गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥
कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥
दहीं दुध तुप लोणी । यांची भोजनें आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तयां न कळें ॥३॥
थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें । द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंची ॥४॥
खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥
एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥