प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥
धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥
करें नेमें एकादशे । जाय नेमें पंढरीसी । ऐसें या तीर्थासी नेमे करितां जोडें ॥३॥
सर्व पर्वकाळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य ते उघडें । विठठल रुपडे पाहतां ॥४॥
ऐसा जया नेमधर्म । न चुके वाचा नामस्मरण । एका जनार्दनीं स्मरण । विठ्ठलदेवी आवडी ॥५॥