देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये ॥१॥
बाई वो मन ध्यान लागलें पंढरीचे । तें तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥
नयन नाच्ती सुखाचा हा गोंधळू । साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठल ॥३॥
आनंदु आसमाय होतीं मना पोटीं । नवल वालभों विठ्ठली जालीं भेटीं ॥४॥
मी आन न देखें वो नाइकें काणीं । ठासा ठसावला अभिन्नपणीं वो ॥५॥
जनीं न संता संचारू जाला देखा । एका जनार्दनीं धरिला एकी एका वो ॥६॥