राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन ॥१॥
साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥
लोपल्या चंद्रसुर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥३॥
प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढें वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥
खुंटली गति श्वासा वो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥५॥
यासी हो साच परिसा हो कारण । शरण एका जनार्दन नेणें तेंचि साधन ॥६॥