ऐका ऐका वचन माझें । तुम्हीं वदा विठ्ठलवाचें ॥१॥
नामापरतें साधन नाहीं । वेदशास्त्रें देती ग्वाहीं॥२॥
चार वेद सहा शास्त्र । अवघ नामाचा पसर ॥३॥
अठरा पुराणांचे पोटी । नामेंविण नाहीं गोष्टी ॥४॥
नामें तारिलें पातकी । मुक्त झालें इहलोंकी ॥५॥
अजामेळ तारिला । वाल्हा कोळी ऋषी केला ॥६॥
गणिका नेली निजपदा । रमनाम वादे एकदां ॥७॥
ऐसीं नामजी ती थोरी । पुतना तारिली निर्धरीं ॥८॥
आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥९॥