देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥
अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥
आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥
दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥
चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥
तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥
एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥