उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥
आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥
कार्याकारणीं समाधीं उन्मनीं । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥
एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥
एका जनार्दनीं वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥