नाम सुलभ इहलोकीं । तरले तरले महापातकी ।
म्हणोनि वाचे जो घोकी । नित्य नेमें आदरें ॥१॥
तयाचें तुटतें बंधन । होय जन्माचें खंडन ।
वाचे गातां जनार्दन । सोपें जाण साधन हें ॥२॥
नमन करुनी समाधान । आठवी रामनामाचें ध्यान ।
शरण एका जनार्दनीं । समाधान संतोष ॥३॥