उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥
न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥
साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करीं ॥३॥
एका जनार्दनीं असनीं शयनीं । विठ्ठल निशिदिनीं जप करी ॥४॥