बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥

गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥

राहिलें बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधलें चित्त । एका जर्नादनीं समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥