दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें ॥१॥
तें नाम विठोबाचें । सुलभ वदें कां रे वाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥
प्रचीत पाहे अर्धक्षण । नाम उच्चारी रे जाण । तेणें तुटे भवबधन । यमदुतांचें ॥३॥
नाम घेतां उठाउठीं । पातकाच्या पळती थाटी । पुर्वज उद्धरती कोटी । बेचाळिसासहित ॥४॥
एका जनार्दनीं प्रेम । गाईं तूं विठ्ठल नाम । आणिक सोपें वर्म । नाहीं नाहीं ॥५॥