निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥
चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥
ध्यान ते दृष्टी भरूनि पहावें । आलिंगन द्यावें वेळोवेळां ॥३॥
हृदयकमळीं पहावा तैसा ध्यावा । एका जनार्दनीं विसावा सहजची ॥४॥