पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे ॥१॥
कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता ततक्षणीं ॥२॥
पृथ्वीचे दान असंख्या गोदानें । पंडलीक दरुशनें न तुळती ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥