निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥
चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥
संसाराची वार्ता नुरेचि पां कांही । आणिकक प्रवाहीं पडुं नको ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलनामीं छंद । मना तूं गोविंद आठवीं कां रे ॥४॥