काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥
ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥
माझी सुन एकली घरीं । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढें राहिला ॥३॥
तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तूं परियेसी । मी खेळत होतों बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥
तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तूं कान्हां । घाली मिठी धरी स्तना । कां गे चेंडू देईना ॥५॥
तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनीं निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥