नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥
त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥
जें जें होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन ते कर्म । तयापासूनि सोडवी ॥३॥
एकविधि धरी भाव । मागें देवापदीं ठाव । संचिताची हाव । तयापाशीं नुरेचि ॥४॥
ऐसा बळकट करी नेम । धरी संतसमागम । एका जनार्दनीं धाम । पावसी तूं वैकुंठ ॥५॥