आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥

काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥

आम्हीं असतां निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करीं । सोडियलें अदोघा माझारीं । तंव तें बोचकरी आम्हांतें ॥३॥

आम्हीं भ्यालों उभयतां । चीर फिटलें बाई तत्त्वतां । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥

ऐसें करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आतां सांपडतां न सोडी त्याला ॥५॥