नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं ।
तेणें सुफळ संसारुं । होय जनीं जाणिजे ॥१॥
कां रे न करिसी उच्चार । किती सांगुं तुज विचार ।
न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥
जासी भलतीया वाटा । पडसी दारीं आणि दरकुटा ।
नामावांचुनीं सुटका । एका जनार्दनीं नोहेची ॥३॥