देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥
जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥
आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥
मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥
येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥
सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥
येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥
अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥
सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥
तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥
आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥
चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥
जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥
कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥
आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥
प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥