तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥
कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥
वोल्हावलें मन इंद्रियां टवटवी । गोपिराज जीवीं सांठविलें ॥३॥
सांठविलें जीवीं जाणा याची खुणा । जरी होय करुणा सर्वांभुतीं ॥४॥
सर्वांभूतीं राम दृष्टीचें देखणें । नाहीं दुजेंपणें आडवस्ती ॥५॥
आडवस्ती नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावांचुनी । आन नेणें ॥६॥