श्रीरामनाम पावन क्षितीं । नामें दोषां होय शांती ।
नामेंचि उद्धरती । महा पातकी चांडाळ ॥१॥
नाम पावन पावन । शंभु राजा जपे जाण ।
इतरां ती खूण । न कळेचि कल्पातीं ॥२॥
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । त्यांची कीर्ति जो घोकी ।
जाय सत्यलोकीं । नाम घेतां प्राणी तो ॥३॥
एका जनार्दनीं नाम । पाववितें निजधाम ।
स्त्रियादि अंत्यजां सम । सारिखेंचि सर्वांसी ॥४॥