनि वायुसी झुंज घेवो । बहुसाल अंतराल तयाचा येतसे भेवों ।
कर्मचि जरी आचरुं रुढ धरुनियां भावों । विधिनिषेध माथा अंगी वाजतसे घावो ॥३॥
तीर्थयात्रेसी जाऊं तरी तें तीर्थ दुरी राहे । पर्वकाळ विचारितां नित्यकाळ वायांजाये ।
हाती जपमाळा घेउनी अगणित गणूं पाहे । तेथें पापिणी निद्रा घाला घालुनिया जाये ॥४॥
गृहशिखासुत्र त्यजुनी संन्यास करुं । न नासे संकल्प तयाचा धाक थोरु ।
तेथें मन निश्चळ न राहे यासी काय बा करुं । वेषचि पालटे न पालटे अहंकारु ॥५॥
जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळा कां न दिसे त्यासी । ममतांहकृतीनें योगी बुडविलेंसाधन आश्रमासी ।
एका जनार्दनीं सिद्ध साधन कां न करसीं । सांडी मांडी न लगे मग तूं रामचि होसी ॥६॥

वाकीभ

संत साहित्य, अभंग, ओव्या आणि ग्रंथांचा समृद्ध मराठी संग्रह. वारकरी परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हा आमचा प्रयत्न.

मेन्यू मुखपृष्ठ ग्रंथ अभंग/भजन संत विभाग संपर्क vakibhmedia@gmail.com +91 99239 16476 पुणे, महाराष्ट्र

© २०२६ वाकीभ. सर्व हक्क सुरक्षित.