बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥
जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥
व्रत करीं एकादशी । जागरण अहर्निशीं । संतसभे सरसी । टाळी वाहे ॥३॥
आळस तूं न करीं । वाचे म्हणे विठ्ठल हरी । सांडोनियां थोरीं । नाम घे आवडी ॥४॥
जनीं वसे जनार्दन । एका दृढ धरी चरण । अर्पियेल तनमन । विठ्ठल वाचे ॥५॥