धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥
ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥
पहा तो नारद उभा चंद्रभगेंत । गायन करीत नामघोष ॥३॥
धन्य विष्णु पहा धन्य वेणुनाद । क्रीडा करी गोविंद सर्वकाळ ॥४॥
पौर्णिमेचा काला वेणुनादीं जाहला । वांटिती सकळीं पाडुरंग ॥५॥
स्वगींचे सुरवर प्रसाद इच्छिती । नाहीं त्यांसी प्राप्ति अद्यापवरी ॥६॥
तुम्हां आम्हां येथें कैसें सांपडले । उपकार केलें पुडलीके ॥७॥
धन्य ते पद्माई धन्य ते पद्माळ । येऊनी सकळ स्नाने करिती ॥८॥
धन्य दिंडीर वन रम्य स्थळ फर । रखुमाई सुंदर वास करिती ॥९॥
चोखोबानें वस्तीं केली ऐलथडी । उभारिली गुढी स्वानंदाचे ॥१०॥
धन्य पुंडलीक भक्त शिरोमणी । तेणें चक्रपाणी उभा केला ॥११॥
मायाबापाची सेवा तेणें केली सबळ । म्हणोनी घननीळा आतुडला ॥१२॥
लोह दंड क्षेत्र पंढरपुर । उभा विटेवर पांडुरंग ॥१३॥
त्रैलोक्याचा महिमा आणिला तया ठाया । तीर्थ व्रतें पायां विठोबाच्या ॥१४॥
तिहीं लोकीं पाहतीं ऐसें नाहीं कोठें । परब्रह्मा नीट विटेवरी ॥१५॥
एका जनार्दनीं ब्रह्मा पाठीं पोटीं । ब्रह्मानिष्ठा येती तया ठायां ॥१६॥