अवघे दैवतां नका पाहुं । आदरें आवडी विठ्ठल गाउं ॥१॥
अवघे पोटाचे भिकारी । हिंडीविती दारोदारीं ॥२॥
अवघे तें वायं जाय । काय धरुनि त्याचें पाय ॥३॥
अपल्या पोटा जें रडतें । आणिकातें काय देतें ॥४॥
मागुन खाती जना । काय पुरविती वासना ॥५॥
ऐसियासी देव म्हणणें । सदा आम्हां लाजिरवाणें ॥६॥
आम्हीं आणिकां शरण जातां । लाज लागेल सर्वथा ॥७॥
ऐसें नका येऊ देऊं मना । शरण एका जनार्दनीं ॥८॥