अगम्य तुझा खेळ । ब्रह्मादिकां तो अकळ ।
नेणवेचि सबळ । वेदशास्त्रां ॥१॥
तो वसे पंढरपुरीं । कट धरिलें दोनी करीं ।
पीतांबर साजिरी । बुंथी शोभे तयासी ॥२॥
तुळशीमाळा शोभती गळां । कांसे कसिला सोनसळां ।
पदक आणि वनमाळा । वैजयंती शोभती ॥३॥
वामभागीं ती रुक्मीणी । राही सत्यभामा दोन्हीं ।
पुढें पुंडलीक मनी । तीर्थ तें चंद्रभागा ॥४॥
वेणुनाद गोपाळपुर । पद्माळें तें परिकर ।
बिंदुतीर्थ सर्वेश्वर । सभोंवती शोभातातीं ॥५॥
गरुड हनुमंता दोन्हीं । शोभाताती राउळांगणीं ।
विठ्ठमूर्ति धणी । पाहतांचि सुखावें ॥६॥
भक्त उभे सहपरिवार । करिती नामाचा गजर ।
एका जनार्दनीं परिकर । सेवा तेथें करितसें ॥७॥