उघड दृष्टी करुन पाहुं । रामकृष्णनामें ध्याऊं ।
अहोरात्र मुखीं गाऊं । राम हरी वासुदेव ॥१॥
हेंचि अध्यात्माज्ञानाचें वर्म । येणें घडतीकर्माकर्म ।
ब्रह्माविद्येचा आराम । येणें पावे सर्वथा ॥२॥
सदा वाचे नामावळी । महा दोषा होय होळी ।
कळीकाळ पायांतळीं । ब्रह्मानंदें गर्जतां ॥३॥
एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ।
साधकांचा श्रम । येणें दुर सर्वथा ॥४॥