गौळणी सांगती गार्हाणीं । रात्री आला चक्रपणी ।
खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं ॥१॥
हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा ।
कोठवर सांसुद धिंगाणा ॥धृ०॥
दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।
मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरुं जातां सांपडेना ॥२॥
तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी ।
पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥
मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं ।
जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकतां गार्हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं ।
कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥